Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ मे २०२३ सायंकाळी
६.१०
****
·
दोन
हजाराच्या नोटा सप्टेंबर नंतरही वैध-रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे
संकेत.
·
पर्यावरणाच्या
माध्यमातून दिशादर्शक काम होणार-पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून विश्वास
व्यक्त.
·
‘शासन
आपल्या दारी’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एमकेसीएलच्या ‘महालाभार्थी’ या पोर्टलचा
वापर.
आणि
·
महाराणा
प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन.
****
दोन हजार रुपयांच्या नोटा सप्टेंबर २०२३ नंतरही वैध असतील,
असे संकेत रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले आहेत. आज वार्ताहरांशी
बोलताना दास यांनी, दोन हजार रुपयाच्या नोटांच्या वैधतेसंदर्भात बँकेनं काहीही निर्देश
दिलेले नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
नोटीफिकेशन मे हम ने कहा हैं it continues as legal tender।
हम ने तो कही पे नहीं कहा, उसके आगे तो कुछ नहीं कहा। हम ने तो ऐसा नहीं कहा कि भाई
लीगल टेंडर जो है वो सिर्फ 30TH सप्टेंबर तक है ऐसा तो नहीं कहा है। हमारे
एक्सपेक्टेशन ये है कि 30 सप्टेंबर के अंदर जो है मॅक्झिमम क्वांटिटि ऑफ नोटस् वापस
आ जायेंगे। हम देखेंगे उस वक्त, we will see & we will decide.
छोट्या व्यावसायिकांकडून दोन हजाराच्या नोटा नाकारण्याचा
मुद्दा नवीन नाही, पूर्वीही अनेक व्यावसायिक ग्राहकांकडून दोन हजाराची नोट घेण्याऐवजी
ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य देत असत, याकडे दास यांनी लक्ष वेधलं. परदेशी गेलेल्या
नागरिकांच्या हिताचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं दास यांनी सांगितलं.
****
दरम्यान, नोटा बदलण्यासंदर्भात रिजर्व्ह बँकेने आज नव्या
मार्गदर्शक सूचना जारी केल्या. दररोज किती नोटा बदलण्यात आल्या याची नोंद ठेवावी, नोटा
बदलण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सावलीची तसंच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी,
असं रिजर्व्ह बँकेनं सांगितलं आहे.
****
ओळखपत्र दाखवल्याशिवाय दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून
देऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
भाजप नेते अश्विनी उपाध्यय यांनी दाखल केलेल्या या याचिकेत ओळखपत्राशिवाय दोन हजारांच्या
नोटा बँकेमधून बदलून देणं, हे संविधानाच्या अनुच्छेद १४ चं उल्लंघन असल्याचं म्हटलं
आहे. दोन हजाराच्या नोटा बॅंकांनी संबंधित खातेधारकाच्या खात्यातच जमा करण्याचे निर्देश
देण्यात यावे, असंही या याचिकेत म्हटलं आहे.
****
आगामी काळात पर्यावरणाच्या माध्यमातून दिशादर्शक काम पहायला
मिळेल, असा विश्वास, पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. जी-20
अंतर्गत मुंबईत सुरु असलेल्या पर्यावरण आणि हवामानविषयक बैठकीचं आज कपिल पाटील यांच्या
हस्ते औपचारिक उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणाचं संतुलन साधण्यासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर काम सुरु असल्याचं पाटील
यांनी सांगितलं. ते म्हणाले –
पर्यावरणाचं संतुलन ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला
पाहिजे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा संकल्प आहे, की आपला देश स्वच्छ झाला
पाहिजे. आपल्या पर्यावरणामध्ये संतुलन राहिलं पाहिजे. पर्यावरणाचं संतुलन ठेवण्यासाठी
मोदीजींच्या नेतृत्वामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे, मला विश्वास आहे, की
येणाऱ्या काळामध्ये जगाला दिशादर्शक असं भारताचं काम पर्यावरणाच्या मध्ये आणि क्लायमेट
चेंजच्या मध्ये निश्चितपणाने आपल्या देशामध्ये होईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे.
****
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित-एमकेसीएलच्या ‘महालाभार्थी’
या पोर्टलचा उपयोग ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात
येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत
आज सह्याद्री अतिथीगृह इथं याचं सादरीकरण करण्यात आलं. जास्तीत जास्त नागरिकांना सहजरित्या
शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी या पोर्टलचा उपयोग व्हावा, अशी सूचना मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. यासाठी स्वयंसेवक नागरिकांना योग्य ती मदत करतील अशा
सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
****
महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन
करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी
महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
मंत्रालयात अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी महाराणा
प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
नवी दिल्ली इथं महाराष्ट्र सदनात प्रभारी निवासी आयुक्त
निवा जैन यांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केलं.
औरंगाबाद महानगरपालिकेत उपायुक्त रवींद्र निकम यांनी महाराणा
प्रताप यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली
नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक
वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन करण्यात आलं.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार अडसुळ यांनी
महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
****
औरंगाबाद शहराची पाणी पुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी
आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड
यांनी दिले आहेत. जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठीच्या नव्या जलवाहिनीच्या कामाचा
डॉ कराड यांनी आज स्मार्ट सिटी कार्यालयात आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात आज शासन आपल्या दारी
या योजनेच्या पहिल्या कार्यक्रमात सात हजार नऊ जणांना विविध प्रकारचे लाभ देण्यात आले.
आमदार अभिमन्यू पवार यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात होणाऱ्या
या योजनेच्या कार्यक्रमाचा, जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी.पी. यांनी केलं.
****
बोगस कीटकनाशक विक्रेत्या कंपन्यांवर कारवाईच्या मागणीसाठी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
कार्यालयासमोर चलनी नोटा उधळून आंदोलन केलं. संघटनेच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी
आज दुपारी कृषी अधिकारी कार्यालयात दाखल होत, बोगस कीटकनाशक कंपन्यांची चौकशी करून
कारवाई का केली जात नाही, वारंवार निवेदनं देऊनही या कंपन्यांना अभय का, असा प्रश्न
विचारला. दोन दिवसांत कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं निवेदनाच्या
माध्यमातून दिला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या
सभापती आणि उपसभापती पदांची निवडणूक आज झाली. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी
राजू नाना भुमरे तर उपसभापतीपदी राम पाटील एरंडे यांची बिनविरोध निवड झाली. औरंगाबाद
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी भारतीय जनता पक्षाचे राधाकिसन पठाडे तर उपसभापती
पदी शिवसेना शिंदे गटाचे मुरली चौधरी विजयी झाले. लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार
समितीच्या सभापती पदी शेषराव जाधव आणि उपसभापती पदी अनिल चव्हाण निवडून आले, वैजापूर
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप शिवसेना युतीचे रामहरी जाधव सभापती तर शिवकन्या
पवार या उपसभापतीपदी निवडून आल्या आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात आजपासून २८ तारखेपर्यंत मासिक पाळी जनजागृती
सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त आम्ही कटिबद्ध’ या
घोषवाक्याने आज या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, या सप्ताहात किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी
विविध उपक्रम राबवून स्वच्छता आणि आरोग्य याबाबत माहिती द्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेच्या
मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
यांना सक्तवसूली संचालनालयानं समन्स बजावून चौकशी केल्याच्या विरोधात आज राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यभरात निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद इथं पक्ष कार्यकर्त्यांनी
ईडी विरोधात फलक झळकावत घोषणाबाजी केली.
जालना इथं पक्ष कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
निषेध आंदोलन केलं. बदनापूर, परतूर आणि भोकरदन इथल्या तहसील कार्यालयासमोरही राष्ट्रवादीच्या
पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केलं.
****
दक्षिण आफ्रिका इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत
भारताच्या शरथ कमल आणि जी साथियान यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत विजय मिळवला.
या दोघांनी पुरुष दुहेरी स्पर्धेतही इजिप्तच्या खेळाडूंचा ३-० असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment