· न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला,
कुणबी नोंदी असणाऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा
मंत्रीमंडळाचा निर्णय
· मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, १४०० बसच्या फेऱ्या रद्द
· राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, आवश्यक
ती मदत देण्याची केंद्राकडे राज्य सरकारची मागणी करणार
· मेरी माटी-मेरा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रेची राजधानीत पंतप्रधान मोदींच्या
उपस्थितीत सांगता
आणि
· गोव्यातील ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या अशोक शिरसे याचा
नवा राष्ट्रीय विक्रम
****
मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती संदीप
शिंदे समितीचा प्राथमिक अहवाल राज्य मंत्रिमंडळाने आज स्विकारला. या अहवालानुसार कुणबी
नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचा
निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शिंदे समितीने मराठवाड्यातील
निझामकालीन आणि इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा
जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित केली आहे. तसेच, मराठा
समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोगाकडून नव्याने
इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या अन्य निर्णयांमध्ये
राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या
खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज मान्यता देण्यात
आली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती
करण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार
२ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर मर्यादेत मदत करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ घेण्यात आला.
चिटफंड न्यायालयीन प्रकरणांना वेग देण्यासाठी
कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
मराठा आरक्षण आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने
पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक भागांतून मराठवाड्याकडे येणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या
बसच्या १४०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरहून निघणाऱ्या आणि छत्रपती
संभाजी नगरमध्ये येणाऱ्या सर्व बस काल दुपारपासून बंद करण्यात आल्या आहेत. बुलढाणा
जिल्ह्यातून मराठवाड्यात येणाऱ्या ७० हून अधिक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
परभणी, धाराशीव,
लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील
सर्व एसटी वाहतूक बंद आहे. बीडमध्ये शंभरपेक्षा जास्त बसेसची तोडफोड करण्यात आली आहे.
यामुळे बस सेवा ठप्प झाली आहे. एसटी बसची मोडतोड, जाळपोळीत सुमारे १ कोटी
रुपयांचे नुकसान झाले आहे.
****
राज्यात ठिकठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी
आंदोलन करण्यात आलं. पुण्यातून जाणाऱ्या मुंबई - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नवले
पुलावर मराठा आंदोलकांनी टायर जाळून दोन तास रस्ता रोखला. यामुळे या मार्गावर तब्बल
दहा किलोमीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जालना जिल्ह्यात आजही रास्ता
रोको करण्यात आला. राजूर,
राणीऊंचेगाव, हसनाबाद इथं मराठा समाज बांधवानी
रस्त्यावर टायर जाळून चक्काजाम आंदोलन केलं. संतप्त जमावानं घनसावंगी इथं पंचायत समिती
कार्यालय पेटवून दिलं. त्यामुळे या कार्यालयातील महत्वाचे रेकॉर्ड जळाले. धाराशिव इथं
चारशे ते पाचशे मराठा आंदोलकानी रेल्वे रोको आंदोलन केले. रेल्वे रुळावर बसून जिवाची
फिकीर नाही,
आरक्षण पाहिजे - मराठा आंदोलक आंदोलन सुरूच ठेवणार, अशा
घोषणा आंदोलकांनी दिल्या. जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ आणि बाभळगाव इथं
सकल मराठा समाजाच्या वतीने येथील राष्ट्रीय महामार्गांवर टायर जाळून महामार्ग बंद करण्यात
आला होता. अहमदनगर तालुक्यातल्या बुरूडगावच्या सरपंचासह सर्व ११ सदस्यांनी पदाचा राजीनामा
दिला. तसंच गावात कँडल मार्च काढत गावकऱ्यांनी जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला.
सोलापूर इथं आज सकाळपासूनच आंदोलकांनी आक्रमक
पवित्रा घेत भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर ठिय्या मांडला तर मराठा क्रांती
मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. सोलापुरमध्येच आंदोलकांनी
रेल रोको आंदोलनही केले. धुळ्यात आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस,
अजित पवार यांच्या फलकांवरील प्रतिमांना काळे फासत निषेध व्यक्त
केला.
****
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी आज सकाळी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर
जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला अर्धवट आरक्षण दिलं जात असून ते आम्ही
स्वीकारणार नाही,
असं स्पष्ट केलं. दरम्यान, श्रीमंत शाहू महाराज
छत्रपती यांनी आज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
****
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचे घर काल मराठा आंदोलकांकडून पेटवून देण्यात
आले होते. अन्यत्रही काही ठिकाणी मराठा आंदोलकांकडून जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या.
या जाळपोळीच्या घटनांमागे काही राजकीय नेते असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. या हिंसाचारामधील ५० जणांची ओळख पटली
असून त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे
फडणवीस यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजद्वारे ओळख पटविली जात असल्याचेही त्यांनी
सांगितले. ओबीसी नेत्यांना आंदोलकांकडून धमक्या येत असून सरकारने हे प्रकरण गांभीर्याने
घेतले आहे,
असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
****
मराठा आंदोलन प्रकरणी वैजापूरचे आमदार रमेश
बोरनारे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आपला मराठा आंदोलनाला पूर्ण पाठिंबा
असून त्यासाठी आपण राजीनामा देत असल्याचे बोरनारे यांनी म्हटले आहे.
****
मेरी माटी-मेरा देश अभियानाअंतर्गत अमृत
कलश यात्रेचा सांगता समारंभ आज नवी दिल्लीत कर्तव्य पथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
उपस्थितीत होत आहे. गृहमंत्री अमित शहा हे देखील या समारंभास उपस्थित आहेत. स्वातंत्र्य
प्राप्तीच्या अमृत महोत्सवाचाही आज समारोप होत आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते अमृत
वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारकाचं उद्घाटन होणार आहे. देशातल्या युवकांसाठी, युवाशक्तीची
एकजूट घडवण्यासाठी 'माझा युवा भारत'या संघटनेची सुरुवात देखील आज पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे.
****
गोव्यात सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय
क्रीडा स्पर्धेमध्ये ४७ सुवर्ण, ३४ रौप्य, ३३ कांस्य पदकांसह ११४
पदके प्राप्त करीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. तर ५० पदकांसह हरियाणा दुसऱ्या
आहे. महाराष्ट्राच्या तेजस अशोक शिरसे याने पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्यांच्या धावण्याच्या
स्पर्धेत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या १३ पूर्णांक ८० सेकंदात
हे अंतर पार तो या स्पर्धेत अव्वल राहिला. आधुनिक पेटाथेलॉन स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्राच्या
मयंक छापेकर याने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
****
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधल्या एकता नगर इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी
या पटेल यांच्या पुतळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं. संकटामागून
संकटे येऊनही भारताची अखंडता अबाधित आहे. जगाची तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे
देश आगेकूच करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. तुष्टीकरणाचं
राजकारण हा देशाच्या विकासातला सर्वात मोठा अडथळा असल्याचं त्यांनी नमूद केलं. तत्पूर्वी
पंतप्रधानांनी राष्ट्रीय एकता दिवस संचलनाला सलामी दिली, तसंच
उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.
****
आकाशवाणीच्या यंदाच्या सरदार पटेल स्मृती
व्याख्यानाचं प्रसारण आज होणार आहे. या व्याख्यानमालेत यावर्षी माजी राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांचं भाषण होणार आहे. हे भाषण आज रात्री साडेनऊ ते दहा या वेळेत प्रसारित होईल.
एफएम गोल्ड,
आणि आकाशवाणीच्या समाजमाध्यमांवरुनही हे भाषण ऐकता येईल.
****