Saturday, 1 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.10.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०१ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशात फाईव्ह जी सेवेचा शुभारंभ नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. फाईव्ह जी तंत्रज्ञानामार्फत चांगले कव्हरेज, जास्त डेटा, कमी विलंब आणि अत्यंत विश्वासार्ह संवाद सुविधा प्राप्त होणार आहेत. फाईव्ह जी तंत्रज्ञान ऊर्जा सक्षमता, स्पेक्ट्रम सक्षमता आणि नेटवर्क सक्षमताही वाढवेल.

दरम्यान, सहाव्या भारतीय मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी होणार आहे. चार ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाचा-'नवीन डिजिटल विश्व' असा विषय आहे.

****

निवृत्ती वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण - पी एफ आर डी ए आज राष्ट्रीय निवृत्तीवेतन व्यवस्था दिवस म्हणून साजरा होत आहे. नागरिकांमध्ये निवृत्तीवेतन आणि निवृत्तीपश्चात नियोजनाबाबत जागृती निर्माण करणं हा या मागचा उद्देश आहे.

****

भारताला कुपोषणमुक्त करण्यासाठी सर्व संबंधितांनी कसून प्रयत्न करा, असं आवाहन केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत तीन दिवसांच्या पोषण महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर त्या काल बोलत होत्या. पाचव्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा समारोप या महोत्सवानं होत आहे.

****

मार्च २००० पासून  ऑनलाईन  ई-वाणिज्य व्यवहारांना लागू असलेले नियम आता ऑफलाईन व्यवहारांनाही लागू केल्याचं रिझर्व बँकेनं स्पष्ट केलं आहे. क्षेत्रीय ग्रामीण बॅंका सध्या रिझर्व्ह बॅंकेच्या पूर्व परवानगीनं ग्राहकांना इंटरनेट बँकिंग सुविधा देऊ शकतात, असं बँकेनं सांगितलं.

****

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाला उत्कृष्ट प्रकाशनासाठी भारतीय प्रकाशकांची सर्वोच्च संस्था असलेल्या द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सचे नऊ पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये कोर्ट्स ऑफ इंडियाया मराठी पुस्तकाला मिळालेल्या कला आणि कॉफी टेबल बुक्स या विभागातल्या प्रथम पुरस्काराचा समावेश आहे.

****

औरंगाबाद इथं पोलिसांनी परवा रात्री एका अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला. लोटाकारंजा परिसरातल्या एका शादीखान्यात हा विवाह होत असल्याची माहिती पोलिसांच्या दामिनी पथकाला अज्ञात व्यक्तीने दूरध्वनीवरून दिली. त्यानुसार कारवाई करत, पोलिसांनी विवाह रोखला आणि मुलीच्या पालकांचं समुपदेशन केलं.

//********//

 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...