Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 December 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ डिसेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
लखीमपूर
खेरी प्रकरण आणि अन्य मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही
सदनांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
राज्यसभेत
कामकाज सुरु होताच लखीमपूर खेरी प्रकरणावर चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी, सभापती
एम व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावली. त्यामुळे काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, द्रविड
मुनेत्र कळघम यासह अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी, जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात
केली, त्यामुळे सभापतींनी राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.
लोकसभेत
विरोधकांच्या गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास सुरु झाला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सदनाच्या
मधोमध येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अध्यक्षांनी शांततेचं आवाहन करुनही गदारोळ
सुरुं राहील्यानं, लोकसभेचं कामकाजही दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
****
राज्यात
इतर मागासवर्गीय- ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणाऱ्या १०६ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी
आज मतदान होत आहे. मराठवाड्यातल्या २३ नगरपंचायती तसंच ग्रामपंचायतीमधल्या १८१ जागांसाठी
शांततेत मतदान सुरु आहे. याशिवाय परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या नर्हापूर, देऊळगाव
दुधाट, सोनखेड आणि रुंज इथल्या ग्राम पंचायतींच्या चार रिक्त जागा, नांदेड महानगरपालिकेच्या
प्रभाग क्रमांक तीन मध्ये, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री नगर पंचायतीच्या दोन
जागांसाठीही आज मतदान सुरु आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या
अर्धापूर नगर पंचायतीत एक हजार ३६२ पैकी ४१५ मतदारांनी मतदान केलं. तर नायगाव नगर पंचायतीसाठी
सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झालं.
जालना जिल्ह्यातल्या
घनसावंगी नगर पंचायतीमध्ये सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत ३७ पूर्णांक १३ टक्के मतदान
झालं.
दरम्यान,
ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार इतर मागासवर्गीय
प्रवर्गातील जागा अनारक्षित करुन, त्या जागांवर येत्या १८ जानेवारी रोजी मतदान होईल.
या सर्व निवडणुकांची मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे.
****
शिक्षक पात्रता
परीक्षा - टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांची आज राज्य शिक्षण परिषदेचे माजी विभागीय
अध्यक्ष सुखदेव डेरे यांच्यासह परीक्षेचं कंत्राट मिळालेल्या कंपनीच्या प्रमुखाला अटक
केली आहे. डेरे यांच्या काळात २०१७ साली जीए टेक्नॉलॉजीला शिक्षण परिषदेकडून परीक्षा
घेण्याचं कंत्राट मिळालं होतं. २०१८ साली झालेल्या टीईटी परीक्षेतही अशाच प्रकारे अपात्र
उमेदवारांना पात्र ठरवल्याचं तपासात समोर आलं आहे.
****
राज्य विधीमंडळाचं
हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारतर्फे
चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या बारावी
आणि दहावीच्या परीक्षांचं दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर
आजपासून उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. मंडळाकडून जाहीर करण्यात आलेलं हे वेळापत्रक
फक्त माहितीसाठी असून, परीक्षेपूर्वी संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील
स्वरूपात देण्यात येणारं वेळापत्रक हे अंतिम असेल, त्या वेळापत्रकावरून विद्यार्थ्यांनी
परीक्षांच्या तारखांची खात्री करूनच परीक्षेस बसावं, असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
****
औरंगाबादच्या
प्रस्तावित एक हजार ६८० कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा योजनेत आतापर्यंत ९० कोटी महाराष्ट्र
जीवन प्राधिकरणाला देण्यात आले असून, कामाचा वेग वाढवण्याची सूचना महानगरपालिका प्रशासक
आस्तिक कुमार पाण्डेय यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. पांण्डेय यांनी
काल या योजनेच्या कामाचा आढावा घेतला.
****
ज्या शेतकऱ्यांनी
पिकाचं नुकसान झाल्यानंतर ७२ तासाच्या आत नुकसानीची पूर्वसूचना दिली नव्हती, त्या शेतकऱ्यांना
पिक कापणी प्रयोग आधारीत महसूल मंडळ निहाय पिक विमा लागू झाल्यास, राज्य आणि केंद्र
सरकारचा दुसरा हप्ता प्राप्त झाल्यानंतर पिक विमा वाटप करण्यात येईल, अशी माहिती परभणीच्या
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली आहे. अशा शेतकऱ्यांना आता तक्रार देण्याची आवश्यकता
नाही, त्यामुळे त्यांनी तक्रार देण्यासाठी कार्यालयात गर्दी करु नये, असं आवाहन त्यांनी
केलं आहे.
****
पंजाब मधल्या
फिरोझपूर रेल्वे विभागात शेतकरी आंदोलनामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या
आहेत. उद्या नांदेड इथून सुटणारी नांदेड - अमृतसह एक्स्प्रेस रद्द करण्यात आली असल्याचं
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
ढाका इथं
सुरु असलेल्या पुरुषांच्या आशियाई चषक अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत आज भारताचा उपांत्य
फेरीतला सामना जपानसोबत होणार आहे. याआधी अखेरच्या सामन्यात भारतानं जपानवरच सहा-शून्य
असा विजय मिळवून साखळी स्पर्धेत अव्वल स्थान मिळवलं होतं.
****
No comments:
Post a Comment