Monday, 22 May 2023

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : २२ मे २०२३ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 22 May 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २२ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

परिपूर्ण जागतिक आरोग्य व्यवस्था उभी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आणि जागतिक आरोग्य क्षेत्रात समानतेचे धोरण राबवण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. स्वित्झरलँडमध्ये जिनेव्हा इथं सुरू असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या ७६ व्या सभेत ते दूरदृष्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून बोलत होते. जागतिक आरोग्य संघटना आपल्या शताब्दीपूर्तीपर्यंत म्हणजे पुढच्या २५ वर्षांसाठीची नवी उद्दिष्टं निश्चित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपला प्रयत्न केवळ आजारांपासून दूर राहण्यापुरता मर्यादित न राहता, निरामयतेच्या दिशेने एक पाऊल टाकायला हवं, यासाठी योगाभ्यास, आयुर्वेद आणि प्राणायाम यांसारख्या पारंपरिक शास्त्रांचं महत्त्व पंतप्रधानांनी विशद केलं.

दरम्यान, पापुआ न्यू गिनीच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजीचा कम्पॅनिअन ऑफ ऑर्डर हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

पापुआ न्यू गिनी चे पंतप्रधान जेम्स मारापे यांच्यासोबत आर्थिक, औद्योगिक, आरोग्य आणि पर्यावरणीय बदल याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.

***

दोन हजार रुपयांच्या नोटा सप्टेंबर २०२३ नंतरही वैध असतील, असे संकेत रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले आहेत. आज वार्ताहरांशी बोलताना दास यांनी, दोन हजार रुपयाच्या नोटांच्या वैधतेसंदर्भात बँकेनं काहीही निर्देश दिलेले नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले...

Notifications में हमने कहा है की, It continues has legal tender हमने तो कहीं पे नहीं कहा और उसके आगे भी कुछ नहीं कहां. हमने तो एैसा नहीं कहां की लिगल टेंडर जो है वो  ३० सप्टेंबर तक है. एैसा तौ नहीं कहां है. हमारे Expectaion  यह है की, ३० सप्टेंबर के अंदर जो है Maximum quantity of notes वापस आ जाएंगे. हम देखेंगे उस वक्त We will see and decide.      

 

छोट्या व्यावसायिकांकडून दोन हजाराच्या नोटा नाकारण्याचा मुद्दा नवीन नाही, पूर्वीही अनेक व्यावसायिक ग्राहकांकडून दोन हजाराची नोट घेण्याऐवजी ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य देत असत, याकडे दास यांनी लक्ष वेधलं. परदेशी गेलेल्या नागरिकांच्या हिताचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं दास यांनी सांगितलं.

***

ळखपत्र दाखवल्याशिवाय दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. भाजप नेते अश्विनी उपाध्यय यांनी दाखल केलेल्या या याचिकेत ओळखपत्राशिवाय दोन हजारांच्या नोटा बँकेमधून बदलून देणं, हे तर्कहीन आणि संविधानाच्या अनुच्छेद १४ चं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात रिजर्व्ह बँक तसंच भारतीय स्टेट बँकेला दोन हजाराच्या नोटा संबंधित खातेधारकाच्या खात्यातच जमा करण्याचे निर्देश देण्यात यात, असंही या याचिकेत म्हटलं आहे.

***

महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

***

केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडीकडून चौकशी होत आहे, त्या पार्श्वभूमीवर राऊत आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. २०२४ या वर्षी ईडीच्या कार्यालयात कोणाला पाठवायचं याची यादी आम्ही लवकरच तयार करु असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

***

औरंगाबाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांची निवडणूक आज होत आहे. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी राजू नाना भुमरे तर उपसभापतीपदी राम पाटील एरंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. औरंगाबाद, कन्नड, फुलंब्री, वैजापूर, गंगापूर, लासूर स्टेशन या बाजार समित्यांच्या सभापती आणि उपसभापतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरु आहे.

***

बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथं आज एका अपघातात तिघांचा मृत्यू झाला. पंढरपूरहून देवदर्शनानंतर शेगावला परत येणाऱ्या चार चाकी गाडीच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं, ही गाडी शेगाव शहराच्या स्वागत कमानीच्या खांबावर धडकली, यात तीन जण जागीच दगावले, तर सात जण जखमी झाले. मृत भाविकांच्या घरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाल्यानं, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

//************//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...