Friday, 22 October 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.10.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 October 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १०० कोटी कोविड प्रतिबंधक लस देण्याचं उद्दीष्ट पूर्ण झालं आहे. ही उद्दीष्टपूर्ती करण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत १०० कोटीचा टप्पा पार; अभियानात सहभागी सर्वांच्या प्रती पंतप्रधानांकडून कृतज्ञता व्यक्त 

·      राज्यातली चित्रपटगृह, नाट्यगृह, बंदिस्त सभागृह, अम्युझमेंट पार्क्स आजपासून सुरू होणार

·      महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २५ ऑक्टोबरपासून `मिशन कोविड लसीकरण` कार्यक्रम

·      राज्यात नवे एक हजार ५७३ कोविडग्रस्त; मराठवाड्यात तिघांचा मृत्यू तर नव्या ६७ रुग्णांची नोंद

·      केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ

·      येत्या सहा महिन्यात प्रत्येक वाहनाला ‘फ्लेक्स फ्युएल इंजिन अनिवार्य करण्यात येणार

आणि

·      शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्यास राज्यशासन प्रयत्नशील- मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची माहिती  

****

देशानं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत काल १०० कोटीचा टप्पा पार केला. शंभर कोटी मात्रांचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचं आभार मानलं आहे. तसंच डॉक्टर, परिचारिका आणि या अभियानात सहभागी असलेल्या सर्वांच्या प्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हे देशाच्या विज्ञानाचं आणि १३० कोटी देशवासियांच्या एकत्रित प्रयत्नांचं फलित असल्याचं, पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.

इतिहासात नोंद झालेला हा क्षण ‘उल्लेखनीय यश म्हणून साजरा करण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं घेतला आहे. देशभरातल्या शंभर स्मारकांवर रोषणाई करण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद इथला बिबी का मकबरा, दौलताबाद इथला देवगिरी किल्ला तसंच अहमदनगर इथल्या सलाबतखान कबरीचा समावेश आहे.

****

राज्यातली चित्रपटगृह, नाट्यगृह, बंदिस्त सभागृह, अम्युझमेंट पार्क्स आजपासून सुरू होणार आहेत. या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी संवाद पुणेतर्फे काल बालगंधर्व रंगमंदिरात नटराज पूजन करण्यात आलं. कोरोना प्रतिबंधक सर्वप्रकारच्या खबरदारी घेऊन ५० टक्के क्षमतेनं ही ठिकाणं आजपासून खुली होणार आहेत.

****

राज्यातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी येत्या २५ ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान `मिशन युवा स्वास्थ कोविड लसीकरण` कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली. राज्यात कालपासून महाविद्यालयं सुरू झाली, या पार्श्वभूमीवर लसीकरणाला गती देण्याच्या उद्देशानं, उच्च आणि तंत्रशिक्षण, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून, १८ वर्षांवरील युवा वर्गाच्या लसीकरणासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं, टोपे यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ४० लाखांपर्यत जाते. या लसीकरण मोहिमेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयांना पुरस्कार देणार असल्याचंही टोपे यांनी सांगितलं.

****

राज्यात काल एक हजार ५७३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ९८ हजार, २१८ झाली आहे. काल ३९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार ९२५ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल दोन हजार ९६८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ३० हजार ३९४ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ४६ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २४ हजार २९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ६७ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात २५ नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात २२, उस्मानाबाद दहा, नांदेड पाच, लातूर तीन, तर जालना जिल्ह्यात दोन रुग्ण आढळले. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****


जालना जिल्ह्यात येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत ७५ टक्के नागरिकांचं कोवीड लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सध्या जिल्ह्यातली महाविद्यालयं सुरु करण्यात आली असून, या महाविद्यालयांमधून विशेष लसीकरण शिबिरांचं आयोजन करण्यात यावं, तसंच ग्रामीण भागामध्ये लसीकरणाचा टक्का वाढावा यासाठी लोकप्रतिनिधी, धर्मगुरु आदींची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

****

केंद्रीय मंत्रिमंडळानं केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये, तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महागाई भत्ता ३१ टक्के झाला आहे. यंदाच्या जुलैपासून ही वाढ लागू होणार आहे. केंद्र सरकारमध्ये कार्यरत ४७ लाखाहून अधिक अधिकारी-कर्मचारी, आणि साडे ६८ लाखांहून अधिक निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ होईल, अशी माहिती, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याला मान्यता दिली आहे.

****

आगामी काही काळातच सर्व प्रकारच्या वाहनांच्या इंजिनामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल, आणि येत्या सहा महिन्यात प्रत्येक वाहनाला ‘फ्लेक्स फ्यूएल इंजिन अनिवार्य करण्यात येणार आहे, अशी माहिती, केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नवी दिल्लीत फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीच्या, ‘ग्रीन एनर्जी अवॉर्डच्या कार्यक्रमात ते बोलत होते. एकापेक्षा अधिक इंधनावर चालणारं फ्लेक्स इंजिन बनवणं, वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना अनिवार्य करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. पेट्रोल, डिझेलची ऐंशी टक्के आयात संपवून ती शून्य टक्क्यावर न्यायची आहे, कारण पर्यावरणाच्या दृष्टीनं डिझेल अधिक घातक असल्याचं सिद्ध झालं असल्याचं, गडकरी यांनी सांगितलं.

****


आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत होणाऱ्या आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत, " राष्ट्रीय सभेचे नेमस्तपर्व ", या विषयावर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या प्राध्यापक डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांचं व्याख्यान आज प्रसारित होणार आहे. राष्ट्रीय सभेचा आणि एकूणच भारतीय उपखंडामध्ये आपण एक राष्ट्र आहोत, या भावनेचा उदय कसा होत गेला यासंबंधी माहिती देतांना त्या म्हणाल्या

 बंगालमध्ये निळीच्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर महाराष्ट्रातील माणसांना तो डाचू लागला. दीनबंधू मित्र यांचं नील दर्पण हे या विषयावरचं नाटक महात्मा फुले यांचे सहकारी मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी मराठीमध्ये १८७२ मध्ये भाषांतरित केलं. त्यामुळे आपले हितसंबंध एक आहेत ही जाणीव मराठी लोकांना झाली. म्हणजेच आपल्या भाषा, प्रांत वेगळे असले तरी राष्ट्र म्हणून आपण एक आहोत अशी राष्ट्रीयत्वाची भावना याकाळामध्ये घडू लागली. पुढे भारतीय स्वातंत्र्याची चळवळ सत्य आणि अहिंसेच्या मार्गानं स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची स्थापना करण्यासाठी प्रयत्नशील झाली असं म्हणता येतं.

 

आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून आज सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी हे व्याख्यान प्रसारित होईल.

****

राज्यातल्या ॲटोरिक्षा, टॅक्सी आणि ट्रक चालक यासारख्या असंघटित वाहनचालकांच्या हितासाठी, कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे. तामिळनाडूच्या धर्तीवर हे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. यासाठी संबंधित विभागांकडून प्रस्ताव सादर करण्याबाबत तसंच यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्याबाबतच्या सूचना मुश्रीफ यांनी संबंधित विभागाला दिल्या.

****

प्रसिद्ध कला दिग्दर्शक लीलाधर सावंत याचं काल दुपारी वाशीम जिल्ह्यातल्या जऊळका- रेल्वे इथं दीर्घ आजारानं निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. मूळ कोकणातल्या सिंधदुर्गचे रहिवासी असलेले लीलाधर सावंत यांनी, १७७ हिंदी चित्रपटांचं आणि चार हॉलिवूडच्या चित्रपटांच कला दिग्दर्शन केलं. त्यांना वर्ष १९८८ मध्ये ‘हत्या या चित्रपटातल्या कला दिग्दर्शनासाठी, फिल्मफेअर पुरस्कार, तसंच ‘कामचोर या चित्रपटासाठी, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ते गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टी सोडून जऊळका इथं शेतीत विविध प्रयोग करत होते.

****

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्यास राज्यशासन प्रयत्नशील असल्याचं, मृद आणि जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी म्हटलं आहे. गडाख यांनी काल वाशी आणि कळंब तालुक्यात कोल्हापुरी बंधाऱ्यांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. लातूर जिल्ह्याप्रमाणे बंधाऱ्यांना एकत्रित स्वयंचलित दारं बसवण्यात येतील, यासाठी जिल्ह्यातल्या तेरणा आणि मांजरा नदीवरच्या सर्व २४ प्रकल्पांचं सर्वेक्षण करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्याचं गडाख यांनी सांगितलं.

दरम्यान, उस्मानाबाद इथं माता आणि बाल संगोपन विभागाच्या शंभर खाटांच्या रुग्णालयास मंजुरी मिळाली आहे. त्यास लवकरच शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, ती जागा लवकर मिळेल, असं आश्वासन पालकमंत्री गडाख यांनी काल दिलं.

****

नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्याने उध्वस्त झालेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ येवू देवू नये, असं आवाहन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला केलं आहे. ते काल परभणीत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्याना पंचनाम्याशिवाय मदत करण्याचं धाडस दाखवावं, असं ते म्हणाले. मराठवाड्यात ३८ लाख ७७ हजार हेक्टर शेतजमीनीवरील पिकांचं नुकसान झालं आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार वेळकाढू धोरण अवलंबत असल्याची टीकाही, पाटील यांनी केली. येत्या एक नोव्हेंबर रोजी भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते काळी फित लावून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.

****

अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं जाहीर केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार असल्याची टीका, भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांनी केली आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर काल झालेल्या जनआक्रोश आंदोलनात ते बोलत होते. प्रतिहेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवावी, अशी मागणीही काळे यांनी यावेळी केली.

****

बीड जिल्ह्यातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी यांचं पक्षात स्वागत करताना, त्यांच्या पक्ष प्रवेशानं बीड जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. राजकिशोर मोदी यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 17 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...