Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण
मोहिमेत भारतानं १०० कोटीचा टप्पा पार केला असून, आजच्या दिवसाची इतिहासात नोंद झाली
असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं भारतीय आयुर्विज्ञान
संस्था-एम्सच्या झज्जर परिसरातल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेमधल्या इन्फोसिस फाउंडेशन
विश्राम सदनाचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शंभर
वर्षांतल्या सर्वात मोठ्या महामारीचा सामना करण्यासाठी देशाकडे आता शंभर कोटी लसींच्या
मात्रेचं मजबूत सुरक्षा कवच असल्याचं ते म्हणाले. देशभरात जे नवीन एम्स रुग्णालयं बांधले
जात आहेत, त्याठिकाणी रुग्णांच्या कुटुंबियांसाठी रात्रीचे निवारे असतील, यासाठी सरकार
प्रयत्नशील असल्याचं, पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय कर्करोग संस्था या
रोगाशी लढणाऱ्या हजारो रुग्णांना विविध उपचारपद्धती, औषधे आणि वैद्यकीय सहाय्य मिळवून
देण्यास मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जेव्हा रुग्णाला आयुष्मान भारत योजनेअंतर्गत
मोफत उपचार मिळतात, तेव्हा त्याची सेवा होते. या सेवाभावातूनच आमच्या सरकारने कर्करोगावरील
सुमारे ४०० औषधांच्या किमती कमी करण्यासाठी पावले उचलली असल्याचं, पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, कोविड प्रतिबंधात्मक
लसीकरण मोहिमेत भारतानं १०० कोटी मात्रांचा टप्पा पार केला असून, यानिमित्त पंतप्रधानांनी
आज सकाळी दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी फ्रंटलाईन वर्कर
आणि डॉक्टरांशी संवाद साधला.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख
मांडवीय यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. भारताने १०० कोटींचा टप्पा
पार करून संकल्पशक्तीचं योगदान जगाला दाखवून दिल्याचं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ
सिंह यांनी म्हंटलं आहे.
****
कोविड १९ च्या संकटकाळात कार्यरत
असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत दिलेल्या विमा
संरक्षणाचा अवधी, आणखी १८० दिवसांनी वाढवण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं घेतला आहे.
कोविड रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना संरक्षण कवच मिळावं यादृष्टीनं
ही योजना सुरु केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या विमा पॉलिसीचा कालावधी आजपासून १८० दिवसांसाठी
वाढवण्यात आल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
यशवंतराव चव्हाण हे नेहमी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या कागदातला मजकूर वाचण्यापेक्षा,
त्यातील भावना समजून घेणं आवश्यक आहे, असं सांगत. आज या तत्त्वाचा सर्वांनीच अंगीकार
करण्याची आवश्यकता असल्याचं, गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी म्हटलं आहे. पोलीस
अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पदोन्नतीची संधी उपलब्ध करुन देण्याबाबत
राज्य शासनानं घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगानं, पोलीस कॉन्स्टेबल संवर्गातर्फे मुख्यमंत्री
तसंच गृहमंत्र्यांच्या आभार प्रदर्शन कार्यक्रमाचं, आज मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं,
त्यावेळी ते बोलत होते. या निर्णयामुळे पोलीस विभागाची ताकद तसंच क्षमता वाढणार आहे.
सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या शासनाच्या भूमिकेला चालना मिळणार असून, गुन्हे निकाली
निघण्यास गती मिळेल, अशा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
केंद्र सरकारनं प्रधानमंत्री
पीक विमा योजनेचा केंद्राचा हिस्सा लवकर द्यावा, अशी मागणी, राज्याचे कृषिमंत्री दादा
भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्य शासनाच्या अनुदान रक्कमेपोटीचा ९७३ कोटी रुपये हप्ता, पाच ऑक्टोबरलाच विमा कंपन्यांकडे
जमा करण्यात आला असून, केंद्र शासनाने त्यांच्याकडील ९०० कोटी रुपये हप्ता विमा कंपन्यांना
लवकर द्यावा, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देणं शक्य होईल, असं त्यांनी
आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
****
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत
२० ऑक्टोबर अखेर ९४ टक्के वितरण करून सिंधुदुर्ग जिल्ह्यानं राज्यात पहिल्या क्रमांक
मिळवला आहे. त्याबद्दल जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांचं कौतुक
केलं आहे. शासनाच्या विविध योजनांची प्रकरण अद्यापही ज्या बँकांच्या शाखांकडे प्रलंबित
आहेत, ती त्वरित मार्गी लावावीत. त्यासाठी त्यांची बैठक घ्यावी, अस निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी
दिले आहेत.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठाच्या नवीन इमारतीचं लोकापर्ण शनिवार २३ ऑक्टोबरला सरन्यायधीश एन. व्ही. रमणा
यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री किरेन रिजीजू, मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यावेळी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या
वकील संघाला याबाबत कुठल्याही प्रकारची कल्पना न देता हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल
वकील संघानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे नाराजी व्यक्त केली.
****
No comments:
Post a Comment