Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
प्रभावी न्यायव्यवस्था देशाची
अर्थव्यवस्था सक्षम करण्यात योगदान देते, त्यामुळे न्यायालयीन पायाभूत सुविधांच्या
सुधारणांची गरज, देशाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी व्यक्त केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचं लोकार्पण आज सरन्यायाधीशांच्या हस्ते झालं,
त्यावेळी ते बोलत होते.
न्यायालयीन पायाभूत सुविधांसंदर्भात
दिलेल्या प्रस्तावावर संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विचार व्हावा, अशी अपेक्षा
त्यांनी व्यक्त केली. औरंगाबाद खंडपीठाची ही विस्तारित इमारत देशभरातल्या न्यायालयीन
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आदर्श उदाहरण ठरेल, असं सरन्यायाधीश म्हणाले. महात्मा
फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज सुधारणेत दिलेल्या योगदानाचा त्यांनी यावेळी
उल्लेख केला.
केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री
किरेन रिजीजू, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष
देसाई, खासदार इम्तियाज जलिल, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, राज्याचे
महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे, तसंच मुंबई उच्च न्यायालयाचे
न्यायमूर्ती यावेळी उपस्थित होते.
न्यायासाठी कुणालाही संघर्ष
करावा लागू नये, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचं, केंद्रीय मंत्री
रिजिजू यावेळी म्हणाले.
ज्या गोष्टी न्यायदानासाठी
सरकार म्हणून करण्याची गरज आहे, त्या करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी
दिलं. न्यायदानाच्या प्रक्रियेला वेग यावा यासाठी, मुंबई उच्च न्यायालयासाठी नवीन इमारत
लवकरच उपलब्ध करुन देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने
दिपंकरजी आपल्याला वचन देतो की हमे हायकोर्ट के लिए बिल्डिंग चाहिये. वो सिर्फ
आपका नही मेरा भी सपना है। आणि ते मी करणारच. आणि तारीख तर आपण ठरवूच पण मी आदरणीय
रमण्णा साहेबांना आजच आमंत्रण देतोय की आपको भी आना होगा भूमिपूजन के लिए। आणि
प्रयत्न असा करू की आपल्याच कारकिर्दीत त्याचं उद्घाटन सुध्दा करायचं. हे मी का
म्हणतो, की आत्ता चंद्रचूड साहेबांनी एक बाजू कोर्टाची, काय काय चाललेलं आहे, किती
केसेस आहेत आणि न्यायमूर्ती किती काम करत असतात आम्हाला पूर्ण आदर आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक
लसीकरणानं १०१ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. यापैकी ७१ कोटी चार लाख नागरीकांना
पहिली मात्रा, तर अंदाजे ३० कोटी नागरीकांना दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत. काल
देशात ६८ लाख ४८ हजरांहून अधिक नागरीकांचं लसीकरण करण्यात आलं.
****
आगामी काळात आयोजित करण्यात
येणाऱ्या लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक
प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय केंद्रीय लोकसेवा आयोग - युपीएससीनं
घेतला आहे. सदर चाचणी पात्रता स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धती स्वतंत्रपणे जाहीर
करण्यात येईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या
आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा
हा ८२वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा
कार्यक्रम प्रसारित होईल.
****
परभणी शहरातल्या विविध ठिकाणी
सुमारे ३० केंद्रावर लसीकरण सुरु आहे. महानगरपालिकेच्या वतीनं सकाळी आठ ते रात्री आठ
पर्यंत लसीकरण सुरु राहणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली. परभणी
शहरात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवावा यासाठी आयोजित बैठकीत त्या काल बोलत होत्या. या
बैठकीत महापालिकेकडून आतापर्यंत झालेल्या कोरोना लसीकरणाचा आढावा सादर करण्यात आला.
दरम्यान, महापालिका आयुक्त
देविदास पवार यांनी काल परभणी शहरातल्या ७७ स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक घेतली.
ज्या लाभार्थ्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांचं लसीकरण पूर्ण झालं नाही, अशा लाभार्थ्यांना
धान्य देण्यात येऊ नये, लस घेतल्याची पडताळणी करूनच धान्य वितरित करावं, अशा सूचना
पवार यांनी यावेळी दिल्या.
****
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक
स्पर्धेचे सुपर १२ गटातले सामने आजपासून सुरु होत आहेत. आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण
अफ्रिका यांच्यातला सामना अबुधाबी इथं दुपारी साडेतीन वाजता, तर वेस्ट इंडीज आणि इंग्लंड
यांच्यातला सामना दुबई इथं संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे. या गटातला भारताचा
पहिला सामना उद्या पाकिस्तानबरोबर होईल. काल झालेल्या अ गटाच्या सामन्यांमध्ये श्रीलंकेनं
नेदरलँडसवर विजय मिळवला, तर नामिबियानं आयर्लंडविरुद्धचा सामना जिंकून सुपर १२ गटात
प्रवेश मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली.
****
No comments:
Post a Comment