Monday, 20 September 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 September 2021 Time 18.10 to 18.20

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 September 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० सप्टेंबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उद्यापासून मुंबईत राज्यस्तरीय वाणिज्य उत्सव परिषद.

·      महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विशेष कार्यक्रम राबवणार.

·      कॉंग्रेसचे नेते चरणजीत सिंह चानी यांचा पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी.

आणि

·      नांदेड जिल्ह्यात उद्या ई पिक पाहणी तसंच पीक पेरा नोंदणी विशेष मोहीम.

****

 

स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत आजपासून २६ सप्टेंबर पर्यंत “वाणिज्य सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत मुंबई इथं दोन दिवसीय राज्यस्तरीय ‘वाणिज्य उत्सव’ परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. उद्या सकाळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात येणार आहे. कार्यक्रमांत राज्यातील निर्यात संधी, पायाभूत सुविधा, बॅंकींग आणि वित्तीय सहकार्य या शिवाय खाद्य, कापड, इंजिनिअरिंग, केमिकल आणि औषध निर्मिती, जेम्स ॲण्ड ज्वेलरी या विषयातील संधी याविषयावर चर्चासत्रे घेण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातले २०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत.

****

राज्यातल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विशेष कार्यक्रम राबवणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. त्या आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पुढच्या दोन वर्षांत यासंदर्भात मोठा बदल घडवून येणार असल्याचं सुळे यांनी सांगितलं. पत्रकारांनी ब्रेकिंग न्यूजच्या मागे न पळता, सामाजिक विषयांवर गांभीर्यानं काम करावं, विविध योजनांचा पाठपुरावा करावा, असंही सुळे यांनी नमूद केलं.

सध्याचं केंद्र सरकार दडपशाही करणारं सरकार असल्याचा आरोप सुळे यांनी केला. ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांचा राजकीय सूडबुद्धीने होणारा वापर लोकशाहीसाठी घातक असल्याचं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

****

राज्य सरकारमधले मंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कोल्हापूरला जाणाऱ्या सोमय्या यांना सातारा जिल्ह्यात कराड इथं पोलिसांनी रोखलं, कराड इथं झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते. मुश्रीफ यांच्या विरोधातले सर्व पुरावे सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाला देणार असून, मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार असल्याचं सोमय्या म्हणाले.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १२वी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार २४ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी या निकालावरील आक्षेप अथवा तक्रारी २५ सप्टेंबर पर्यंत विहित अर्जाच्या नमुन्यात दाखल कराव्या असं मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी आज एका पत्रकाद्वारे कळवलं आहे.

****

 कॉंग्रेसचे नेते चरणजीत सिंह चानी यांनी आज पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल बनवारीलाल पुरोहीत यांनी चानी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. चानी यांच्यासह सुखजिंदर सिंग रंधावा आणि ओ पी सोनी यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यावेळी उपस्थित होते. चानी यांची पंजाब काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून काल निवड झाल्यानंतर, त्यांनी पंजाबचे राज्यपालांची भेट घेऊन, नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता.

****

केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आज राज्य तसंच केंद्र शासित प्रदेशांच्या सर्व क्रीडा मंत्र्यांशी, दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. देशभरात खेळाला चालना मिळण्यासाठीच्या मुद्द्यांवर, खेलो इंडिया आणि फीट इंडियासारख्या कार्यक्रमांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

****

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ८० कोटीचा टप्पा पार केला आहे. काल ३७ लाख ७८ हजार २९६ नागरीकांना लस देण्यात आली. देशात आतापर्यंत या लसीच्या ८० कोटी ८५ लाख ६८ हजार १४४ मात्रा देण्यात आल्या आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात उद्या ई पिक पाहणी आणि पिक पेरा नोंदणी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत दोन लाख १० हजार ९२१ शेतकऱ्यांची “ई-पीक पाहणी” नोंदवण्याचं उद्दीष्टं ठरवण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्यात मागील एका महिन्यात एक लाख शेतकऱ्यांनी ई-पिक पेरा नोंदणी ॲप डाऊनलोड करुन, पिक पेरा नोंदणी पूर्ण केली आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचा पीकपेरा मोबाईल ॲपद्वारे विहित मुदतीत नोंदवावा, यासाठी ही विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.

****

आरोग्य विभागातर्फे उद्या राष्ट्रीय जंतनाशक दिन पाळण्यात येतो. परभणी जिल्ह्यात एकूण ३ लाख ६ हजार ३७३ बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आलं असल्याचं जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितलं. जिल्ह्यातील जी बालकं या दिवशी जंतनाशक गोळी घेण्याची राहून गेली असतील त्यांना २८ तारखेला गोळी देण्यात येईल अशी माहितीही गोयल यांनी दिली.

 

उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनीही जिल्ह्यात २१ ते २८ सप्टेंबर पर्यंत जंतनाशक मोहिम राबवण्याचे जाहीर केलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात नवीन क्रीडा संकुलासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील २५ एकर एवढी जागा देण्याची मागणी खासदार संजय जाधव यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे आज केली. शहरातल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलाची अवस्था अत्यंत खराब झालेली असुन खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम जिल्ह्यातल्या नवीन खेळाडूंवर होत आहे त्यामुळे परभणी जिल्ह्याकरिता नवीन क्रीडा संकुलाची गरज असल्याचं जाधव यांनी सांगितलं.

****

लातूर जिल्ह्यातल्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था आणि पुण्यातल्या अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता ५ वी ते १० वीच्या शिक्षकांसाठी दोन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातून उच्च प्राथमिक आणि माध्यमिक कला विज्ञान आणि गणित विषय शिकविणाऱ्या तीन हजार शिक्षकांनी ऑनलाईन प्रशिक्षणाची मागणी नोंदवली होती. त्यानुसार उद्यापासून १३ ऑक्टोबर दरम्यान एकूण सहा तुकड्यांना प्रत्येकी दोन दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

//***************//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 04 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...