Tuesday, 21 December 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 December 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 December 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ डिसेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्य विधीमंडळाचं उद्यापासून मुंबईत हिवाळी अधिवेशन, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार.

·      आधार क्रमांक मतदान ओळख पत्राशी संलग्न करण्याची तरतूद असलेलं निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजूर.

·      राज्यात १०५ नगरपंचायत तसंच भंडारा आणि गोदिंया या दोन जिल्हा परिषदेसाठी किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान.

आणि

·      वकील गैरहजर राहिल्याच्या कारणावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५० हजार रुपयांचा दंड.

****

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर आज या आरटी-पीसीआर चाचणी, सुरक्षा, कोविड प्रतिबंधात्मक कार्यवाही, सभागृहातील आसन व्यवस्था, अग्निसुरक्षा, उपहारगृह या उपाय योजनांसंदर्भात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना सभापती नाईक -निंबाळकर यांनी यावेळी दिल्या.

****

दरम्यान, उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रीमंडळाची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत अधिवेशनात मांडण्यात येणारी विधेयकं आणि कामकाजाबाबत चर्चा केली जाणार आहे.

या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. सरकारच्या चहापान कार्यक्रमाला जाणार नसल्याचं विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.

यावेळी त्यांन इतर मागासवर्गीय - ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा खंडीत करणं, पेट्रोल-डिझेलचे भाव केंद्रानं कमी केल्यानंतर राज्यानं मूल्यवर्धित कर कमी न करण, दुसरीकडे विदेशी मद्यावरचा कर ५० टक्के कमी करणं आदी मुद्यांवरून सरकारवर घणाघाती टीका केली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसीचं आरक्षण गेलं आहे. त्याचा जाब आम्ही अधिवेशनात सरकारला विचारणार आहोत”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीतही राज्यात वाईट परिस्थिती आहे. जुने गृहमंत्री अटकेत आहेत. जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये अवैध रेती, दारू, सट्टा, सर्व प्रकारची अवैध कामं, सुपारी घेऊन जमिनी लाटण्यासारखी प्रकरणं वाढली आहेत. महिलांवरील अत्याचार वाढले असल्याचं फडणवीस म्हणाले.

आरोग्य, राज्य गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास- म्हाडा आणि, शिक्षक पात्रता परीक्षेत घोळ आहे. परीक्षांचं रॅकेट मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. या रॅकेटचाही पर्दाफाश विरोधी पश्र अधिवेशनात करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

आधार क्रमांक मतदान ओळख पत्राशी संलग्न करण्याची तरतूद असलेलं निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ आज राज्यसभेत मंजूर झालं आहे. काल हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं होतं. त्यामुळे आता यासंबंधी कायदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक सुधारणांच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

बोगस मतदान रोखण्यासाठी यामुळे मदत होईल, असं या विधेयकाच्या मसुद्यात म्हटलं आहे. मतदार यादीही आधारशी संलग्न करण्याचा यात प्रस्ताव आहे.

दुसरीकडे लोकसभेत महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज विरोधकांच्या गोंधळातच मुलींचं विवाहाचं वय १८ वरुन २१ करण्याची तरतूद असलेलं बाल विवाह प्रतिबंधक सुधारणा विधेयक २०२१ सादर केलं. विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध करत ते स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली.

****

राज्यात आज १०५ नगरपंचायत तसंच भंडारा आणि गोदिंया या दोन जिल्हा परिषद आणि १५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी किरकोळ बाचाबाचीच्या घटना वगळता शांततेत मतदान पार पडलं. महानगरपालिका, नगरपालिका तसंच ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठीच्या पोटनिवडणुकींसाठीही आज मतदान झालं. १९ जानेवारीला या मतदानाची मोजणी होणार आहे.

दुपारी साडेतीन वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात नायगाव नगरपंचायतीसाठी ७०.६३ तर अर्धापूरमध्ये ६५.५८ टक्के, जालना जिल्ह्यातील घनसावंगीमध्ये ७६.७८, तीर्थपुरी-७२.५२, बदनापूर - ६७.२९ मंठा-६७.८४ तर जाफ्राबादमध्ये ६६.१५ टक्के मतदान झालं. परभणी जिल्ह्यात पालममध्ये ७१ टक्के मतदान झालं.

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीसाठी ६७.६६ टक्के तर कडेगाव नगरपंचायतीत - ६७ टक्के मतदान झालं.

भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५३.६६ टक्के मतदान झालं.

जालना जिल्ह्यात बदनापूर नगरपंचायतीच्या मतदानादरम्यान महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बोगस मतदान करत असल्याचा आरोपावरून बाचाबाची आणि हाणामारी झाली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करुन केंद्राबाहेरील तणाव कमी केला.

****

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्धच्या भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांची समांतर चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्ती के. यु. चांदिवाल आयोगानं उलटतपासणी घेण्यासाठी वकील गैरहजर राहिल्याच्या कारणावरून देशमुख यांना ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. आयोगानं आज या प्रकरणातील एक साक्षीदार सचिन वाझेची उलटतपासणी ठेवली होती. यासाठी देशमुख आणि वाझे या दोघांनाही तुरूंग प्रशासनानं आयोगापुढे हजर केलं. मात्र ऐनवेळी देशमुखांचे वकीलच गैरहजर राहिल्यानं आयोगाचं कामकाज होऊ शकलं नाही. त्यामुळे आयोगाचा वेळ खर्ची पडल्याबद्दल देशमुखांना ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. देशमुखांना दंडाची ही रक्कम मुख्यमंत्री मदत निधीत जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वीही देशमुख यांच्या वकिलांनी आयोगाकडे वेळ मागितल्यानं देशमुखांना १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

****

 राज्यात आतापर्यंत आठ कोटी लोकांनी कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला असून राज्य सरकार लसीकरणावर लक्ष ठेवून असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं ते बोलत होते. पहिला डोस घेण्याचं हे प्रमाण ८७ टक्के असून दुसरा डोस ५५ टक्के लोकांनी घेतला आहे, असं ते म्हणाले. राज्यात अद्याप एक कोटी लोकांनी पहिला डोस घेतला नाही. डोस न घेणाऱ्या लोकांची यादी तयार करून त्यांना लसीकरणासाठी तयार केलं जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. सध्या दररोज सहा ते साडेसहा लाख लसीकरण केलं जात आहे, असं ते म्हणाले.

//***********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...