Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 24 June 2022
Time
7.10 AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जून २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· महाविकास आघाडीचं बहुमत विधानसभेत सिद्ध होईल- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
अध्यक्ष शरद पवार
· बंडखोरांनी २४ तासात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेटून बोलावं, महाविकास
आघाडीतून बाहेर पडण्याच्या मागणीचा विचार केला जाईल- खासदार संजय राऊत
· कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह आणखी सात आमदार बंडखोर एकनाथ शिंदे गटात दाखल
· शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती स्वीकारल्याचं विधानसभा उपाध्यक्ष
नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरण
· पक्षाच्या विधीमंडळ बैठकांना गैरहजर राहणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासह १२ आमदारांचं
सदस्यत्व रद्द करण्याची शिवसेनेची उपाध्यक्षांकडे मागणी
· लोकप्रतिनिधींना डावलून भोवतालच्या तथाकथित चाणक्यांचं मुख्यमंत्री ऐकत होते,
आमदार संजय शिरसाट यांचा आरोप
· राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज
उमेदवारी अर्ज दाखल करणार
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे पाच हजार दोनशे १८ रुग्ण, मराठवाड्यात ४३ बाधित
आणि
· औरंगाबाद, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात विविध प्रकरणात लाच घेणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना
अटक
सविस्तर बातम्या
महाविकास आघाडीमध्ये बहुमत आहे की नाही हे विधानसभेत सिद्ध होईल, असं राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेनेतल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर,
त्यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. राज्यात या आधी अशी स्थिती आपण अनेकवेळा पाहिली
असल्याचं ते म्हणाले. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना विधानसभेच्या प्रांगणात यावंच
लागेल. आमदार परतले की वस्तुस्थिती स्पष्ट करतील. शिंदे यांची एक चित्रफित आपण दूरचित्रवाणीवर
पाहिली, त्यात ते राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं म्हणाले. सी पी एम, सी पी आय,
काँग्रेस, आणि अन्य राष्ट्रीय पक्ष त्यांना पाठिंबा देणारे नाहीत, तेव्हा तो पक्ष कोण
याबाबत सांगायची गरज नाही, सूरत आणि आसामला जे लोक व्यवस्था करणारे दिसले ते माझ्या
परिचयाचे आहेत, आणि त्यात भाजपाचे सदस्य होते, असं पवार सांगितलं. महाविकास आघाडीसोबत
अडीच वर्ष सत्ता उपभोगलेल्या बंडखोर आमदारांचा हिंदुत्वाचा मुद्दा केवळ निमित्त असल्याची
टीका पवार यांनी केली.
****
काँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे आणि आघाडीतच राहील, याचा पुनरुच्चार,
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.
सध्याच्या राजकीय पेचप्रसंगामागे भारतीय जनता पक्ष आहे, आणि ते महाराष्ट्राचं नुकसान
करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या सरकारकडे पुरेसं
संख्याबळ आहे, जर आमचं सरकार अल्पमतात आलं असेल, तर भारतीय जनता पक्षानं अविश्वास प्रस्ताव
आणावा असं आव्हानही पटोले यांनी दिलं.
****
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदार त्यांच्या सोबत असल्याचा
दावा केला आहे. गुवाहाटी इथल्या हॉटेलमधून या सर्वांची एकत्र छायाचित्रं आणि ध्वनिचित्रमुद्रण
समाजमाध्यमांवर प्रकाशित झालं आहे. दरम्यान, शिंदे यांचा हा दावा शिवसेनेनं फेटाळला
आहे.
भारतीय जनता पक्षानं शिवसेनेच्या आमदारांची फसवणूक करुन त्यांना पळवून राज्याबाहेर
नेल्याचा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत केला.
Byte…
ट्वीटरवर आपण शिवसैनिक असल्याचं सांगता आहे. आम्ही शिवसेना सोडणार
नाही असं सांगता आहेत. पण आमची भुमिका फक्त सरकार विषयी आहे, त्या सरकारमधून महाविकास
आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही इथं येण्याची हिमत दाखवा, उद्धव
साहेबांसमोर या आणि भुमिका मांडा नक्की तुमच्या भुमिकेचा विचार होईल चोवीस तासात परत
या......
बंडखोरांमधून परत आलेले उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील, विदर्भातले आमदार नितीन
देशमुख या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपले अनुभव सांगितले.
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी जर शिंदे गटाची असेल, तर त्यांनी येत्या
२४ तासात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेटून बोलावं. त्यांच्या मागणीचा विचार
केला जाईल. गुवाहाटीत बसून पत्र पाठवू नयेत, असं आवाहनही राऊत यांनी यावेळी केलं. राऊत
यांच्या विधानावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आक्षेप घेतला आहे. अशा
प्रकारची विधानं करण्यापूर्वी महाविकास आघाडीतल्या आपल्या नेत्यांशी चर्चा करायला हवी
होती, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन
भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काल सकाळी आशिष जैस्वाल यांच्यासह सदा सरवणकर, दीपक केसरकर, मंगेश
कुडाळकर हे तर रात्री कृषी मंत्री दादा भुसे, संजय राठोड आणि रविंद्र फाटक हे आमदारही
गुवाहटीत जाऊन शिंदे गटात सामिल झाले.
****
शिवसेनेच्या गटनेतेपदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांची नियुक्ती
केली असून, ते पत्र आपण स्वीकारलं असल्याचं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी
म्हटलं आहे. विधिमंडळ कायद्यानुसार पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो, असं त्यांनी
काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी काल उपाध्यक्ष झिरवाळ यांना पत्र
देऊन, पक्षाच्या विधीमंडळ बैठकांना गैरहजर राहणाऱ्या १२ आमदारांविरुद्ध कारवाई करण्याची
मागणी केली. एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार,
भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, अनिल बाबर, बालाजी किणीकर, यामिनी जाधव, लता सोनवणे, महेश
शिंदे, या १२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात १२ याचिका विधानसभा उपाध्यक्षांना
देण्यात आल्या आहेत. या सर्वांचं सदस्यत्व रद्द करावं, अशी मागणी करण्यात आली असल्याचं
खासदार अरविंद सावंत यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
दरम्यान, व्हीप बैठकीसाठी नसतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. संख्या नसताना
तुम्हीच अवैध गट तयार केला, म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे, असं त्यांनी
ट्विट संदेशात पक्षाला उद्देशुन म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आणि
शिवसैनिक आम्हीच आहोत, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. कायदा आम्हालाही कळतो, असंही
शिंदे यांना या ट्विटमध्ये नमुद केला आहे.
****
न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदे यांना हा निर्णय घ्यायला
लावण्यात आला, असा दावा, शिवसेनेचे औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे बंडखोर आमदार संजय
शिरसाट यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आमदारांना शिवसेनेत परतण्यासंदर्भात
केलेल्या आवाहनाला, शिरसाट यांनी अनावृत पत्रानं उत्तर दिलं आहे. त्यांचं हे पत्र शिंदे
यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे जारी केलं. गेली अडीच वर्षे `वर्षा`ची दारं
आपल्यासाठी बंद होती, लोकप्रतिनिधींना डावलून भोवती जमलेल्या तथाकथित चाणक्यांचं ऐकलं
जात होतं, ते बडवे आपल्याला डावलून निवडणुकांची व्यूह रचना आखायचे, असं शिरसाट यांनी
यात म्हटलं आहे. आपण कधी मंत्रालयातल्या सहाव्या माळ्यावर गेलाच नाहीत, त्यामुळे `वर्षा`
निवासस्थानी येऊन भेटण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला प्रवेश नसायचा. स्वपक्षीय आमदारांना
अशी अपमानास्पद वागणूक का, हा आपला प्रश्र्न आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंची दारं आमच्यासाठी
उघडी होती. मतदार संघातली वाईट परिस्थिती, मतदार संघातला निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादी
काँग्रेसकडून होत असलेला अपमान, आपली ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदेच ऐकत होते
आणि सकारात्मक मार्ग काढत होते. ठाकरे अविश्र्वास दाखवत होते, असंही शिरसाट यांनी पत्रात
म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज
उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी त्या काल नवी दिल्लीत दाखल झाल्या. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी यावेळी त्यांची भेट घेतली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे पाच हजार दोनशे १८ रुग्ण आढळले. त्यामुळे
राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ५० हजार २४० झाली आहे. काल या संसर्गानं एका रुग्णांचा मृत्यू
झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७ हजार ८९३ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८६ शतांश
टक्के आहे. काल चार हजार ९८९ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत,७७ लाख ७७ हजार ४८०
रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८३ शतांश
टक्के झाला आहे. राज्यात सध्या २४ हजार ८६७
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या
२२, नांदेड जिल्ह्यातल्या ११, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दहा रुग्णांचा समावेश आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
जिल्ह्यात सरासरी पन्नास मिलिमीटर इतका अल्प पाऊस झाला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी
कृषी विभागानं, पाच लाख ६५ हजार ७०० हेक्टर क्षेत्र निर्धारित केलं असून, त्यापैकी
प्रत्यक्षात सहा हजार ४०६ हेक्टरवर, म्हणजे अवघ्या एक टक्का क्षेत्रावर पेरण्या पूर्ण
झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामातल्या विविध पिकांचे ४५ हजार २४२ क्विंटल बियाणं
सध्या उपलब्ध असून, ४७ हजार २६८ मेट्रिक टन खतही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कृषी दिनानिमित्त, आजपासून एक जुलै पर्यंत कृषी संजिवनी
मोहिम राबवण्यात येत आहे. प्रत्येक गावासाठी आणि गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी,
शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान पोहचवण्यासाठी राबवण्यात येणार्या या मोहिमेमध्ये, कृषी विभाग,
कृषी संलग्न विभाग, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रातले कर्मचारी
आणि कृषीतज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातल्या सर्व
शेतकर्यांनी यामध्ये उस्फूर्तपणे सहभागी व्हावं अस आवाहन, कृषि विभागानं केलं आहे.
बीड जिल्ह्यातही हा उपक्रम राबवणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
बी. के. जेजुरकर यांनी दिली. बीड जिल्हा कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध
पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव येत्या ३० तारखेपर्यंत मागवण्यात आले असल्याचं त्यांनी सांगीतलं
आहे.
****
लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या वेगवेगळ्या कारवाईत काल औरंगाबाद, जालना आणि हिंगोली
जिल्ह्यातल्या सहा जणांना अटक करण्यात आली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या
ढोरकीन इथला महावितरणचा कर्मचारी किशोर आगळे याला, चार हजार रुपयांची लाच घेतांना पकडण्यात
आलं. वादळी वाऱ्यानं घराच्या जवळील तुटून पडलेल्या विद्युत तारा पुन्हा जोडून देण्यासाठी,
त्यानं ही लाच मागितली होती.
जालना जिल्ह्यातल्या राजूरचा तलाठी अप्पा कड याला १५ हजार रुपयांची लाच घेतांना
अटक करण्यात आली. कड यानं भुखंडाचा फेर घेवून साताबऱ्यावर नोंद घेण्यासाठी ही लाच मागितली
होती.
तर हिंगोली इथल्या सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सहकार अधिकारी आत्माराम
राठोड, सहायक निबंधक अभयकुमार कटके यांनी कार्यालयातला प्रमुख लिपिक संजय पिसाळकर याच्या
मार्फत काल पाच हजार रुपये घेतल्याचं सिद्ध झालं असल्याची माहिती, लाचलुचपत प्रतिबंधक
पथकानं दिली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल रात्री अनेक ठिकाणी पाऊस झाला. नांदेड शहर आणि ग्रामीण
भागात मुसळधार पाऊस झाला.
बुलडाणा जिल्ह्यातही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. संग्रामपूर तालुक्यातल्या
पळशी झाशी इथं अंगावर वीज पडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी
झाले. काल दुपारी ही घटना घडली.
येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात
बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक
ठिकाणी मुसळधार, तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं
व्यक्त केली.
****
No comments:
Post a Comment