Friday, 25 March 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.03.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२५ मार्च २०२२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेधनाचा आज समारोप होत आहे. काल अंतिम आठवडा प्रस्ताव सादर झाला. मराठी राजभाषा विधेयक-२०२२, तसंच महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये तातडीनं कारवाई करण्यासाठीचं, ‘महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालय विधेयक’, काल विधानपरिषदेत मंजूर झालं.

****

लोकसभेत काल २०२२-२३ च्या अर्थसंकल्पासंदर्भातल्या अतिरीक्त अनुदान मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. सभागृहात विनियोग विधेयक २०२२ देखील मंजूर झालं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं होतं. यावेळी झालेल्या चर्चेत अनेक सदस्यांनी बंदरं, जलवाहतूकीशी संबंधित क्रिया प्रकियांच्या विकासाबाबतची आपली मतं सभागृहात मांडली.

****

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ यांचा आज शपथविधी होत आहे. लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी क्रिकेट मैदानावर हा भव्य सोहळा होणार असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीनं एकूण ४०३ पैकी २७३ जागा जिंकल्या होत्या.

****

पी.व्ही.सिंधू, किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय आणि पारुपल्ली कश्यप हे चार भारतीय खेळाडू स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले आहेत. पी.व्ही.सिंधूचा सामना आज कॅनडाच्या मिशेल लीशी होईल तर श्रीकांतची लढत आज डेन अँडर्स अँटोनसेनशी होईल. तर दुसरीकडे, एच एस प्रणॉयचा सामना पारुपल्ली कश्यपशी होणार आहे.

****

मराठवाड्यात काल औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी चार नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. नांदेड, उस्मानाबाद, जालना, लातूर, परभणी, तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

सांगली शहरासह वाळवा, पलूस, तासगाव, विटा आणि कवठेमहांकाळ तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे गहू, हरभरा, कलिंगड, आंबा आणि द्राक्ष पिकांना फटका बसला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...