Friday, 22 October 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.10.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 October 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

कोविड विरोधातल्या लढाईत कोणतीही शिथिलता न आणण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भारतानं केवळ नऊ महिन्यांत १०० कोटींहून अधिक लसीकरण करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. लसीकरणाबाबतच्या या कामगिरीदरम्यान, पंतप्रधानांनी आज देशाला संबोधित केलं. आपण आपले सण अत्यंत काळजीपूर्वक साजरे केले पाहिजेत, असं ते म्हणाले. १०० कोटी लसीचे डोस हे केवळ आकडे नाहीत, तर हे देशाच्या सामर्थ्याचं प्रतिबिंब असल्याचं, त्यांनी नमूद केलं. व्हीआयपी संस्कृती लसीकरण संस्कृतीवर वर्चस्व गाजवू नये याची खात्री करण्यात आली. प्रत्येकाला सामान्य माणसाप्रमाणे लसीकरण झालं. कोविन ॲपनं वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील ताण कमी झाला असून, कोविन ॲप जागतिक स्तरावर आकर्षणाचा केंद्रबिंदू असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. या विक्रमामुळे नवीन भारताचं संपूर्ण जगाला दर्शन घडलं असून, देशाची एकता लसीकरण मोहिमेला यशस्वी बनवण्यात मोलाची ठरली असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

****

दरम्यान, देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या १०० कोटी ५९ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात देशात ६१ लाख २७ हजार नागरीकांना लस देण्यात आली.

देशात काल नव्या १५ हजार ७८६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २३१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ४१ लाख ४३ हजार २३६ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ५३ हजार ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल १८ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३५ लाख १४ हजार ४४९ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ७५ हजार ७४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

राज्यातली चित्रपटगृहं, नाट्यगृहं, बंदिस्त सभागृहं, अम्युझमेंट पार्क्स आजपासून सुरू झाली. कोरोना प्रतिबंधक सर्व प्रकारच्या खबरदारी घेऊन ५० टक्के क्षमतेनं ही ठिकाणं खुली झाली आहेत.

दरम्यान, दिवाळीनंतर राज्यातली नाट्यगृह शंभर टक्के क्षमतेनं सुरु करण्यासंदर्भात विचार केला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते.

****

डिजिटल सोने व्यवहार करणं बेकायदेशीर असून, या प्रकारापासून गुंतवणूकदारांनी दूर रहावं, असा इशारा सेबीनं दिला आहे. काही नोंदणीकृत गुंतवणूकदारही डिजीटल सोन्यासह परवानगी नसलेले व्यवहार करण्याची सोय उपलब्ध करून देत असल्याचं निदर्शनास आलं असल्याचं, सेबीनं म्हटलं आहे. या इशाऱ्यानंतरही बेकायदा व्यवहार झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही सेबीनं दिला आहे.  

****

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये, तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं. काल मुंबई इथं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. गट-अ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, उपअधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी गट-ब या पदांचं नव्यानं सेवाप्रवेश नियमांचं प्रारुप, वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तयार करण्यात येत असून, प्रारुप तयार झाल्यावर सेवा नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचं, देशमुख यांनी सांगितलं.

****

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण उद्या शनिवारी २३ ऑक्टोबरला सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री किरेन रिजीजू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री किरेन रिजीजू आज सायंकाळी औरंगाबाद इथं दाखल होत आहेत.

****

परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ कार्यकारी परिषदेनं केलेला ठराव रद्द करावा, तसंच प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी विद्यापीठातल्या प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास २५ ऑक्टोबर रोजी सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा या कंत्राटदारांनी दिला आहे. प्रकल्पग्रस्त मजूर कंत्राटदाराना कंत्राटी कामं देण्याच्या संदर्भात कार्यकारणीच्या बैठकीत, ज्या कुटुंबात एकही व्यक्ती कायम नोकरीस नाही किंवा त्यांच्या कुटूंबातली एकही व्यक्ती सेवानिवृत्त झालेली नाही, अश्याच प्रकल्पग्रस्त मजूर कंत्राटदरांना कामे देण्यात येतील आणि इतर कंत्राटदरांना अपात्र ठरवण्यात येईल, असा ठराव घेण्यात आलेला आहे.

****

नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीस ३१ ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 22 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...