Thursday, 24 March 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.03.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 March 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ मार्च २०२२ दुपारी १.०० वा.

****

महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण राजभाषा विधेयक २०२२ आज विधानसभेत मंजूर झालं. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या विधेयकावर निवेदन सादर केलं. त्यानंतर भाजप आमदारांनीही या विधेयकाला पाठिंबा दर्शवला. या विधेयकानुसार आता केंद्राच्या राज्यातल्या कार्यालयांपासून सर्व कार्यालयांमध्ये मराठी ही अनिवार्य असेल, असं देसाई यांनी स्पष्ट केलं. मराठीकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं ते म्हणाले.

विधानपरिषदेत शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी मुंबई बँक भ्रष्टाचारावरून विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना अपात्र करण्याची मागणी केली. दरोडेखोर फाईल्स हा शब्द वापरून त्यांनी मुंबई बँक भ्रष्टाचार आणि मजूर म्हणून फसवणूक केल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. यावर प्रविण दरेकरांनी हस्तक्षेप घेत कायदेशीर बाब असल्यानं इथं हा प्रश्न उपस्थित करता येणार नसल्याचे सांगितलं.

****

जागतिक क्षयरोग जनजागृती दिवस आज पाळण्यात येत आहे. क्षयरोगाचे आरोग्यावर होणारे परिणाम तसंच सामाजिक, आर्थिक परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी आणि जागतिक साथरोग निवारणाचे प्रयत्न करण्यासाठी दरवर्षी २४ मार्च ला हा दिवस पाळला जातो. क्षयरोगाचं संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या पुढच्या टप्प्याचं उद्घाटन आज नवी दिल्ली इथं करण्यात आलं.

२०२५ पर्यंत भारताला क्षयरोग मुक्त करण्यासाठी दर्जेदार आरोग्य सेवा आणि प्रगत उपचार करुन देण्याबाबत वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे. यानिमित्त केलेल्या ट्विट मध्ये त्यांनी, क्षयरोग हा टाळता येण्याजोगा आणि उपचार करण्यायोग्य आजार आहे, असं सांगितलं. आपण एकत्रितपणे टीबीला दूर करू आणि निरोगी आणि रोगमुक्त भारतासाठी काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८२ कोटी २३ लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात २८ लाख नागरीकांचं लसीकरण झालं. १२ ते १४ वर्षे वयोगटातल्या सुमारे ६९ लाख मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. तर दोन कोटी २१ लाख २१ हजार ८१६ पात्र लाभार्थ्यांनी बुस्टर डोस घेतला आहे.

दरम्यान, देशात काल नव्या एक हजार ९३८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ६७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ५३१ रुग्ण बरे झाले. देशात सध्या २२ हजार ४२७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

देशात दोन वर्षांपूर्वी कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध ३१ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आह़े. कोविड रुग्णसंख्येत मोठी घट झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला असला, तरी मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांचं पालन यापुढेही करावं लागणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या प्रसिद्ध कवयित्री प्राध्यापक संध्या रंगारी यांना त्यांच्या ‘वाताहतींची कैफियत’ या कविता संग्रहास ज्योती लांजेवार राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीनं उत्कृष्ट साहित्यासाठीचे पुरस्कार जाहीर झाले. येत्या २७ मार्चला रविवारी नागपूर इथं या पुरस्काराचं वितरण होणार आहे.

****

औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन संगीत अकादमी - महागामीचा १३ वा शारङगदेव समारोह येत्या २७ ते ३० मार्च दरम्यान एमजीएम परिसरात आयोजित करण्यात आला आहे. महागामीच्या संचालिका पार्वती दत्ता यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पाच दिवसीय विशेष महोत्सवामध्ये एमजीएम परिसरात दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता नृत्य आणि विविध राज्यातील संगीत क्षेत्रातील ख्यातनाम कलाकारांची कला प्रस्तुत होणार आहे. यंदाच्या या समारोहाचं आर्कषण म्हणजे बौद्ध मंडला अर्पण जप जे कर्नाटकातल्या ड्रेपुंग गोमांग मठातील भिक्षू सादर करतील, तसंच अंजठा लेणीतल्या चित्रां संदर्भातील नृत्य मुंबईच्या डॉ. जयश्री राजगोपालन या सादर करतील, काश्मीरची सुफियाना मौसिकी ही श्रीनगरचे डॉ.शब्बीर अहमद मीर सादर करणार असल्याचं पार्वती दत्ता यांनी सांगितलं.

****

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सत्यजित कदम यांनी काल आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबरमध्ये निधन झाल्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे.

****

राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य-महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भातल्या तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर काही ठिकाणी हवामान कोरडं राहील, असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...