Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 22 May
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २२ मे २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
· स्वच्छता
अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मत
· जी-२०
परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला मुंबईत प्रारंभ
· शेतकऱ्यांसाठी
उपयुक्त ‘डॉक्टर किसान मोबाईल ॲप्लिकेशनचा’
शुभारंभ
· दोन
हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणतीही औपचारिकता नाही- भारतीय स्टेट बँकेचं स्पष्टीकरण
· मुंबई
महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, ५० चा आकडा देखील पार करू शकणार
नाही मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचा दावा
· प्रसिद्ध
समीक्षक, आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. किशोर सानप यांचं निधन
·
आणि
· आयपीएल
क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सनं रॉयल चँलेज बंगळुरूचा पराभव केल्यामुळे मुंबई इंडियन्सचा
संघ अंतिम चार संघांत दाखल
सविस्तर
बातम्या
स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता असल्याचं मत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. काल मुंबईत जुहू भागात जी-२० समुद्र
किनारा स्वच्छता’ मोहीम राबवण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल
रमेश बैस, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री
अश्विनीकुमार चौबे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्र किनारा स्वच्छ ठेवण्याची
तसंच प्रदूषण आणि कचऱ्यापासून समुद्राचं रक्षण करण्याची शपथ देवून, जी-२० परिषदेतील
सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत स्वच्छता केली. नागरिकांनी परिसर स्वच्छतेसाठी
दररोज एक मिनीट वेळ देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले….
Byte…
पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी
अशा कार्यक्रमाची आवश्यकता आहे. एक मिनिट प्रत्येकाने आपल्या जीवनातला दिला पाहिजे,
दररोज एक मिनिट जर प्रत्येक नागरिकाने दिला तर पर्यावरणाचा समतोल राहील. पर्यावरणाचा
ऱ्हास होणार नाही. आणि आज जे आपण क्लायमेट चेंज ग्लोबल वार्मिंग हे सगळं जे काही अनुभवतोय
ह्याच्यातून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल.
***
जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या
तिसऱ्या बैठकीला कालपासून मुंबईत प्रारंभ झाला. शाश्वत-पर्यावरणीयदृष्ट्या लवचिक नील
अर्थव्यवस्था आणि त्यासंबंधीत विज्ञान, तंत्रज्ञान
आणि नवोन्मेष यासह धोरणं, शासन आणि सहभाग तसंच अर्थकारण अशा विविध पैलूंवर बैठकीत महत्त्वपूर्ण
चर्चा करण्यात आली. या निमित्तानं भू विज्ञान, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयानं
मुंबईत ओशन-ट्वेन्टी संवाद हा कार्यक्रम आयोजित
केला होता. द ओशन ट्वेन्टी संवाद, विविध क्षेत्रातील तज्ञ आणि धोरण निर्माते यांना
एकत्र आणेल, असं भू विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन यांनी या संवादाला संबोधित
करताना सांगितलं. या कार्यक्रमात, उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, प्रभावी
आणि सर्वसमावेशक धोरणाशी निगडीत आव्हानं आणि यासंबंधीच्या पैलूंवर चर्चा करण्यात आली.
गेल्या वर्षी इंडोनेशियाच्या जी-ट्वेन्टी अध्यक्षतेखाली
सुरु करण्यात आलेल्या या संवादाचा उद्देश,
महासागराशी संबंधित समस्येवर उपाययोजना आखणं हा आहे.
***
भंडारा गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्याचं संवर्धन करण्यासाठीं
सर्वोच्च न्यायालयानं ६२ कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सारस पक्षांचे घरटे असेल, त्या शेतकऱ्यांना १० हजार रुपये
देण्यात येणार असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. प्रेमाचं प्रतीक
म्हणून सारस पक्षांची ओळख आहे. कायम जोडीनं राहणाऱ्या या पक्ष्याचा जोडीदार दगावल्यास,
दुसरा पक्षी सुध्दा मरण पावतो. दिवसेंदिवस सारस पक्षांच्या संख्येत घट होत असली तरीही,
भंडारा -गोंदिया जिल्ह्यातल्या शेतांमध्ये सारस पक्षांचा अधिवास आढळून येत आहे. सारस
पक्ष्यांच्या संवर्धनासाठी शासनानं ही योजना सुरू केली आहे.
***
आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांना समर्पक उत्तर देण्यासह
त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयार विकसित करण्यात आलेल्या ‘डॉक्टर
किसान मोबाईल ॲप्लिकेशनचा’ काल शुभारंभ झाला. नाशिक इथं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री
डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते या ॲपचं अनावरण करण्यात आलं. या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे
शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला, मार्गदर्शन, कृषी विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती,
हवामानाविषयी माहिती मिळणार आहे.
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकार आणि पणन महासंघ
-‘नाफेड’ मार्फत लवकरच उन्हाळी कांदा खरेदी सुरू होणार असल्याची
माहिती मंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.
लासलगाव बाजार समितीला भेट दिल्यानंतर त्या काल बोलत होत्या. यंदा तीन लाख मेट्रिक
टन कांदा खरेदीचं उद्दीष्ट असल्याचं डॉ. पवार यांनी सांगितलं.
***
राज्य सरकारनं हमाल माथाडी कायदा मोडीत काढण्याचा घाट घातला
असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला
आहे. अहमदनगर इथं राज्य हमाल मापाडी महासंघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन
प्रसंगी ते काल बोलत होते. बाळासाहेब देसाई, वसंतदादा पाटील, डॉक्टर बाबा आढाव यांसह
अन्य कामगार नेते आणि आपण हा कायदा होण्यासाठी संघर्ष केल्याचं पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, या अधिवेशनापूर्वी अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत संस्थापक-अध्यक्ष दिवंगत शंकरराव
घुले यांच्या पुतळ्याचं हमाल पंचायतीच्या प्रांगणात अनावरण करण्यात आलं.
***
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी सर्वसामान्यांकडून
कोणतीही औपचारिकता पूर्ण करून घेतली जाणार नसल्याचं, भारतीय स्टेट बँकेकडून स्पष्ट
करण्यात आलं आहे. बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक एस मुरलीधरन यांनी यासंदर्भात बँकेच्या
सर्व शाखांना याबाबत पत्र लिहून ही बाब सूचित केली आहे. नोटा बदलून घेण्यासाठी कोणाकडूनही
ओळखपत्र अथवा कोणतीही पावती भरून देण्याची मागणी करण्यात येणार नाही, असं या पत्रात
म्हटलं आहे. एका व्यक्तीला एका वेळी दोन हजार रुपये किंमतीच्या दहा नोटा बँकेतून बदलून
घेता येणार आहेत.
***
पंतप्रधान कुसूम सौर योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली
आहे. पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे तसंच पारंपरिक वीज जोडणी उपलब्ध नसलेले शेतकरी या
योजनेत अर्जासाठी पात्र असतील. अडीच एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन अश्वशक्ती,
पाच एकरसाठी पाच अश्वशक्ती, तर त्यापेक्षा जास्त जमीन असणाऱ्यांना साडेसात अश्वशक्ती
तसंच अधिक क्षमतेच्या सौर कृषी पंपांसाठी अनुदान देय असेल. शेतकऱ्यांना स्वखर्चानं
इतर उपकरणं या कृषी पंपाला जोडता येतील. या योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंत ५६ हजार
सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत.
***
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची
शिवसेना, ५० चा आकडा देखील पार करू शकणार नाही असा दावा, मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी
केला आहे. काल मुंबईत झालेल्या पक्ष कार्यकारिणीच्या
बैठकीत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या नेतृत्वाला देशात सर्वमान्यता असून अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या प्रमुखांनी
देखील पंतप्रधानांच्या धोरणांची प्रशंसा केली असल्याचं ते म्हणाले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा मुंबई
दौरा फलदायी ठरल्याचं ते म्हणाले. कर्नाटक निवडणुकांमध्ये मतदारांनी दिलेला कौल स्वीकारून
पक्षं त्याचं विश्लेषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात
लोढा, विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांच्यासह पक्षाचे अनेक नेते या बैठकीत उपस्थित
होते.
***
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांतील
नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात मुरकुटडोह
दंडारी इथं एक बेस कॅम्प उभारण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांचे हस्ते या आर्म्ड आऊट पोस्ट - AOP चं लोकार्पण करण्यात आलं. नक्षलविरोधी मोहीम
राबवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशानं हा कॅम्प उभारण्यात आला आहे. या
आदिवासी भागातील नागरिकांना जनजागृती करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं
प्रयत्न केले जाणार आहेत.
***
देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त
काल देशभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रीय दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी बलिदान
दिन म्हणून कालचा दिवस पाळण्यात येतो. नवी दिल्लीतलं त्यांचं समाधी स्थळ वीरभूमी इथे
काल सकाळी प्रार्थनासभा घेण्यात आली. या प्रार्थनासभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन
खरगे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी
वड्रा, आदी नेत्यांनी सहभागी होत राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान
नरेंद्र मोदीं यांनी दिवंगत राजीव गांधीं यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केलं.
मुंबईत राज्याच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राजीव
गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर सौनिक यांनी उपस्थितांना
दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ दिली.
नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात दहशतवाद
आणि हिंसाचार विरोधी दिन पाळण्यात आला. यावेळी कुलगुरु माधुरी कानिटकर यांनी राजीव
गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी दहशतवाद विरोधी
दिनाच्या प्रतिज्ञेचं सामुहिक वाचन करण्यात आलं.
औरंगाबाद इथं जिल्हा आणि शहर काँग्रेस समितीच्या वतीनं
राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसुफ यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते
यावेळी उपस्थित होते.
***
जालना शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या घाणेवाडी जलायशाच्या
स्वच्छता मोहिमेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल सहभाग घेतला. 'या
सारे श्रमदान करु या' या मोहिमेअंतर्गत मुंबई इथली समस्त महाजन ट्रस्ट आणि शहरातल्या
विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून दर रविवारी सकाळी ही स्वच्छता मोहीम राबवली जाते.
घाणेवाडी जलाशयातील गाळ काढण्यास, सांडव्याची दुरुस्ती करून पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी
निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दानवे यांनी यावेळी दिली. शहरातले नागरिक या स्वच्छता
मोहितेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले.
***
वीज ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासह महसूल वाढीकडे लक्ष
देणं आवश्यक असल्याचं, महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद
इथं राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीनं घेण्यात आलेल्या तांत्रिक कामगारांच्या
कार्यशाळेत ते बोलत होते. वीज वितरण कंपनीच्या तीन कोटी वीज ग्राहकांपैकी फक्त ५० टक्के
ग्राहकांच्या वापराचं योग्य मूल्यांकन होत आहे. १०० टक्के वीज ग्राहकांचं अचूक मूल्यांकन
झाल्यास महावितरण कंपनी जगातील सर्वात जास्त महसूल घेणारी कंपनी होईल, असं ताकसांडे
यांनी सांगितलं. सुरळीत वीजपुरवठा, अचूक मूल्यांकन आणि वापरलेल्या प्रत्येक युनिटची
वीज बिल वसुली केली तरच महावितरण प्रगती पथावर जाईल, त्यासाठी महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी
प्रयत्न करावेत, असं आवाहन ताकसांडे यांनी केलं.
***
प्रसिद्ध समीक्षक आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. किशोर
सानप यांचं काल नागपूर इथं निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर
काल दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ सानप
यांच्या निधनानं साहित्याची आधुनिक मांडणी करणारं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून
हरवलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त
केल्या आहेत.
***
औरंगाबाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या
सभापती आणि उपसभापती पदांची आज निवड होणार आहे. यामध्ये औरंगाबाद, पैठण, कन्नड, फुलंब्री,
वैजापूर, गंगापूर, लासूर स्टेशन या बाजार समित्यांचा समावेश आहे. सकाळी अकरा वाजता
निवडीसाठी विशेष सभा होईल, त्यानंतर दुपारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सभापती
आणि उपसभापतींची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.
***
औरंगाबाद शहरात एका संस्थाचालकासह इतर चार जणांविरुद्ध
तेरा लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या
मुलीला चैतन्य शिक्षण संस्थेच्या रावसाहेब पाटील प्राथमिक आणि माध्यमिक निवासी आश्रमशाळेत
लिपिक पदाची नोकरी देण्यासाठी आणि याबाबतची मान्यता शिक्षण विभागाकडून काढण्यासाठी
आरोपींनी लाचेची मागणी केली होती. त्यानुसार १० मे रोजी संस्थेचा सचिव पांडुरंग भगनुरे
याला पाच लाख रुपयांचे दोन धनादेश, आणि उर्वरित रोख रक्कम स्विकारतांना अटक करण्यात
आली होती. अन्य आरोपींमध्ये कांतीलाल पांडे, विलास वाकोडे, आणि एका महिलेचा समावेश
आहे.
***
इंडियन प्रीमिअर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल गुजरात
टायटन्स संघानं रॉयल चँलेज बंगळुरूचा पराभव केल्यामुळे काल अखेरच्या साखळी सामन्यात
सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध विजय मिळवणारा मुंबई इंडियन्सचा संघ स्पर्धेच्या अंतिम
चार संघांत दाखल झाला आहे. काल झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं सनरायझर्स
हैदराबाद संघानं दिलेलं २०१ धावांचं लक्ष्य, १८ षटक आणि २ गडी गमावत पूर्ण केलं.
दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सनं रॉयल चँलेजर्स बंगळुरु
संघांनं विजयासाठी दिलेलं १९८ धावांचं लक्ष्य चार गडी गमावत विसाव्या षटकाच्या पहिल्या
चेंडूवर पूर्ण केलं. या सामन्यात बंगळुरु संघाकडून विराट कोहली तर गुजरात संघाकडून
शुभमन गिल या फलंदाजांनी शतक झळकावली. कॅमेरुन ग्रीन या फलंदाजानंही शतक झळकावत मुंबई
इंडियन्स संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला.
स्पर्धेतला प्ले- ऑफ गटातला पहिला सामना उद्या चेन्नई इथं
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा होणार आहे.
***
No comments:
Post a Comment