Thursday, 20 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२० जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

इतर मागासवर्गीय - ओबीसींसंदर्भात उपलब्ध माहिती राज्य मागासवर्ग आयोगाला देण्याचे आदेश, सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. ओबीसींच्या संदर्भात सरकारकडे सध्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे, राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया राबवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारनं केली होती. त्यावर न्यायालयानं हे आदेश दिले आहेत.

****

परभणी जिल्ह्यात केंद्र शासनाच्या वतीनं सुरू असलेल्या जलजीवन मिशन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयीची माहिती, येत्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये गावातल्या लोकांना दिली जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी काल ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या एक लाख चार हजार ६८ कुटुंबांना या योजनेतून नळ जोडणीचं उद्दीष्ट देण्यात आलं आहे. त्यापैकी पाच हजार १२२ कुटुंबांना आतापर्यंत नळजोडणी देण्यात आली असून, उर्वरित उद्दीष्ट येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचं टाकसाळे यांनी सांगितलं.

****

औषध क्षेत्रात काम करणारे सर्व विक्री संवर्धन कर्मचारी म्हणजे वैद्यकीय प्रतिनिधींनी आपल्या विविध मागण्यांसाठी काल देशव्यापी संप पुकारला होता. परभणी जिल्ह्यात या संपाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनास एक निवेदन सादर करुन संपामागची भूमिका स्पष्ट केली.

****

मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा भागात रेल्वेरुळांच्या कामासाठी ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे नांदेड विभागातून धावणाऱ्या नांदेड मुंबई रेल्वे २२ जानेवारी तसंच परतीच्या प्रवासात २३ जानेवारीला तर जालना मुंबई जालना जनशताब्दी एक्सप्रेस २३ जानेवारीला धावणार नाही.

****

आयसीसी १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत त्रिनिदादमधील तारोबा इथं झालेल्या ब गटातल्या सामन्यात आयर्लंडवर १७४ धावांनी मोठा विजय मिळवत भारतीय संघ सुपर लीग टप्प्यासाठी पात्र ठरला आहे. भारतीय गोलंदाजांच्या भेदक मार्यामुळे आयर्लंडचा डाव ३९ षटकांत, केवळ १३३ धावांत संपुष्टात आला.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ९७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातले ७६७, तर ग्रामीण भागातले ३३० रुग्ण आहेत.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...