Sunday, 29 October 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.10.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 October 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      युवाशक्तीची एकजूट घडवण्यासाठी 'माझा युवा भारत' संघटनेची स्थापना;युवकांनी सहभागी होण्याचं पंतप्रधानांकडून मन की बात च्या माध्यमातून आवाहन.

·      मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनात समाजाची ठिकठिकाणी आंदोलनं.

·      राज्यभरातली सर्व कृषी केंद्र येत्या २ ते ४ नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा संघटनेचा निर्णय.

आणि

·      एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचं इंग्लंडसमोर २३० धावाचं आव्हान.

****

युवाशक्तीची एकजूट घडवण्यासाठी 'माझा युवा भारत' ही संघटना स्थापन होत असून, युवकांनी या संघटनेचं संकेतस्थळ 'माय भारत डॉट जीओव्ही डॉट इन' यावर नोंदणी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज आकाशवाणीवरच्या मन की बात या आपल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचा आज १०६ वा भाग होता. ३१ ऑक्टोबर रोजी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनापासून या राष्ट्रव्यापी संघटनेचा पाया रचला जाणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. मेरी माटी मेरा देश, टाकाऊतून टिकाऊ, आत्मनिर्भर भारत, क्रीडापटूंची कामगिरी आदी मुद्यांवरही पंतप्रधानांनी भाष्य केलं.

देशातील नागरिकांनी पर्यटनाला किंवा तीर्थयात्रेला गेल्यावर त्या त्या ठिकाणच्या स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या वस्तूची खरेदी करावी, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. सर्व सणांच्या शुभेच्छा देत पंतप्रधानांनी सरदार पटेल, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह या महिन्यात जयंती तसंच स्मृतिदिन असलेल्या सर्व संतमहंतांचं स्मरण केलं.

****

मराठा समाज त्यांचा हक्क मागत असून, त्यांना तो मिळायला हवा, असं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज जाहीर केलेल्या एका पत्रकात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओबीसी, आदिवासी सह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवं असं म्हटलं आहे.

****

दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठींबा दर्शवण्यासाठी तसंच त्यांच्या समर्थनार्थ सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मराठा समाजाकडून आमरण उपोषण सुरु करण्यात आलं आहे. तसंच जिल्ह्यातील सुमारे ५०० गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आज सकाळी उत्तर सोलापर तालुक्यातील कारंबा या गावात १०० मराठा युवकांनी मुंडण आंदोलन केलं.

****

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, जातनिहाय जनगणना करावी यासह अन्य मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातल्या मंठा इथं आज ओबीसी समाजाच्यावतीनं मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मोर्चाचं रुपांतर सभेत झालं. जिल्हास्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारावे, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बदनापूर तालुक्यातल्या बाजार गेवराई इथं मराठा समाजातल्या तरुणांनी सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. जिल्ह्यातल्या बहुतांश गावांमध्ये साखळी उपोषणं सुरू आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलताबाद तालु्क्यात सुलतानपूर इथं मराठा बांधवांनी आज आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केलं. परिसरातल्या जाफरवाडी, महमदपूर, कानडगाव, भांडेगाव आद गावातून जमलेल्या मराठा समाजाच्या महिला पुरुषांनी रस्त्यावर बसून भजनं गाऊन शांततेच्या मार्गाने हे आंदोलन केलं. मंडळ अधिकारी तसंच तलाठ्यांना निवेदन देऊन गावकऱ्यांनी सदर रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला. दरम्यान या गावांमध्ये साखळी उपोषणही करण्यात येत आहे.

 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड आणि बीड जिल्ह्यात काल एसटी बस पेटवून दिल्याच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं सावध पवित्रा घेतला असून, हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तिन्ही आगारातून बस बाहेर न सोडण्याचे आदेश विभागीय नियंत्रकांनी आगारप्रमुखांना दिले आहेत. त्यामुळं आज दुपारी १ वाजेनंतर सर्व बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यातील बस सेवाही अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आली आहे.

****

मराठा समाज त्यांचा हक्क मागत असून, त्यांना तो मिळायला हवा, असं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज जाहीर केलेल्या एका पत्रकात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओबीसी, आदिवासी सह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवं असं म्हटलं आहे.

****

यवतमाळ इथं उद्या नागरिकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन आपल्या दारी अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते होईल तर अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड असणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून ३५ हजाराहून अधिक लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. त्यापैकी काही लाभार्थ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्यक्ष लाभाचं वितरण केलं जाणार आहे.

****

नाशिक शहरालगत असलेल्या शिंदे पथकर नाक्यावर आयकर विभागाच्या दोन पथकांनी छापा टाकत महत्त्वाच्या अनेक कागदपत्रांची तपासणी केली. या कारवाई दरम्यान पथकर नाक्यावरील सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल्स जप्त करण्यात आले. पथकर नाक्यावर कथित भ्रष्टाचार तसंच काही अनियमितता असल्याच्या कारणावरून हा छापा टाकल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यभरातली सर्व कृषी केंद्र येत्या २ ते ४ नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र खतं वितरक संघटना- माफदाचे राष्ट्राध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी ही माहिती दिली आहे. प्रस्तावित कृषी विधेयकामुळं होऊ शकणाऱ्या नुकसानीबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना वेळोवेळी निवेदनं दिल्यानंतरही त्यावर काही निर्णय न झाल्यामुळं राज्यभरातली कृषी केंद्र तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं माफदाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

****

क्रिकेट

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं इंग्लंडसमोर २३० धावाचं आव्हान ठेवलं आहे. लखनौ इथं भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. कर्णधार रोहित शर्माच्या ८७, सूर्यकुमार यादवच्या ४९, के एल राहुलच्या ३९ आणि जसप्रीत बुमराहच्या १६ धावा वगळता, भारताचे इतर फलंदाज दुहेरी धावाही करू शकले नाहीत. विराट कोहली शून्य, श्रेयस अय्यर चार, रवींद्र जडेजा आठ, तर शुभमन गिल नऊ धावावर तंबूत परतला. निर्धारित ५० षटकांत भारतीय संघ नऊ बाद २२९ धावा करू शकला.

****

येत्या ६६ व्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर शहराची माती आणि गादी विभागाची निवड चाचणी स्पर्धा केगाव इथं पार पडली. सोलापूर शहर तालीम संघाचे अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. या स्पर्धेत शहरातील १५० हून अधिक मल्लांनी सहभाग नोंदवला होता. येत्या ४ ते ८ नोव्हेंबर दरम्यान पुण्यात पुलगाव इथं राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहेत. त्या स्पर्धेसाठी ही निवड चाचणी घेण्यात आली.

****

बीड जिल्ह्यात वडवणी इथं महिला स्वंयसहाय्यता बचतगटांतील महिलांना स्वंयरोजगार निर्मितीसाठी ट्रॅक्टर सहित कृषी औजारांसह विविध यंत्रं तसंच ई रिक्षा वाटप करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत तीन गावांना ट्रॅक्टर सह कृषी औजारे, बँक युनिट, सात गावातील सात बचतगटांना विविध यंत्रं आणि सहा गावात प्रत्येकी एक ई रिक्षा वाटप करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर चे विभागीय आयुक्त मधुकर आर्दड तसंच बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

****

लातूर इथं परवा ३१ ऑक्टोबर रोजी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारीहे अभियान राबवण्यात येणार आहे. मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या उपस्थितीत  सकाळी ११ वाजता हे शिबीर होणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी या शिबिराच्या पूर्वतयारीचा आढावा घेवून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयानं काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या शिबिरासाठी येताना आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धाराशिव जिल्ह्याचे पहिले जिल्हा प्रचारक, बाळासाहेब दीक्षित यांच्या जीवनावरील 'अनुपमेय हा आत्मविलोपी' या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं. जनजाती कल्याण आश्रमाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य सुरेश कुलकर्णी, धाराशिव जिल्हा संघचालक अनिल यादव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

No comments: