Wednesday, 20 October 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.10.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 October 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

उडान योजनेअंतर्गत गेल्या काही वर्षांमध्ये ९०० हून अधिक नवीन हवाई मार्गांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी ३५० हून अधिक मार्गावर विमानसेवा सुरू असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. विमानतळाची सेवा उत्तर प्रदेश आणि बिहारच्या जवळपासच्या जिल्ह्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल ठरणार असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. देशाची विमान वाहतूक सेवा व्यावसायिक पद्धतीने चालावी, सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य मिळावं या उद्देशानं एअर इंडियाशी संबंधित मोठं पाऊल देशाने अलीकडेच उचललं असून, हे देशाच्या विमान वाहतूक क्षेत्राला नवी ऊर्जा देणारं ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

दरम्यान, पंतप्रधान आज जागतिक तेल आणि गॅस क्षेत्रातल्या तज्ञांशी आणि प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. या क्षेत्रातल्या प्रमुख अडचणी आणि भारताशी सहकार्य आणि इथे गुंतवणुकीच्या संधी यावर जागतिक पातळीवरच्या तज्ञांशी चर्चा करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

****

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत देश लवकरच १०० कोटी मात्रांचा टप्पा पार करणार आहे. देशात आतापर्यंत या लसीच्या ९९ कोटी १२ लाख ८२ हजार २८३ मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात देशात ४१ लाख ३६ हजार १४२ नागरीकांना लस देण्यात आली.

दरम्यान, देशात काल नव्या १४ हजार ६२३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १९७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ४१ लाख आठ हजार ९९६ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ५२ हजार ६५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल १९ हजार ४४६ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३४ लाख ७८ हजार २४७ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ७८ हजार ९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण अभियानात सीरम इन्स्टिट्युटची भूमिका महत्त्वाची आहे, अशी भावना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी काल व्यक्त केली. पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर त्या बोलत होत्या. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांच्याशी पवार यांनी चर्चा केली.

****

कोविड साथीमुळे दीड वर्षांपासून बंद असलेली महाविद्यालयं आजपासून सुरू झाली. पन्नास टक्के उपस्थितीच्या मर्यादेसह ही महाविद्यालयं उघडली गेली. राज्यातली सर्व कृषी विद्यापीठं आणि त्यांच्याशी संलग्न शासकीय आणि खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयंही, आजपासून सुरु झाली.

****

राज्यात दिवाळीपूर्वीच कापूस खरेदीची सुरुवात होणार असून, त्यासाठी ११६ तालुक्यात १२४ कापूस खरेदी केंद्र उघडण्यात येणार आहेत. कापूस पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर यांनी ही माहिती दिली. १२४ कापूस खरेदी केंद्रांपैकी पणन महासंघाचे ५०, तर सीसीआय चे ७४ खरेदी केंद्र असतील. यंदा कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार २५ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.

****

भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा मंडळ - आयसीएसईनं २०२१-२२ सत्रातल्या दहावी आणि बारावीच्या पहिल्या सहामाहीच्या परीक्षा अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व संबंधितांना या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक योग्य वेळी दिलं जाईल, असंही आयसीएसईनं म्हटलं आहे. आयसीएसईच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा १५ नोव्हेंबर रोजी, तर बारावीच्या परीक्षा १६ डिसेंबर रोजी सुरू होणार होत्या.

****

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पद भरतीसाठी येत्या २४ आणि ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. परीक्षा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने व्हाव्यात यासाठी राज्यस्तरीय निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची आठ परिमंडळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित परिमंडळासाठी संपर्क अधिकारी म्हणून काम करतील. आरोग्य सेवा संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले.

****

मेळघाट आणि इतर आदिवासी भागातल्या कुपोषित गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता तसंच सहा वर्षांखालच्या बालकांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. मेळघाट परिसरातल्या कुपोषण समस्येबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. या भागातल्या रुग्णालयात बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ तसंच भूलतज्ञ ही पदं रिक्त असल्यामुळे कुपोषणाची समस्या वाढत असल्याचं या याचिकेत नमूद केलं आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 مئی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 May-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ت...