Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 02 July 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२
जुलै २०२२ दुपारी १.०० वा.
****
विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यामुळे अध्यक्षपदासाठी आता भारतीय
जनता पक्षाचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट
लढत होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदार संघातून निवडून आलेले साळवी शिवसेनेचे उपनेते आहेत. साळवी
यांचा अर्ज भरतेवेळी महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात,
अशोक चव्हाण, जयंत पाटील, सुनील प्रभू उपस्थित होते.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते
पदावरुन हकालपट्टी केल्याप्रकरणी शिवसेनेविरुद्ध कायदेशीर लढा देणार
असल्याचं शिंदेगटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात
प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेनेच्या विरोधात जाण्यासाठी नव्हे तर
अन्यायाविरोधात जाण्यासाठी बंडाचं पाऊल शिंदेगटानं उचललं असून आजही शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्द्ल आपल्या गटाला प्रचंड आदर असल्याचं केसरकर
यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असंही
उद्धव ठाकरे यांनी काल स्पष्ट केलं असून एकनाथ शिंदे यांची
शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचं शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलं, हे लोकशाहीला शोभणारं नाही असंही केसरकर म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत ते कौठा रस्त्यावर पोलीस भरतीसाठी सराव करण्याकरिता
गेलेल्या दोन तरुणांचा अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे
जागीच मृत्यु झाला. अनिल आम्ले आणि गणेश गायकवाड अशी त्यांची नावं असून आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १९७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला
आहे. काल ९ लाखांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९७
कोटी ८४ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल १७ हजार ९२ नव्या कोरोनाबाधित
रुग्णांची नोंद झाली, तर १४ हजार ६८४ रुग्ण बरे झाले. देशात
सध्या एक लाख ९ हजार ५६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आणि रुग्ण बरे होण्याचा दर ९८
पूर्णांक ५४ शतांश टक्के झाला आहे.
****
महाराष्ट्रातून गुजरात कडे अवैधरित्या नेण्यात येत असलेल्या ४३ लाख रुपये
किमतीचा मद्यसाठा नंदुरबार पोलीसांनी जप्त केला आहे. सुरत राष्ट्रीय महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. साठा वाहतूक करत असलेल्या
कंटेनरचा चालक आणि मदतनीस फरार झाले आहेत. या कंटेनरमधून
विदेशी बनावटीच्या दारुची वाहतूक मध्यप्रदेश कडून गुजरातकडे होत असल्याची माहिती
समोर आली आहे.
****
पहिली बुद्धीबळ ऑलिम्पियाड मशाल रॅली आज सकाळी नागपूरमध्ये पोहोचली. ग्रँड मास्टर रौनक साधवानी, दिव्या देशमुख
आणि संकल्प गुप्ता यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक आणि इतर अधिकारी
यावेळी उपस्थित होते. ही बुद्धीबळ ऑलिम्पियाड मशाल ज्योत आता पुणे आणि त्यानंतर
मुंबईला जाणार आहे. बुद्धीबळ स्पर्धांच्या इतिहासात इंटरनॅशनल चेस फेडरेशनद्वारे स्थापित मशाल रॅलीची सुरुवात करणारा भारत हा पहिलाच देश आहे.
येत्या २८ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान चेन्नईत ४४ वी इंटरनॅशनल
चेस फेडरेशन बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धा होणार आहे.
****
प्रत्येक घरात वीज आणि गॅसजोडणी उपलब्ध करण्याची केंद्र सरकारची योजना
असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. गुजरात मधल्या गांधीनगरमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ केल्यानंतर काल ते बोलत होते. २०२४ पर्यंत
देशातल्या प्रत्येक गरीब कुटुंबाला घर देण्याची योजनाही केंद्र सरकार आखत असल्याचं
ते म्हणाले.
****
देशातली सर्वात मोठी तरंगती उर्जा परियोजना आता पूर्ण प्रभावानं सुरु झाली
आहे. जुलै पासून तेलंगणाच्या रामगुंडममध्ये १०० मेगावॅट सोलर ऊर्जा क्षमतेच्या या परियोजनेत २० मेगावॅटच्या अंतिम भागाच्या व्यापारीकरणाची
घोषणा राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ - एनटीपीसीनं केली
आहे. अशा तरंगत्या सौर फलकांमुळे जलसाठ्यांमधून बाष्पीकरण
कमी प्रमाणात होतं, त्यामुळे जल सुरक्षेला सहकार्य मिळतं.
****
औरंगाबाद महापालिकेत विविध पदांवर काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना
पदोन्नती देण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी
काल झालेल्या आस्थापना निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
//**********//
No comments:
Post a Comment