Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 October 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ ऑक्टोबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
देशात १०० कोटी कोविड
प्रतिबंधक लस देण्याचं उद्दिष्ट आज पूर्ण झालं आहे. ही उद्दिष्टपूर्ती करण्यामध्ये
योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना 'आकाशवाणीचा सलाम'. कोरोना विषाणू संसर्गाचा
धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही
लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित
अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड - 19 शी संबंधित अधिक माहिती
आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०-
२६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
देशानं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण
मोहिमेत शंभर कोटींचा टप्पा ओलांडला.
·
राज्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी
२५ ऑक्टोबरपासून विशेष लसीकरण मोहिम.
·
पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती
देण्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश.
आणि
·
कला दिग्दर्शक लीलाधर सावंत याचं
निधन.
****
देशानं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत
आज १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. आजच्या दिवसाची इतिहासात नोंद झाली असून हा क्षण
‘उल्लेखनीय यश’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यानिमित्तानं
ऐतिहासीक लाल किल्ल्यावर खादीचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे. शंभर कोटी मात्रांचा
टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे आभार मानले आहे.
तसंच डॉक्टर, परिचारिका आणि या अभियानात सहभागी असलेल्या सर्वांच्या प्रती त्यांनी
कृतज्ञता व्यक्त केली. हे देशाच्या विज्ञानाचं आणि १३० कोटी देशवासियांच्या एकत्रीत
प्रयत्नांचं फलीत आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी
येत्या २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान `मिशन युवा स्वास्थ कोविड लसीकरण` कार्यक्रम
राबवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात
कालपासून महाविद्यालयं सुरू झालीत. या पार्श्वभूमीवर लसीकरणाला गती देण्याच्या उद्देशानं
उच्च आणि तंत्रशिक्षण, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून १८ वर्षांवरील
युवा वर्गाच्या लसीकरणासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ४० लाखांपर्यत जाते. या केंद्रित लसीकरण मोहिमेत सर्वोत्तम
कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयांना पुरस्कार देणार असल्याचंही टोपे यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत
७५ टक्के नागरिकांचं कोवीड लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे
पालकमंत्री टोपे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते
बोलत होते. सध्या जिल्ह्यातली महाविद्यालयं सुरु करण्यात आली असून या महाविद्यालयांमधून
विशेष लसीकरण शिबिरांचं आयोजन करण्यात यावं. तसंच ग्रामीण भागामध्ये लसीकरणाचा टक्का
वाढावा यासाठी लोकप्रतिनिधी, धर्मगुरु आदींची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी
केल्या.
****
राज्यात विविध ठिकाणी `जल जीवन मिशन`
अंतर्गत सुरु असलेली पाणीपुरवठा योजनांची कामं वेळेवर पूर्ण होणं आवश्यक असून त्यासाठी
कामांना गती द्यावी असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी
दिले आहे. आज मुबंईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रकल्प व्यवस्थापन संस्थांच्या
कामकाजासंदर्भात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
यातल्या औरंगाबाद विभागात अठरा पाणीपुरवठा योजना असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या
संबंधित अधिकाऱ्यांनीही या संस्था ही कामं वेळेवर पूर्ण करतील, यासाठी नियमितपणे पाठपुरावा
करणं आणि आढावा घेणं आवश्यक असल्याचं पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.
****
राज्यातल्या ॲटोरिक्षा, टॅक्सी आणि ट्रक
चालक यासारख्या असंघटित वाहनचालकांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करायला कामगार
मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे. तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात असंघटित
वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली
मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ही मंजुरी देण्यात आली. यासाठी
संबंधित विभागांकडून प्रस्ताव सादर करण्याबाबत तसंच यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्याबाबतच्या
सूचना मुश्रीफ यांनी संबंधित विभागाला दिल्या.
****
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात
तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतला आहे. एक जून २०२१ पासून
हा वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे. देशातल्या सुमारे ४७ लाख १४ हजार कर्मचारी आणि
६८ लाख ६२ हजार सेवा निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना या महागाई भत्याचा लाभ मिळणार
आहे.
****
कर्तव्य बजावताना हौतात्म्य आलेल्या
पोलिसांना आज पोलिस स्मृति दिवसानिमित्त अभिवादन केलं जातं आहे. औरंगाबाद इथं पोलिस
अधिक्षक कार्यालयातल्या हुतात्मा स्मारकाला पोलिस अधिक्षक निमित्त गोयल यांनी पुष्पचक्र
वाहून अभिवादन केलं. नांदेड जिल्ह्यातल्या पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदान इथंही पोलीस
शहीद स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल होतं. यावेळी नांदेड
परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या वतीनं स्मृती स्तंभास अभिवादन करण्यात आलं.
****
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक लीलाधर सावंत
याचं आज दुपारी वाशीम जिल्ह्यातल्या जऊळका- रेल्वे इथं दीर्घ आजार निधन झालं. ते ६५
वर्षांचे होते. मूळ कोकणातल्या सिंधदुर्गचे रहिवासी असलेले लीलाधर सावंत यांनी १७७
हिंदी चित्रपटांचं आणि चार हॉलिवूडच्या चित्रपटांच कला दिग्दर्शन केलं. लीलाधर सावंत
यांना वर्ष १९८८ मध्ये ‘हत्या’ या चित्रपटातल्या कला दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार
मिळाला होता तसंच ‘कामचोर’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. ते गेल्या
काही वर्षांपासून चित्रपटसृष्टी सोडून वाशिम जिल्ह्यातल्या जऊळका इथं शेती व्यवसायात
विविध प्रयोग करत होते.
****
अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी
राज्य सरकारनं जाहीर केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार
असल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांनी
केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज या संदर्भातल्या जन आक्रोश आंदोलनावेळी
ते बोलत होते. शेतकऱ्याला गृहीत धरण्याचं काम या सरकारनं आता करून नये, प्रती हेक्टरी
पन्नास हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवावी अशी मागणीही काळे यांनी
यावेळी केली.
//********//
No comments:
Post a Comment