Friday, 5 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.08.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 August 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटांनी दाखल केलेल्या याचिकांची सुनावणी, पाच न्यायाधिशांच्या पीठाकडे सोपवण्याबाबत येत्या सोमवारपर्यंत निर्णय घेतला जाईल, न्यायालयाचा निकाल येईपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

·      शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत, आठ ऑगस्टपर्यंत वाढ, पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडीकडून पुन्हा चौकशी

·      नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची शिफारस

·      औरंगाबाद, नांदेड- वाघाळा, लातूर, परभणीसह राज्यातील नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत स्थगित

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे १ हजार ८६२ रुग्ण, मराठवाड्यात ३९ बाधित

·      राज्यातल्या २३८ ग्रामपंचायतींच्या मतदानाची आज मतमोजणी

·      मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी

आणि

·      राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्ण आणि ए रौप्य पद

****

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या विविध याचिकांची सुनावणी, पाच न्यायाधिशांच्या पीठाकडे सोपवण्याबाबत येत्या सोमवारपर्यंत निर्णय घेतला जाईल, असं सर्वोच्च न्यायालयानं काल स्पष्ट केलं. ययाचिकांवर काल दुसऱ्या दिवशीही दोन्ही गटांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडली. त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वकिलांनीही काल आयोगाची भूमिका मांडली. यावेळी न्यायालयानं निवडणूक आयोगाला, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचे आदेश दिले.

****

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत, आणखी चार दिवस, म्हणजेच आठ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार राऊत यांना गेल्या ३१ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यांची कोठडी संपल्यानं काल त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयानं यावेळी संचालनालयाला सोमवारपर्यंत चौकशी पूर्ण करायला सांगितलं आहे.

दरम्यान, खासदार राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही याच पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं पुन्हा चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. आज त्यांची चौकशी केली जाणार आहे. यापूर्वी त्यांची एकवेळ चौकशी करण्यात आली आहे.

****

नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राच्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयानं छापा टाकल्याच्या मुद्यावरुन काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी काल लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ केला. त्यामुळं दोन्ही सदनाचं कामकाज दोन वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. 

****

भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधिश एन.व्ही रमणा हे या महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत.

****

राज्य शासनानं मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा केल्याच्या पार्श्वभूमीवर, आज होणारी नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य १४ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात येणारी अंतिम आरक्षणाची अधिसूचनादेखील स्थगित करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. औरंगाबाद, नांदेड- वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल आणि मीरा-भाईंदर या नऊ महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात येणार होती.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १ हजार ८६२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ५३ हजार ९६५ झाली आहे. काल या संसर्गानं सात रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार १२४ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल दोन हजार ९९ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख ९३ हजार ७६४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य एक शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १२ हजार ७७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये जालना जिल्ह्यातल्या १२, नांदेड ११, तर औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी आठ रुग्णांचा समावेश आहे.

****

राज्यात १५ जिल्ह्यांतल्या २३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये काल सरासरी ७८ टक्के मतदान झालं. मराठवाड्यात औरंगाबाद इथं १६ ग्रामपंचायतींसाठी, बीड १३, परभणी २, उस्मानाबाद ९, जालना २७ तर लातूर इथं ६ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या दहा नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीसाठी काल आरक्षण सोडत काढण्यात आली. देगलूर, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड आणि हदगाव, या दहा नगरपरिषदा तर हिमायतनगर नगरपंचायतीमध्ये पुरुष आणि महिलांसाठीचा इतर मागास प्रवर्ग तसंच सर्वसाधारण महिला प्रवर्गामधल्या सदस्यांचं यावेळी आरक्षण निशचित करण्यात आलं.

****

`हर घर तिरंगा` मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या दोन हजार ५० शिक्षकांनी अकरा हजार ३८८ तिरंगा ध्वज खरेदी केले आहेत. या तिरंगा ध्वजाचं प्रातिनिधिक स्वरूपात वितरण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते काल करण्यात आलं. प्रत्येक शिक्षकानं पाच झेंडे खरेदी केले असून, त्यातील एक झेंडा स्वतःच्या घरावर चार झेंडे गरजूंना वितरित केले जाणार आहेत. नागरिकांनी स्वतःच्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी केलं. ते म्हणाले

‘‘हर घर झेंडामध्ये आम्ही ग्रामीण भागात सर्व ग्रामपंचायतीला आमचे बचत गटामार्फत ते राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देत आहे. प्रत्येक गटविकास अधिकारी आणि बाकीच्या  ग्रामपंचायतीमध्ये व्यवस्थापन केलेलं आहे याच्याबद्दल. तुम्ही नजिकचे जे ग्रामपंचात ऑफिसर आहे त्यांना कॉन्टक्ट करा. जेंव्हा ते नसतील तेंव्हा मग तालुका ऑफिस किंवा जिल्हा परिषद ऑफिसला पण कॉन्टक्ट करु शकता. सर्व ग्रामपंचायतीला आणि सर्व तालुक्याच्या ऑफिसला शासनाने गाईडलाईन दिलेल्या आहेत की कसा फ्लॅग ठेवायचा आहे. त्या गाईडलाईनचं तंतोतंत पालन करा कारण ते आमच्या मानाची गोष्ट आहे. आणि आमचे सौभाग्यची गोष्ट आहे की आमचे घरी आमचे ध्वज फडकावत आहे.’’

****

जालना जिल्ह्यातही हर घर तिरंगाउपक्रमाबाबत विविध माध्यमांचा वापर करुन अधिक प्रमाणात प्रभावीपणे जनजागृती करण्यात यावी, असं आवाहन, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक गाव, वाडी-वस्तीपर्यंत नागरिकांना तिरंगा ध्वज उपलब्ध करुन देण्यासाठी येत्या दोन दिवसांमध्ये ध्वज विक्री केंद्राची उभारणी करण्याचे निर्देशही त्यांनी यासंदर्भातल्या आढावा बैठकीत दिले आहेत.

****

राज्यात काल अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यात हिंगोली, परभणी, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली.  

हिंगोली तालुक्यातील डिग्रस आणि परिसरात काल सायंकाळी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे पिंपरीच्या ओढ्याला पुर आल्यानं जवळपासच्या पाच गावांचा संपर्क तुटला होता.

परभणी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे निम्न दुधना धरणात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे काल धरणाचे चार दरवाजे उघडून चार हजार ७१४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.   

लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला. भेटा - आंदोरा मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती.

नांदेड जिल्ह्यात परवा रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे १७ गावांचा संपर्क तुटला होता.

उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे तुळजापूर तालुक्यातल्या बोरी नदीवरील धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असू, नळदुर्ग किल्ल्यातला नर- मादी धबधबा सुरु झाला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यात काल ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं शेतातील पिकांची मोठी नासाडी झाली आहे. तर सिंदखेडराजा तालुक्यातल्या साठेगाव इथं वीज अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यात काल मालेगाव तालुक्यातील राजुरा परिसरात ढगफुटी सदृष्य पाऊस. या पावसामुळे राजुरा गावांचा संपर्क तुटला होता. नाशिक शहर आणि परिसरात काल मुसळधार पाऊस झाला.

पुढील दोन दिवस मराठवाडा, विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मोठ्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राज्यभर बहुतांश भागात पाऊस पुन्हा जोरदार हजेरी लावेल. कोकणात काही ठिकाणी अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

****

बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धेत भारतानं एक सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली.

भारोत्तोलनात सुधीरनं सुवर्ण पदक जिंकलं. अंतिम फेरीत त्यानं २१७ किलो वजन उचलून ही कामगिरी केली.

ॲथलेटिक्समध्ये पुरुषांच्या उंच उडी प्रकारात मुरली श्रीशंकरनं रौप्य पदक जिंकलं.

महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत धावपटू हिमा दास हिनं तर भारताच्या पुरुष हॉकी संघानं उपांत्यफेरी गाठली. भारतीय पुरुष हॉकी संघानं ब गटातील अखेरच्या साखळी सामन्यात वेल्सवर ४-१ असा विजय मिळवला.

या स्पर्धेत भारत आतापर्यंसहा सुवर्ण, सात रौप्य आणि सात कांस्य पदकांसह एकूण २० पदक जिंकून पदक तालिकेत सातव्या स्थानावर आहे.

****

शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर होत असलेले हल्ले, मारहाणीच्या घटनांबाबत नियंत्रण ठेवून योग्य कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे केली आहे. या प्रकरणांची दखल घेऊन योग्य कार्यवाही केली जाईल, असं आश्वासन सेठ यांनी यावेळी दिलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 24 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...