Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 October 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ ऑक्टोबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
देशात कोविड प्रतिबंधक
लसीकरण मोहिमेनं १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हे उद्दीष्ट गाठण्यामध्ये योगदान
देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना ‘आकाशवाणीचा सलाम’. कोरोना विषाणू संसर्गाचा
धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही
लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित
अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड19 शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२
७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
पोलिस विभागातल्या अत्याधुनिक यंत्रणामुळे
गुन्हेसिद्धी आणि शासन प्रक्रियेला गती मिळणार - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन.
·
हज यात्रेला जाणाऱ्या नागरिकांनी
कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेणं आवश्यक.
·
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हिस्सा
लवकर द्यावा - कृषीमंत्री दादा भुसे यांची केंद्राकडे मागणी.
आणि
·
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जीवन कार्यावर आधारित महाकाव्यग्रंथाचं प्रकाशन.
****
पोलिस विभागातल्या अत्याधुनिक यंत्रणामुळे
आवश्यक पुरावे उपलब्ध करणं, आणि गुन्हेगाराला कडक शासन करण्याच्या प्रक्रियेला गती
मिळणार असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. नागपूर इथं फास्टट्रॅक
डीएनए युनिट आणि वन्यजीव डिएनए कक्षाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य
प्रणालीच्या माध्यमातून झालं. त्यावेळी ते बोलत होते. भारतातील वन्यजीवांच्या पहिल्या
तर निर्भया योजनेतंर्गत मानवी डिएनएच्या एकत्रित तीन प्रयोगशाळांचं उद्घाटन देखील त्यांनी
केलं. महिला आणि बालक यांच्या संदर्भातील गुन्ह्यांचा तपास जलदगतीने करताना येणारी
अडचण या प्रयोगशाळेमुळे कमी होवून तपासाला गती येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी
व्यक्त केला. वन्यजीव तस्करांवर कारवाई करण्यात, या प्रयोगशाळेचं योगदान महत्त्वाचं
ठरेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
देशातील चित्रपट निर्मितीचे मुख्य केंद्र
मुंबई आणि सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहील, यासाठी कलाकारांना आवश्यक सर्व सुविधा
शासन उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुणे इथं बालगंधर्व
रंगमंदिरात रंगभूमी पूजन आणि उद्धाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. चित्रपट आणि नाट्यगृहांसाठी
आवश्यक असलेल्या विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्याचा
विचार करण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात स्थावर
मालमत्ता क्षेत्राचा वाटा या दशकाच्या अखेरपर्यंत १८ ते २० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा
अंदाज आहे, असं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे.
ते आज मुंबईत भारतीय उद्योग महासंघ सीआयआयच्या बैठकीत बोलत होते. गेले १८ महिने देशाच्या
अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक होते. लसीकरणाचं वाढतं प्रमाण आणि संसर्गाच्या घटत्या
प्रमाणामुळे आता आशेचा किरण दिसत असल्याचं, कांत म्हणाले.
****
हज यात्रेला जाणाऱ्या नागरिकांसाठी कोविड
प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेणं आवश्यक असणार आहे. अल्पसंख्याक मंत्री मुख्तार
अब्बास नकवी यांनी ही माहिती दिली. ते आज दिल्ली इथं हज यात्रेसंबंधी एका बैठकीत बोलत
होते. कोविड संबंधीत सर्व सूचनांचं पालन करत चालू वर्षासाठीच्या हज यात्रेची तयारी
सुरु करण्यात आली असून नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यात्रेबाबतची घोषणा
केली जाणार आहे.
****
केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा
योजनेचा हिस्सा लवकर द्यावा, अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय
कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यातील २ लाख १२
हजार शेतकऱ्यांनी, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजने अंतर्गत, फळपीक विम्यासाठी
नोंदणी केली असून, १४८ कोटी रुपयांचा राज्य हिस्सा विमा कंपन्याकडे आहे, तरी केंद्रानं
त्यांचा हिस्सा विमा कंपन्यांकडे द्यावा, जेणेकरून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा रक्कम
शक्य होईल, असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
****
यंदाच्या ५२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव,
इफ्फी मध्ये मार्टिन स्कोर्सेज आणि इस्टेवान स्झाबो यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कारानं
सन्मानित केलं जाणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी
ही माहिती दिली. या महोत्सवात ९६ देशांमधले ६२४ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यंदा
प्रथमच इफ्फीमधे ओटीटी प्लॅटफॉर्मला आमंत्रित करण्यात आलं असून ब्रिक्स चित्रपट महोत्सवही
इफ्फी बरोबरच आयोजित केला आहे. देशभरातल्या ३५ वर्षांपेक्षा लहान वयाच्या निवडक ७५
प्रतिभावंतांना चित्रपटक्षेत्रातल्या दिग्गजांबरोबर संवाद साधण्याची संधी या महोत्सवात
मिळणार आहे. यासाठी होणाऱ्या स्पर्धेत येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत प्रवेश नोंदवता येणार
आहे. हा महोत्सव येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोवा इथं होणार आहे.
****
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण
संस्था महाज्योतीचे पात्र एम फिल संशोधक विद्यार्थ्यांनी विविध मागण्यासाठी महाज्योतीच्या
औरंगाबाद विभागीय कार्यालयासमोर आज निदर्शनं केली. विविध मागण्याचे फलक झळकावत या विद्यार्थ्यांनी
घोषणा दिल्या. तसंच या मागण्यांचं निवेदन महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांना सादर
करण्यात आलं.
****
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जीवन कार्यावर आधारित जगातील पहिल्या महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन वाशिम इथं जिल्हाधिकारी
कार्यालयात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते करण्यात आलं. ह्या महाकाव्य
ग्रंथाचे प्रकाशन राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी करण्यात आलं. या महाकाव्यग्रंथामध्ये
तीन पिढ्यातील २०२१ कवींच्या २०२१ कवितांचे संपादन नांदेड इथले प्राध्यापक अशोककुमार
दवणे यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील
येवली इथं कवच कुंडल ७५ तास कोरोना लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी शालेय मुला मुलींनी
जनजागृती प्रचारफेरी काढली होती. या प्रचारफेरीत सरपंच, उपसरपंच, शिक्षक, अंगणवाडी
सेविका यांनी सहभागी होत घरोघरी जाऊन नागरीकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त केलं. दरम्यान,
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील डेरला गावात या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्हा परिषदेतल्या सर्व विभागप्रमुखांनी
कोविड लसीकरण मोहिमेवर तालुकानिहाय सनियंत्रण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी आज जारी केले. जिल्हा परिषदेतले सर्व अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांच्या दोन्ही मात्रांचं नियोजन केलं जाणार आहे. टाकसाळे यांच्या आवाहनाला
प्रतिसाद देत जिल्ह्यात आरटीओ आणि पोलिस विभागाचंही लसीकरण मोहिमेला सहकार्य मिळत आहे.
दरम्यान, पूर्णा तालुक्यात ताडकळस आणि
मानवत तालुक्यात ताडबोरगाव या गावांमध्ये आज लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
****
भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी राज्यात
२६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार
आहे.
//*************//
No comments:
Post a Comment