Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 20 June 2023
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २० जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
·
जी ट्वेंटी देशांच्या शिक्षणविषयक कार्यगटाच्या चौथ्या बैठकीला
आजपासून पुण्यात सुरुवात.
·
यंदा जानेवारी ते मे, या काळात राज्यभरात ८८ हजार १०८ नोकरीइच्छुक
उमेदवारांना रोजगार उपलब्ध.
·
पीकपेरणीच्या अनुषंगानं कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन
करावं-कृषिमंत्र्यांचे निर्देश.
आणि
·
नवव्या योगदिनाच्या निमित्तानं उद्या सर्वत्र विविध कार्यक्रमांचं
आयोजन.
****
जी
ट्वेंटी देशांच्या शिक्षणविषयक कार्यगटाच्या चौथ्या बैठकीला आज पुण्यात सुरुवात झाली.
जी-20 साठीचे भारताचे समन्वयक हर्षवर्धन शृंगला यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन झालं.
प्राथमिक अंक आणि अक्षरओळख, हा विषय फक्त भारतासाठीच नाही तर पूर्ण जगासाठी महत्त्वाचा
असून त्यासाठी ठोस धोरणाची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.
आजच्या बैठकीतल्या विचारविनिमयातून हे धोरण तयार होण्याला हातभार लागेल, असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला. या बैठकीला जी-२० देशांचे, तसंच आमंत्रित देशांचे पंच्याऐंशी
प्रतिनिधी उपस्थित आहेत.
****
कोरोनाच्या
ओमायक्रॉन उपप्रकारासाठी निर्माण केलेल्या एमआरएनए प्रकारच्या स्वदेशी वर्धक लसमात्रेचा
आपत्कालीन उपयोग करण्यास भारतीय औषध महानियंत्रक संस्थेनं परवानगी दिली आहे. जैवतंत्रज्ञान
विभागानं आज याबाबतची घोषणा केली. ही लस जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स या कंपनीनं
पूर्णत: भारतीय तंत्रज्ञान वापरून तयार केली आहे.
****
येत्या
एक जुलैला शिवसेनेच्या वतीनं मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा
शिवसेना उद्धव बाळासाहेब शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत
पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबई पालिकेच्या ठेवींची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप
करत, या उधळपट्टीविरोधात हा मोर्चा असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर प्रत्युत्तर देताना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांचा पैसा मुंबईकडेच राहिला पाहिजे, यासाठी महापालिकेतल्या
भ्रष्टाचाराची विशेष तपास पथकामार्फत चौकशीचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. ते आज
पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरेंचं याबाबतचं विधान म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डांटे
असा प्रकार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिंदे फडणवीस सरकारच्या
विरोधात आजचा दिवस गद्दार दिवस म्हणून साजरा करत असल्याचं सांगितलं. राज्यात पुणे,
नाशिक, औरंगाबाद, हिंगोलीसह काही ठिकाणी या पक्षांच्या वतीनं घोषणाबाजी करण्यात आली.
****
राज्यातल्या
सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विधान
परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत
बोलत होते. बदलीसाठी अधिकारी पात्र नाही, असा शेरा सचिवांनी दिला असतानाही पदोन्नती
केल्या गेल्या तसंच, वर्ग तीन आणि चारच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार सचिवांकडे
असताना मंत्र्यांनी या बदल्या केल्या, असा आरोपही दानवे यांनी यावेळी केला.
****
बंजारा
समाजाला भारतीय जनता पक्षच न्याय देऊ शकतो, असं विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आज भाजपामध्ये
प्रवेश केला, त्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. सरकार बंजारा समाजाच्या
पाठीशी असून तांड्यांपर्यंत विकास पोहचवून बंजारा समाजाच्या लोकांना मुख्य प्रवाहात
आणणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे, असं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
कौशल्य,
रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे
यावर्षीच्या जानेवारी ते मे, या काळात राज्यभरात ८८ हजार १०८ नोकरीइच्छुक उमेदवारांना
रोजगार मिळवून देण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल
प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. महारोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल अशा उपक्रमांतून
विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था आणि उद्योगांमध्ये या नोकऱ्या देण्यात आल्याचं त्यांनी
सांगितलं. इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी,
असं आवाहनही लोढा यांनी केलं.
****
या
खरीप हंगामात पीकपेरणी नियोजनाच्या अनुषंगानं कृषी विभागानं शेतकऱ्यांना उपयुक्त सल्ला
द्यावा आणि मार्गदर्शन करावं, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
आज सत्तार यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातल्या वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांची यासंदर्भात
एक आढावा बैठक घेतली त्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांना खतं, बियाणं आणि कीटकनाशकं योग्य
दरात आणि वेळेवर मिळतील, यासाठीची कार्यवाही करावी, तसंच यामध्ये काळाबाजार करणाऱ्यांवर
आणि बोगस बियाणं विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देशही कृषीमंत्र्यांनी
यावेळी दिले. पाऊस आल्याशिवाय पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करू नये, यासाठी कृषी विभाग
आणि कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी, अशी सूचनाही
सत्तार यांनी केली.
****
जगन्नाथ
पुरी इथल्या रथयात्रेला आजपासून प्रारंभ झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी रथयात्रा उत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. जगन्नाथपुरी
इथल्या या जगप्रसिद्ध रथयात्रेमध्ये भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा
यांची विधीवत पूजा करून नंतर त्यांची रथयात्रा काढली जाते. देवतांचे हे भव्य रथ लोक
मोठ्या भक्तिभावानं ओढून नेतात. या रथयात्रा उत्सवात विविध जातीधर्मांचे भाविक तसंच
परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात.
****
नववा
आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत
न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमाचं नेतृत्व
करणार आहेत. वसुधैव कुटुंबकम या उद्देशासाठी योग, ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना
आहे. देशभरात या दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
मुंबईत
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त द योग इन्स्टिट्यूट इथे, तसंच आयएनएस विशाखापट्टणम आणि
आयएनएस मरमुगाव या नौदल जहाजांवर विशेष योग सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.
भारतीय
जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे उद्या औरंगाबाद इथं अनाथ बालकांसोबत जागतिक
योग दिवस साजरा करणार आहेत. औरंगाबादमध्ये विभागीय क्रीडा संकुलात सकाळी साडेसातला
हा कार्यक्रम सुरू होणार आहे.
योगदिनाच्या
औचित्यानं आज औरंगाबाद शहरातल्या बळीराम पाटील विद्यालयात विशेष जनजागृती कार्यक्रम
आणि योग दिंडी काढण्यात आली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या
हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं.
****
जीवनशैली
म्हणून योग स्वीकारल्यास क्षमता वाढायला लागतात, असं प्रतिपादन डॉक्टर चारुलता रोजेकर
यांनी केलं आहे. क्रीडा भारती या संस्थेतर्फे ‘क्रीडा भारती योग पुरस्कार’ देऊन आज
त्यांना गौरवण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. अकरा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह
असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आतापर्यंत बावन्न हजार जणांना योग शिकवता आल्याबाबत
डॉ रोजेकर यांनी समाधान व्यक्त केलं.
****
औरंगाबाद
इथले योग अभ्यासक डॉ विवेक चर्जन यांनी अष्टांग योगाबद्दल माहिती देत, प्रत्येकाने
योगमार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले –
अष्टांग योग म्हणजे महर्षि पतंजलींनी सांगितलेला योगमार्ग.
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असे आठ नियम म्हणजे अष्टांग.
मुलतः योगमार्ग हा कैवल्यप्राप्तीचा अध्यात्मिक मार्ग असला तरी समाधीव्यतिरिक्त इतर
अंगांचा व्यावहारिक जीवनात अत्यंत लाभदायक असा परिणाम आहे. माझा जगासोबत कसा व्यवहार
असावा याचे नैतिक नियम म्हणजे यम. वैयक्तिक आचरणाची शिस्त म्हणजे नियम. यम आणि नियम
आहेत मनाला स्ट्रेसफ्री ठेवण्यासाठी. आणि जीवनात शिस्त आणण्यासाठी. आसन आहेत शारीरिक
आरोग्यासाठी. प्राणायामामुळे सैरभैर धावणाऱ्या मनाला नियंत्रित करता येते. तर प्रत्याहाराने
कामातील एकाग्रता वाढते. धारणा आणि ध्यानामुळे तणावाचे दुष्परिणाम दूर होतात. यशस्वी
आणि संतुलित जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने योगमार्गाचा अवलंब करायलाच हवा.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश चौफेर प्रगती करत असून, सर्वच क्षेत्रात देशानं
मोठी प्रगती केल्यामुळे जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे, असं कर्नाटकचे भाजप नेते,
माजी मंत्री आमदार अरविंद लिंबावली यांनी म्हटलं आहे. जालना इथं भाजपा महाजनसंपर्क
अभियान आणि मोदी @ 9 उपक्रमांतर्गत ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री
रावसाहेब दानवे यांनीही यावेळी वार्ताहरांशी संवाद साधला.
****
No comments:
Post a Comment