Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 October 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३
ऑक्टोबर
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण
मोहिमेत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ही उद्दीष्टपूर्ती करण्यामध्ये योगदान देणारे
डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही
कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी
मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात,
चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या
मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठाच्या नवीन इमारतीचं आज सरन्यायाधीशांच्या हस्ते लोकार्पण
·
पोलिस विभागातल्या अत्याधुनिक
यंत्रणामुळे गुन्हेसिद्धी आणि शासन प्रक्रियेला गती मिळणार - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
·
राज्यात नवे एक हजार ६३२
कोविडग्रस्त; मराठवाड्यात दोघांचा मृत्यू तर नव्या ६५ रुग्णांची नोंद
·
हज यात्रेला जाणाऱ्या नागरिकांनी
कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेणं आवश्यक
·
राज्यातली चित्रपटगृह तसंच
नाट्यगृह, कालपासून ५० टक्के क्षमतेने सुरू
·
शैक्षणिक गुणवत्ता वाढवणं
हे शासनाचं उद्दिष्ट - शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
आणि
·
मतदार याद्यांच्या पुनरीक्षण
कार्यक्रमासंदर्भात राज्यभर १६ नोव्हेंबरला विशेष ग्रामसभांचं आयोजन
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण आज सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या
हस्ते होणार आहे. केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री किरेन रिजीजू, मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यावेळी उपस्थित राहणार आहेत.
****
पोलिस विभागातल्या अत्याधुनिक
यंत्रणांमुळे आवश्यक पुरावे उपलब्ध करणं, आणि गुन्हेगाराला कडक शासन करण्याच्या प्रक्रियेला
गती मिळणार असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. काल नागपूर इथं फास्टट्रॅक
डीएनए युनिट आणि वन्यजीव डिएनए कक्षाचं उद्घाटन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य
प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारतातल्या वन्यजीवांच्या पहिल्या,
तर निर्भया योजनेतंर्गत मानवी डिएनएच्या एकत्रित तीन प्रयोगशाळांचं उद्घाटन देखील यावेळी
करण्यात आलं. महिला आणि बालक यांच्या संदर्भातल्या गुन्ह्यांचा तपास जलदगतीनं करताना
येणारी अडचण या प्रयोगशाळेमुळे कमी होवून तपासाला गती येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी
व्यक्त केला. वन्यजीव तस्करांवर कारवाई करण्यात, या प्रयोगशाळेचं योगदान महत्त्वाचं
ठरेल, असं ते म्हणाले.
दरम्यान, व्याघ्र प्रकल्प
क्षेत्रांचं व्यवस्थापन तसंच जैवविविधतेचं संवर्धन करताना, स्थानिकांना रोजगार उपलब्ध
व्हावा, यासाठी विविध विभागांच्या योजनांची सांगड घालण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी
दिले आहेत. काल, व्याघ्र संवर्धन नियामक मंडळाच्या बैठकीत चालू वर्षाच्या अर्थसंकल्पास
मंजुरी देण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. व्याघ्र प्रकल्पातल्या रस्त्यांवरच्या
चुकीच्या दुभाजकामुळे वन्यजीव अपघातात बळी पडत आहेत, हे टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेला
तत्काळ सूचित करावं, रेल्वे मार्गामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, असंही
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
देशाच्या स्थूल राष्ट्रीय
उत्पन्नात स्थावर मालमत्ता क्षेत्राचा वाटा, या दशकाच्या अखेरपर्यंत १८ ते २० टक्क्यांपर्यंत
पोहोचण्याचा अंदाज असल्याचं, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी
म्हटलं आहे. ते काल मुंबईत भारतीय उद्योग महासंघ - सीआयआयच्या बैठकीत बोलत होते. गेले
१८ महिने देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक होते. लसीकरणाचं वाढतं प्रमाण आणि
संसर्गाच्या घटत्या प्रमाणामुळे आता आशेचा किरण दिसत असल्याचं, कांत म्हणाले.
****
राज्यात काल एक हजार ६३२
नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण
संख्या ६५ लाख ९९ हजार, ८५० झाली आहे. काल ४० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार ९६५ झाली असून,
मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल एक हजार ७४४ रुग्ण बरे झाले,
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ३२ हजार १३८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले
असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ४६ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २४ हजार
१३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ६५ नवीन
कोविड बाधितांची नोंद झाली, तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत दोघे
जण औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत.
बीड जिल्ह्यात १८ नवे रुग्ण
आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात १७, लातूर ११, औरंगाबाद दहा, नांदेड चार, जालना तसंच हिंगोली
जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर परभणी जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळला.
****
हज यात्रेला जाणाऱ्या नागरिकांसाठी
कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेणं आवश्यक असणार आहे. अल्पसंख्याक मंत्री
मुख्तार अब्बास नकवी यांनी ही माहिती दिली. ते काल दिल्ली इथं हज यात्रेसंबंधी एका
बैठकीत बोलत होते. कोविड संबंधीत सर्व सूचनांचं पालन करत चालू वर्षासाठीच्या हज यात्रेची
तयारी सुरु करण्यात आली असून, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यात्रेबाबतची
घोषणा केली जाणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या
आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा
हा ८२वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा
कार्यक्रम प्रसारित होईल.
दरम्यान, पंतप्रधान आज सकाळी
११ वाजता आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा योजनेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या
माध्यमातून संवाद साधणार आहेत.
****
यंदाच्या ५२ व्या भारतीय
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फी मध्ये, मार्टिन स्कोर्सेज आणि इस्टेवान स्झाबो
यांना, सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. केंद्रीय माहिती
आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ही माहिती दिली. या महोत्सवात ९६ देशांमधले
६२४ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यंदा प्रथमच इफ्फीमधे ओटीटी प्लॅटफॉर्मला आमंत्रित
करण्यात आलं असून, ब्रिक्स चित्रपट महोत्सवही इफ्फी बरोबरच आयोजित केला आहे. देशभरातल्या
३५ वर्षापेक्षा लहान वयाच्या निवडक ७५ प्रतिभावंतांना, चित्रपटक्षेत्रातल्या दिग्गजांबरोबर
संवाद साधण्याची संधी, या महोत्सवात मिळणार आहे. यासाठी होणाऱ्या स्पर्धेत येत्या ३०
ऑक्टोबरपर्यंत प्रवेश नोंदवता येणार आहे. हा महोत्सव येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान
गोवा इथं होणार आहे.
****
राज्यातली चित्रपटगृह, नाट्यगृह,
बंदिस्त सभागृह, अम्युझमेंट पार्क्स कालपासून सुरू झाली. कोरोना प्रतिबंधक सर्वप्रकारच्या
खबरदारी घेऊन ५० टक्के क्षमतेनं ही ठिकाणं खुली झाली आहेत. दिवाळीनंतर राज्यातली नाट्यगृह
शंभर टक्के क्षमतेनं सुरु करण्यासंदर्भात विचार केला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी सांगितलं. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते.
दरम्यान, देशातलं चित्रपट
निर्मितीचे मुख्य केंद्र मुंबई आणि सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहील, यासाठी कलाकारांना
आवश्यक सर्व सुविधा शासन उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही, अजित पवार यांनी दिली. पुणे
इथं बालगंधर्व रंगमंदिरात रंगभूमी पूजन आणि उद्धाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. चित्रपट
आणि नाट्यगृहांसाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या देण्यासाठी, एक खिडकी सुविधा उपलब्ध
करून देण्याचा विचार करण्यात येत असल्याचं, त्यांनी यावेळी सांगितलं.
****
शाळांच्या पायाभूत सुविधांबरोबरच
शैक्षणिक गुणवत्ता वाढवणं, हे शासनाचं उद्दिष्ट असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री वर्षा
गायकवाड यांनी म्हटलं आहे. निजामकालीन शाळांचा विकास आणि आदर्श शाळा योजनेबाबत सुरू
असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी, दूरदृश्य प्रणालीद्वारे काल झालेल्या बैठकीत त्या
बोलत होत्या. प्रत्येक जिल्ह्यात आदर्श शाळा योजनेची, आणि संबंधित जिल्ह्यांमध्ये निजामकालीन
शाळांच्या विकासाच्या कामांची अंमलबजावणी तातडीनं होणे गरजेचं असल्याचं, त्या यावेळी
म्हणाल्या. शाळा दुरूस्तीसाठी नियोजन आवश्यक असून, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून
निधी उभा करावा, तसंच जिल्ह्यांनी आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती त्वरीत सादर करावी,
असे निर्देशही गायकवाड यांनी दिले.
****
मतदार याद्यांच्या पुनरीक्षण
कार्यक्रमासंदर्भात राज्यभर १६ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा बोलवण्यात येणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत ही
माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक
१३ आणि १४ नोव्हेंबर तसंच २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम आयोजित
करण्यात येत असल्याचं, देशपांडे यांनी सांगितलं. राज्यात दुबार नोंदणी झालेल्या मतदारांची
संख्या आता पाच लाखावरुन कमी होऊन १३ हजार झाली असून, या मतदारांची चौकशी आता मतदान
केंद्र स्तरावर होत असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठातल्या इन्क्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून, विद्यापीठाच्या लौकिकात वाढ व्हावी,
अशी अपेक्षा, उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली
आहे. ते काल विद्यापीठात इनक्यूबेशन सेंटरबाबत झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. या
केंद्राच्या माध्यमातून संशोधन, रोजगार निर्माणात भरीव वाढ व्हावी असं मत त्यांनी व्यक्त
केलं.
****
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन
आणि प्रशिक्षण संस्था महाज्योतीच्या पात्र एम फिल संशोधक विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी,
महाज्योतीच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयासमोर काल निदर्शनं केली. विविध मागण्यांचं
फलक झळकावत या विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. तसंच या मागण्यांचं निवेदन महाज्योतीच्या
व्यवस्थापकीय संचालकांना सादर करण्यात आलं.
****
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जीवन कार्यावर आधारित जगातल्या पहिल्या महाकाव्यग्रंथाचं प्रकाशन, वाशिम इथं
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते करण्यात आलं. ह्या महाकाव्य ग्रंथाचं प्रकाशन
राज्यातल्या ३६ जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी करण्यात आलं. या महाकाव्यग्रंथामध्ये तीन
पिढ्यातील २०२१ कवींच्या २०२१ कवितांचं संपादन, नांदेड इथले प्राध्यापक अशोककुमार दवणे
यांनी केलं आहे.
****
परभणी जिल्हा परिषदेतल्या
सर्व विभागप्रमुखांनी कोविड लसीकरण मोहिमेवर तालुकानिहाय सनियंत्रण करण्याचे आदेश,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी काल जारी केले. जिल्हा
परिषदेतले सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दोन्ही मात्रांचं नियोजन केलं जाणार आहे.
टाकसाळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात आरटीओ आणि पोलिस विभागाचंही लसीकरण
मोहिमेला सहकार्य मिळत आहे.
दरम्यान, पूर्णा तालुक्यात
ताडकळस आणि मानवत तालुक्यात ताडबोरगाव या गावांमध्ये, काल लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्याच्या हदगाव
तालुक्यातल्या येवली इथं, कवच कुंडल ७५ तास कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी,
शालेय मुला मुलींनी काल जनजागृती प्रचारफेरी काढली. या प्रचारफेरीत सरपंच, उपसरपंच,
शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी सहभागी होत, घरोघरी जाऊन नागरीकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त
केलं.
दरम्यान, नांदेड जिल्ह्याच्या
लोहा तालुक्यातल्या डेरला गावात या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सामाजिक अधिकारिता आणि राष्ट्रीय
वयोश्री योजनेअंतर्गत, हिंगोली लोकसभा मतदार संघातल्या वसमत तालुक्यातल्या ६७० दिव्यांग
तसंच ज्येष्ठ नागरिकांना, आज आवश्यक साहित्याचं निःशुल्क वाटप केलं जाणार आहे. खासदार
हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून होणाऱ्या या कार्यक्रमात, तपासणी झालेल्या गरजूंना
कृत्रिम अवयव, तिचाकी सायकल, चाकाची खुर्ची, सायकल, श्रवणयंत्र, कॅलिपर, ब्रेल किट
आदी साहित्याचं वाटप केलं जाणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात पाथरी इथं
उभारण्यात आलेल्या राम मंदिराचं २५ ते २८ ऑक्टोबरदरम्यान लोकार्पण करण्यात येणार आहे.
यासंदर्भात काल आढावा बैठक घेण्यात आली. आपल्या निधीतून राम मंदीर उभारण्यात आल्याबद्दल
आनंद होत असल्याची भावना आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी यावेळी व्यक्त केली.
****
हवामान
विदर्भात अनेक ठिकाणी किमान
तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. येत्या दोन दिवसांत कोकणात तुरळक
ठिकाणी पावसाची शक्यता असून, राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा पुणे
वेधशाळेचा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment