Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 October 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१
ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
दूरसंचाराच्या फाईव्ह जी सेवेनं तंत्रज्ञानाच्या नव्या युगात भारताचा प्रवेश होत
असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत प्रगती मैदान इथं आज
फाईव्ह जी सेवेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. फाईव्ह जी च्या माध्यमातून भारत
पहिल्यांदा टेलिकॉम क्षेत्रात जगात सर्वोच्च स्थानी असल्याचं ते म्हणाले. विकसित भारताच्या
संकल्पात आपला देश इतर देशांसोबत बरोबरीने चालत असून, डिजिटल इंडियाचं हे मोठं यश असल्याचं
त्यांनी नमूद केलं. मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण देशात फाईव्ह जी सेवा सुरु होईल, असा
विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
फाईव्ह जी तंत्रज्ञानामार्फत चांगलं कव्हरेज, जास्त डेटा, कमी विलंब आणि अत्यंत विश्वासार्ह संवाद सुविधा प्राप्त होणार आहेत.
पहिल्या टप्प्यात देशातल्या १४ शहरांमध्ये ही सेवा सुरु होत आहे. यामध्ये मुंबई, पुणे,
दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद, कलकत्ता, अहमदाबाद, वाराणसी, चेन्नई, लखनौ, चंदीगढ, गांधीनगर,
गुरुग्राम, जामनगर या शहरांचा यात समावेश आहे. दरम्यान, सहाव्या
भारतीय मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते
यावेळी झालं.
****
भारतीय अन्न महामंडळाकडे अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गतच्या
तरतुदीची पूर्तता करण्यासाठी, तसंच अन्नधान्यविषयक इतर योजना आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न
योजनेच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी,
अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं, केंद्र सरकारनं
स्पष्ट केलं आहे. सद्यस्थितीत भारतीय अन्न महामंडळाकडे,
गव्हाचा साठा २३२ लाख मेट्रिक टन इतका, तर तांदळाचा साठा २०९
लाख मेट्रिक टन इतका असल्याचं याबाबतच्या निवेदनात म्हटलं
आहे.
****
चला जाणूया नदीला या अभियानासाठीचं नियोजन आणि अंमलबजावणी
करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करावी असे
निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून
राज्यभरात उद्यापासून हे अभियान सुरु केलं जाणार आहे. राज्यातल्या नद्यांचं संरक्षण
आणि संवर्धन व्हावं या उद्देशानं हे अभियान राबवलं जाईल.
****
चंद्रपूर जिल्ह्यातला ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांना टायगर सफारी साठी खुला
करण्यात आला आहे. आज सकाळी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सर्व वरिष्ठ
अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोहर्ली इथं मुख्य प्रवेशद्वाराची
पूजा करून जिप्सी आत सोडण्यात आल्या.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद इथल्या जर-जरी-जर बक्ष उर्सच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून
१५ ऑक्टोबर दरम्यान सोलापूर - धुळे राष्ट्रीय महार्गावरच्या वाहतुकीत
बदल करण्यात आला आहे. औरंगाबाद कडून
कन्नड, धुळेकडे जाणारी सर्व जड वाहनं, दौलताबाद
टी पाँईट, माळीवाडा, कसाबखेडा फाटा वेरुळमार्गे कन्नडकडे जातील. कन्नड कडून येणारी सर्व जड वाहनं याचमार्गे औरंगाबादकडे
येतील. या उर्ससाठी मोठ्या संख्येनं भाविक येतात त्यामुळे वाहतूक मार्गात बदल केला असल्याचं पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आजपासून मतदार नोंदणी सुरु होत असल्याची
माहिती, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिली.
दर सहा वर्षांनी होणाऱ्या विधान परिषद सदस्यत्वासाठीच्या शिक्षक आणि
पदवीधर मतदारसंघातल्या निवडणुकांसाठी संपूर्ण नव्याने मतदार यादी तयार करण्यात येते.
येत्या सात नोव्हेंबर पर्यंत दावे तसंच हरकती स्वीकारण्यात येतील,
प्रारुप यादीनंतर ३० डिसेंबरला अंतिम यादी तयार होईल. लातूर जिल्ह्यातही आजपासून नोंदणी सुरु होत असल्याचं जिल्हाधिकारी पृथ्वीराज
बी.पी. यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं.
****
श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव, कोजागिरी पौर्णिमा या सणाच्या काळात तुळजपूर इथं वाहतुकीची कोंडी होवू नये, यासाठी वाहतुकीच्या
मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. सात ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान तुळजापूर घाट सर्व
प्रकारच्या वाहतुकीस बंद असेल असं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं आजपासून गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला
आहे. प्रवाशांनी नवीन वेळापत्रक तपासून
त्यानुसार प्रवास करावा, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे
सांगण्यात आलं आहे. नवीन
वेळापत्रका विषयीची माहिती १३९ या हेल्प लाईनवर, किंवा नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम या संकेत स्थळावर उपल्ब्ध असल्याचं
विभागानं कळवलं आहे.
****
बांग्लादेशातल्या सिल्हेट इथं महिला टी-ट्वेंटी आशिया चषक
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताचा सामना श्रीलंकेशी सुरु झाला आहे. श्रीलंकेनं
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका,
थायलंड, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती असे
एकूण सात संघ यात सहभागी झाले आहेत.
//**********//
No comments:
Post a Comment