Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 24 March 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ मार्च २०२२ सायंकाळी ६.१०
****
कोविड
पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन आम्ही श्रोत्यांना
करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा
स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६
आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत
वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
महाविकास
आघाडी सरकार हे बोललेलं करुन दाखवणारं सरकार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
·
राज्यात
महसूल आणि गृहखात्याकडून वाळू तस्करी रोखण्यासाठी धोरण आखलं जाणार.
·
राज्यात
सरकारी पातळीवर उदासीनता असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप.
आणि
·
परमबीर
सिंह संबंधित प्रकरणांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य
सरकारला निर्देश.
****
महाविकास आघाडीचं सरकार हे
केवळ बोलणारं सरकार नाही तर बोललेलं करुन दाखवणारं असं हे सरकार असल्याचा पुनरुच्चार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केला. केंद्राच्या ज्या जागा मुंबईत आहेत
त्याचा विनियोग केला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. यासाठी केंद्राकडे पाठपुरावा
करुन त्याचा निकाल लावला पाहिजे, असे ते म्हणाले. झोपडपट्टीवासियांना हक्काची घरं मिळायलाच
हवीत ही सरकारची भूमिका आहे. मुंबई घडवणाऱ्यांचा विचार आपलं सरकार करणार असल्याचं त्यांनी
यावेळी नमुद केलं. मुंबईत तिनशे आमदारांसाठी घरं बाधणार असल्याचं तसंच आमदारांना कायमस्वरुपी
घरं देणार असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
राज्यात प्रशासन, पोलिस आणि
वाळू माफिया यांच्या संगनमतानं वाळू तस्करी सुरू असल्यानं कठोर कारवाईची मागणी आज विधानसभा
सदस्यांनी तारांकित प्रश्र्नोत्तराच्या तासात केली. कारवाई न करणाऱ्या संबंधित पोलीस
अधीक्षकांना निलंबित करावं, असंही सदस्य म्हणाले. वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी
सर्व जिल्ह्यांतल्या पोलिस अधीक्षकांना सूचना करण्यात येईल तसंच महसूल आणि गृहखात्याकडून
वाळू तस्करी रोखण्यासाठी धोरण आखलं जाईल, असं गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी
यावेळी सांगितलं.
****
महावितरणच्या सुरक्षा आणि
अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक आणि महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार यांच्यावर
भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांची दखल घेत त्यांना निलंबित करण्याचे आदेश ऊर्जामंत्री
नितीन राऊत यांनी आज विधानसभेत दिले. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी ही लक्षवेधी उपस्थित
केली होती. त्याला उत्तर देताना राऊत यांनी ही कारवाई जाहीर केली. आपल्या पदाचा गैरवापर
करुन संस्था तसंच अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर पैशांची मागणी, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी
आर्थिक संगनमत करून मुख्य तपास अधिकारी हे पद बळकावणं आणि कल्याण परिमंडळ अंतर्गत नैतिक
अधःपतनाच्या तक्रारी होण्याच्या मुद्द्यांवर ही लक्षवेधी सूचना होती.
****
लातुर जिल्ह्यातील औसा आणि
निलंगा तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड
प्रस्तावाबाबत कृषीमंत्री आणि रोजगार हमी मंत्री यांच्यासोबत बैठक घेवून निर्णय घेण्यात
येईल अशी माहिती रोजगार हमी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज विधानसभेत दिली. अभिमन्यू
पवार यांनी या प्रलंबित प्रस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या विषयी सर्वांची
बैठक घेवून धोरणात्मक निर्णय घेवून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री
बनसोडे यांनी विधानसभेत दिली.
****
विधानसभेतले विरोधी पक्ष
नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेतल्या भाषणामध्ये राज्य सरकारवर पुन्हा एकदा
कडाडून टीका केली. सरकारी पातळीवर मोठी उदासीनता असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य
सरकारला लोकांशी देणंघेणं नाही, महाविनाश, महावसुली, मद्यविक्री असं हे आघाडी सरकार
असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मुंबई महापालिकेच्या कारभारावरही फडणवीस यांनी
तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी यावेळी आणखी एक `पेनड्राईव्ह` विधानसभेत सादर केला
आणि हा `पेनड्राईव्ह` यावेळी गृहमंत्र्यांना सादर करणार असल्याचं नमुद केलं.
****
अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाचा
अर्थसंकल्प २०१३-१४ मधील तीन हजार १३० कोटी रुपयांवरून २०२२-२३ मध्ये पाच हजार २० कोटी
रुपये करण्यात आला असल्याची माहिती अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी
आज लोकसभेत दिली. लोकसभेत पुरवणी प्रश्नांला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
****
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त
परमबीर सिंह यांच्याशी संबंधित प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे
सोपवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. त्यांच्याविरुद्ध
खंडणी आणि इतर गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी पाच गुन्ह्यांचा तपास आता सीबीआयमार्फत
होणार असून आठवडाभरात हा तपास वर्ग करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं राज्य
सरकारला दिले आहेत.
****
राज्यात जुनी सेवानिवृत्ती
वेतन योजना लागू करावी अशी मागणी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे
एका पत्राद्वारे केली आहे. राजस्थान आणि छत्तीसगड या काँग्रेस शासित राज्यांनी कर्मचाऱ्यांचं
हित लक्षात घेऊन ही जुनी योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला असून त्याप्रमाणे राज्यातही
भूमिका घ्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या
सुमारे साडे सहा लाख आहे.
****
नांदेड - जम्मू तावी - नांदेड
साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस रेल्वेचे दोन डबे वाढवण्यात आले आहेत. या बदला अंतर्गत
तृतीय श्रेणी वातानुकुलीतचे चार डबे कमी करण्यात येणार असून द्वितीय शयनयान श्रेणीचे
सहा डबे वाढवण्यात येणार आहेत. ही गाडी आता १८ डब्यांची झाली असून येत्या एक एप्रिलपासून
हा बदल अंमलात येणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.
****
जागतिक क्षयरोग जनजागृती
दिवस आज पाळण्यात येत आहे. औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे यादिनानिमित्त सायकल फेरीचं
आयोजन करण्यात आलं. या फेरीला माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी हिरवा झेंडा दाखवून
सुरुवात केली. महापालिका आरोग्य केंद्रांमध्ये क्षयरोग दिनानिमित्त प्रतिज्ञाही घेण्यात
आली.
****
नांदेड जिल्ह्यातील किनवट
पंचायत समितीतील कृषी विस्तार अधिकारी संजय एकनाथ घुमटकर याला सात हजार रुपयांची लाच
घेतांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागानं आज अटक केली. मंजूर झालेल्या विहिरीचं बांधकाम
पाहणी तसंच देयकाची रक्कम मंजूर करण्यासाठी घुमटकर यानं दहा हजार रुपयांची मागणी केली
होती.
****
शेतकरी गट, शेतकरी उत्पादकांनी
कंपनी स्थापण्यासाठी एकत्र येवून शेतमालाच्या विक्रीसाठी स्वतः उद्योजक व्हावं, असं
आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील
धान्य महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
****
No comments:
Post a Comment