Saturday, 23 July 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.07.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 July 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज संसदेत निरोप समारंभ;नवनिवार्चित राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांचा सोमवारी शपथविधी

·      महाराष्ट्रात यंदा सर्वाधिक स्टार्ट अप्सच्या माध्यमातून सुमारे दीड लाख रोजगार उपलब्ध

·      ६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर;'गोष्ट एका पैठणीची' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, सुमी हा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट तर राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार

·      राज्यातल्या ११५ नगर परिषदा आणि नऊ नगर पंचायतींसाठी २८ तारखेला तर महापालिकांसाठी २९ जुलैला ओबीसी आरक्षण सोडत

·      बंडखोर आमदार-खासदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी-युवासेना नेते आदित्य ठाकरे यांचं आव्हान

आणि

·      वेस्ट इंडीजविरूद्ध पहिल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा तीन धावांनी विजय

****

सविस्तर बातम्या

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा निरोप समारंभ आज संध्याकाळी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. तर नवनिवार्चित राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांचा शपथविधी समारंभ येत्या सोमवारी होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या रविवारी देशाला उद्देशून निरोपाचं भाषण करतील. या भाषणाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरुन संध्याकाळी सात वाजता प्रसारित केलं जाणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी अनेक पद्म पुरस्कार विजेते आणि आदिवासी नेते उपस्थित होते. 

****

या वर्षात सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक स्टार्ट अप्स सुरु झाले असून, त्यातून सर्वाधिक सुमारे दीड लाख रोजगार उपलब्ध झाल्याचं, केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. केंद्र सरकारने २०१६ साली स्टार्ट अप इंडिया अभियान सुरु केलं होत. तेव्हापासून राज्यातले स्टार्ट अप उद्योग वाढत असून २०२२ साली त्यांची संख्या १३ हजार ५१९ झाली आहे. या स्टार्ट अप्स मुळे चालू वर्षात उपलब्ध झालेल्या रोजगारांची संख्याही महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १ लाख ४६ हजार १३२ आहे. त्याखालोखाल कर्नाटक, दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो.

****

विकसित आणि उभरत्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय रुपयाची स्थिती मजबुत असल्याचं, भारतीय रिझर्व बॅँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बँक आँफ बडोदाच्या वार्षिक संमेलनात बोलत होते. भारतीय अर्थव्यवस्था हळुहळू पूर्वपदावर येत असून, महागाई दर स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाचं सरासरी विदेशी कर्ज कमी होत असून परकीय चलनाचा पुरेसा साठा असल्याची माहितीही दास यांनी दिली.

****

देशभरात सर्वोच्च न्यायालयाची विभागीय पीठं स्थापन करण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या विचाराधीन असून, या संदर्भात निर्णय प्रतिक्षित असल्याचं, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं आहे. काल लोकसभेत प्रश्नकाळात एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.

****

युनिक आयडेन्टीफिकेशन एथॉरिटी ऑफ इंडिया - यु आय डी ए आय नं देशभरातल्या पाच लाख ९८ हजार ९९९ बनावट आधार कार्ड रद्द केले आहेत. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत ही माहिती दिली. गेल्या जानेवारी महिन्यापासून बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्या ११ कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मोबाईल क्रमांक, पत्ता किंवा फोटो आदी तपशील अपडेट करण्यासाठी यु आय डी ए आय च्या अधिकृत संकेतस्थळ तसंच अधिकृत आधार केंद्रांना भेट द्यावी, असं आवाहन राजीव चंद्रशेखर यांनी केलं आहे.

****

६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट ठरला, तर गोष्ट एका पैठणीची हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्णकमळ, सुराराय पोत्रू या तमिळ चित्रपटानं पटकावलं.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून काल नवी दिल्लीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अभिनेता अजय देवगण आणि तमिळ अभिनेता सूर्या यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विभागून जाहीर झाला आहे.

प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांना मी वसंतराव या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार जाहीर झाला, तर सायना चित्रपटातल्या गीतांसाठी गीतकार मनोज मुंतशीर यांना सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार जाहीर झाला आहे. सिद्धार्थ मेनन, अभिनीत जून, किशोर कदम अभिनीत अवांछित, गोदाकाठ हे चित्रपट विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म म्हणून गौरवण्यात आले आहेत.  टकटक या मराठी चित्रपटातल्या भूमिकेसाठी अनिश गोसावी, तर सुमी हा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरला असून, यातल्या भूमिकेसाठी आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकर पुरस्कार जाहीर झाला आहे. फनरल हा मराठी चित्रपट सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे . चित्रपटस्नेही राज्याचा पुरस्कार मध्यप्रदेश राज्याला जाहीर झाला आहे.

****

राज्यातल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षापासून साडे सात लाख रुपये शैक्षणिक कर्ज मिळणार आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून, हे शैक्षणिक कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असं आवाहन महामंडळानं केलं आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ५१५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख २९ हजार ९१० झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ५१ एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल दोन हजार ४४९ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख ६७ हजार २८० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १४ हजार ५७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, काल बी ए फाईव्ह या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले. हे दोन्ही रुग्ण परराज्यातले असून, सध्या ते पुणे जिल्ह्यात राहात आहेत. राज्यात या नव्या व्हेरियंट बाधितांची संख्या आता १६० झाली आहे.

****

मराठवाड्यात काल १६३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ५०, औरंगाबाद ४२, लातूर ३०, जालना १७, बीड १५, तर नांदेड जिल्ह्यातल्या नऊ रुग्णांचा समावेश आहे.

****

राज्यातल्या ११५ नगर परिषदा आणि नऊ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मागासप्रवर्ग, मागासप्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी २६ तारखेला याबाबतची नोटीस जाहीर होणार असून, गुरुवारी २८ तारखेला आरक्षण सोडत काढली जाईल. २९ जुलै ते १ ऑगस्टपर्यंत या आरक्षणावर हरकती दाखल करता येणार आहेत. निवडणुका जाहीर झालेल्या महापालिकांमध्ये २९ जुलैला इतर मागासप्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ सीबीएसईने दहावी तसंच बारावी परीक्षेचे निकाल काल जाहीर केले. दहावी परीक्षेचा निकाल ९४ टक्के तर बारावी परीक्षेचा निकाल ९२ पूर्णांक ७१ टक्के लागला असल्याचं सीबीएसई मंडळानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे.

****

हर घर तिरंगा अभियान यशस्वीपणे राबवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. १३ ते १५ ऑगस्ट या काळात नागरिकांनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा, यामुळे राष्ट्रीय ध्वजासोबत असलेलं आपलं नातं अधिक दृढ होईल, असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

बंडखोर आमदार आणि खासदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी, असं आव्हान शिवसेनेचे युवा  नेते आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. ते काल औरंगाबाद इथं शिवसंवाद यात्रेत बोलत होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बंडखोरांनी पाठीत खंजीर खुपसला, ही गद्दारी राजकीय स्वार्थासाठी होतीच मात्र माणुसकीसाठीही होती, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

****

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन- स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत, राज्यभरातल्या बाजार समित्यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी, पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे. राज्याचे पणन संचालक सुनील पवार यांनी ही माहिती दिली. पायाभूत तसंच इतर सेवा-सुविधा, अंतर्गत रस्ते, सामाईक लिलावगृह, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, संगणकीकरण, गोदाम, शीतगृह सुविधा, शेतकऱ्यांसाठी निवास व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, आदी निकषांवर ही क्रमवारी जाहीर होणार आहे.

****

औरंगाबाद इथं आज राज्यस्तरीय विधीज्ञ परिषद होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती अभय ओक या परिषदेला उपस्थित राहणार असल्याचं, आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे. शहरातल्या एमजीएम अभिमत विद्यापीठातल्या रुक्खिणी सभागृहात सकाळी दहा वाजता या परिषदेला प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य या परिषदेत सहभागी होणार आहेत.

****


दरम्यान, राज्याच्या महाअधिवक्तापदी मराठवाडातल्या विधिज्ञांना संधी देण्यात यावी, अशी मागणी मराठवाडा अनुशेष निर्मुलन आणि विकास मंचच्या वतीनं करण्यात आली आहे. विकास मंचचे निमंत्रक राजेंद्र दाते पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत ही मागणी केली. समन्यायिक प्रतिनिधित्वाच्या अनुषंगानं यासंदर्भात लक्ष घालणं अत्यंत आवश्यक असल्याचं दाते यावेळी म्हणाले. उद्या होत असलेल्या राज्यस्तरीय विधीज्ञ परिषदेत याबाबत चर्चा व्हावी, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

****

भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि रोहित यादव यांनी अमेरिकेतल्या ओरेगॉन इथं होत असलेल्या जागतिक ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या 'अ' गटातल्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नीरजने ८८ पूर्णांक तीन नऊ मीटर आणि रोहीतनं ८२ पूर्णांक चार दोन मीटर अंतरावर भाला फेकला. या स्पर्धेत भारताच्या एल्धोज पॉल यानं पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

****

वेस्ट इंडीजसोबत कालपासून सुरू झालेल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं तीन धावांनी जिंकला. त्रिनिदाद इथं झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीला बोलावलं, भारतीय फलंदाजांनी ५० षटकांत सात बाद ३०८ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ सहा गडी गमावून ३०५ धावाच करू शकला. ९९ चेंडूत ९७ धावा करणारा शिखर धवन सामनावीर ठरला. तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे.

****

ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचं काल पुण्यात प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते. अत्यंत अभ्यासपूर्ण लेखनासाठी ते मराठी साहित्य विश्वात प्रसिद्ध होते. उद्या' नावाच्या त्यांच्या कादंबरिला २०२० सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता, मात्र त्यांनी तो नाकारला होता.

****

सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांची औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांच्याकडून तत्काळ पदभार स्वीकारण्याची सूचना अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी चौधरी यांना पत्राद्वारे केली आहे.

****

सातारा जिल्ह्यातल्या कोयना परिसरात काल दुपारी १ वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. त्याची तीव्रता ३ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली.

****

लातूर इथल्या साईबाबा जनता सहकारी बँकेच्या कामकाजावर रिजर्व्ह बँकेनं निर्बंध घातले आहेत. या बँकेला रिजर्व्ह बँकेच्या परवानगी शिवाय ठेवी घेणं किंवा कर्जवाटप करता येणार नाहीत. पुढच्या सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू असतील.

****

जालना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी २०२२ च्या निवडणुकांसाठी गट आणि गणांच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. तहसील कार्यालयांमध्ये सदर याद्या पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. मतदार याद्यांबाबत काही हरकती, सूचना असेल तर संबंधितांनी तहसील कार्यालयात येत्या २५ जुलैपर्यंत दाखल कराव्यात, असं सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हा अधिकारी शर्मिला भोसले यांनी कळवलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 05 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...