आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ डिसेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात इतर
मागासवर्गीय-ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणाऱ्या १०६ नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी आज
मतदान होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव, नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव, अर्धापूर
आणि माहूर, जालना जिल्ह्यातल्या बदनापूर, मंठा, जाफराबाद, घनसावंगी आणि तीर्थपुरी,
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी आणि लोहारा, परभणी जिल्ह्यात पालम, बीड जिल्ह्यातल्या
केज, आष्टी, पाटोदा, शिरुर कासार आणि वडवणी, हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ आणि
सेनगाव, तर लातूर जिल्ह्यातल्या चाकूर, शिरुर अनंतपाळ, देवणी आणि जळकोट या नगर पंचायती
तसंच ग्राम पंचायतीमधल्या १८१ जागांसाठी आज मतदान होणार आहे.
परभणी जिल्ह्यात
पूर्णा तालुक्यातल्या नर्हापूर, देऊळगाव दुधाट, सोनखेड आणि रुंज इथल्या ग्रामपंचायतींच्या
चार रिक्त जागा, नांदेड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या
फुलंब्री नगर पंचायतीच्या दोन जागांसाठीही आज मतदान होत आहे.
याशिवाय यवतमाळ, नाशिक, सातारा आणि रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येकी सहा, सांगली आणि भंडारा जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन तसंच नंदुरबार जिल्ह्यातल्या एका नगर पंचायतीसाठीही मतदान सुरू आहे.
****
कर्मचारी भविष्य
निर्वाह निधी संघटनेमध्ये यावर्षी ऑक्टोबरमध्ये १२ लाख ७३ हजार सदस्य नोंदणी झाली असल्याची
आकडेवारी संघटनेद्वारे काल जारी करण्यात आली. वर्ष-दर-वर्षाची तुलना पाहता या वर्षी
ऑक्टोबरमध्ये सदस्य संख्येमध्ये सुमारे दहा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मागील वर्षी
ऑक्टोबरमध्ये ११ लाख ५५ हजार सदस्य जोडले गेले होते.
****
नांदेड जिल्ह्याच्या
कंधार तालुक्यातल्या बाचोटीचे भुमीपूत्र वीर जवान बालाजी डुबुकवाड यांच्या पार्थिवावर
काल बाचोटी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू-काश्मिर मधल्या कुपवाडा
इथं कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बाचोटी
इथं डुबुकवाड यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
राज्यात सर्वत्र
थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक शहरात किमान तापमानाचा पारा थेट घसरला असून आज दहा पूर्णांक
आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment