Thursday, 26 October 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 26.10.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 26 October 2023

Time: 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २६ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर; विविध विकास कामांचं उद्घाटन तसंच पायाभरणीसह नमो किसान महासन्मान योजनेलाही प्रारंभ

·      चालू रब्बी हंगामासाठी खतांच्या अनुदानाचे दर जाहीर

·      मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा उपोषण सुरु

आणि

·      पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत काल तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंची ३० पदकांची कमाई

सविस्तर बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर येत असून, विविध विकास कामाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. मन की बात मध्ये उल्लेख केलेल्या निळवंडे धरणाचं लोकार्पण, साईबाबा मंदिराचं नवीन दर्शन रांग संकूल, अहमदनगर इथल्या महिला आणि बाल रुग्णालयाचं भूमिपूजन, शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचं भूमिपूजन, शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप, कुर्डूवाडी - लातूर रोड, तसंच जळगाव ते भुसावळच्या तिसर्या आणि चौथ्या रेल्वे लाईनच्या विद्युतिकरणाची सुरुवात यावेळी होणार आहे. त्यानंतर साई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर काकडी इथं पंतप्रधान नागरिकांना संबोधित करणार आहेत.

या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेला प्रारंभ होणार आहे. राज्यातल्या सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्येकी दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता त्यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे.

दरम्यान, शिर्डी दौऱ्याहून पंतप्रधान गोव्याच्या दौऱ्यावर जाणार असून, मडगाव इथं ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असलेले ९०० खेळाडू आणि २०० मार्गदर्शक अशा एकूण अकराशे सदस्यांच्या महाराष्ट्राच्या पथकाकडे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रीडाध्वज हस्तांतरित केला.

****

केंद्र सरकारने चालू रब्बी हंगामासाठी खतांच्या अनुदानाचे दर काल जाहीर केले. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. नत्रासाठी प्रतिकिलो ४७ रुपये दोन पैसे, स्फुरद प्रति किलो २० रुपये ८२ पैसे तर पलाश घटकासाठी प्रतिकिलो दोन रुपये ३८ पैसे इतकं अनुदान केंद्र सरकार देणार आहे.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं कालपासून पुन्हा उपोषण सुरु केलं आहे. उपोषण सुरु करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आरक्षण जाहीर करण्यासाठी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपली असून, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे अद्याप देखील मागे घेतले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसेल असं ५० टक्क्यांच्या आत आरक्षण देण्याच्या मागणीचा जरांगे यांनी पुनरुच्चार केला. मराठा बांधवांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावं, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी, गावांमध्ये आलेल्या नेत्यांना शांततेने परत पाठवावं, अशा सूचनाही त्यांनी समाज बांधवांना केल्या.

****

पंढरपुरात सर्वपक्षीय आमदार, खासदार, मंत्री आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. मराठा आरक्षण मिळाल्यावरच सर्व आमदार खासदारांना विठ्ठल दर्शनासाठी प्रवेश मिळेल, अशा आशयाचं फलक गावागावांमधून दिसून येत आहेत. मराठवाड्यातही सर्वच जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये देखील असे फलक लावले असल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

****

मेरी माटी मेरा देश, ‘मिट्टी को नमन, वीरोंको वंदन या अभियानांतर्गत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली पवित्र माती ११ कलशांमध्ये भरुन काल मुंबईकडे रवाना करण्यात आली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. येत्या ३१ ऑक्टोबरला हे कलश मुंबईहून दिल्लीला पाठवले जाणार आहे. 

नांदेड इथंही जिल्ह्यातून एकत्रित करण्यात आलेल्या अमृत कलशांची काल यात्रा काढण्यात आली. हे अमृत कलश घेऊन नेहरू युवा केंद्राचे ३२ स्वयंसेवक दिल्लीला जाणार आहेत. या स्वयंसेवकांना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काल शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने ७५ ठिकाणी अमृतवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. नागपूर, यवतमाळ, वाशिम, गोंदियासह अनेक जिल्ह्यातून काल अमृत कलश मुंबईला पाठवण्यात आले.

****

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेली समिती, आज लातूर दौऱ्यावर येत आहे. नागरिकांनी आपल्याकडील निजामकालीन करार, सनदी, वंशावळी, शैक्षणिक तसंच महसूली पुरावे, राष्ट्रीय दस्तावेज आदी पुरावे सकाळी ११ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सादर करावेत, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. दरम्यान, ही समिती उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे.

****

हिंगोली इथं भूमिअभिलेख कार्यालयात इसमवार नोंदवहीमध्ये कुणबी म्हणून नोंद असलेल्या एक हजार ८३ नोंदी सापडल्या आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

हिंगोलीच्या तहसिल कार्यालयात मोडी लिपीतील कागदपत्रांचे वाचन आणि तपासणीचे काम २३ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. पुणे इथले मोडी लिपी अभ्यासक संजय गुजले हे जुन्या कागदपत्रांचे वाचन करत असून, त्यामध्ये मराठा-कुणबी नोंद असलेले पुरावे गोळा करण्यात येत आहेत. २५ ऑक्टोबर रोजी भूमिअभिलेख कार्यालयात गुजले यांनी इसमवार नोंद वही नमुना नंबर ३३ ची तपासणी केली. यात सायंकाळपर्यंत कुणबी म्हणून १०८३ नोंदी सापडल्या आहेत. भूमिअभिलेख कार्यालयासह तहसीलमध्ये मराठा-कुणबी नोंदीचा शोध आणि तपासणीचे काम अद्याप शिल्क आहे.

आकाशवाणी बातम्यांसाठी, रमेश कदम, हिंगोली.

****

चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत काल तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी ३० पदकांची कमाई केली.

महिलांच्या लांब उडी स्पर्धेत सुरेश निमिषा चक्कुंगल पारंबिलनं, धावण्याच्या स्पर्धेत रक्षिता राजुनं, तर भालाफेक मध्ये सुमित अंतिल आणि हानी यांनी सुवर्णपदक पटकावलं.

पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत सोमण राणानं, धावण्याच्या स्पर्धेत शरथ शंकरप्पा तसंच ललिता किलाकानं, तिरंदाजीमध्ये हरविंदर सिंह आणि साहिल यांनी, महिला तिरंदाजी सांघिक स्पर्धेत शीतल आणि शरीता यांनी, महिलांच्या थाळी फेक स्पर्धेत पूजानं, महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत मानसी जोशी आणि वैष्णवी यांनी, तर महिलांच्या भारोत्तोलन स्पर्धेत झैनाब खातूननं रौप्यपदक पटकावलं.

मिश्र दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत प्रमोद भगत आणि मनिषा रामदास, शिवराजन सोलाईमलाई आणि सिवन निथ्या, तसंच नितीश कुमार आणि थुलासिमथी मुरुगेसेन यांनी कांस्य पदक जिंकलं.

महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत भाविना पटेलनं, पुरुषांच्या धावण्याच्या शर्यतीत नारायण ठाकूर, श्रेयांश त्रिवेदी आणि बलवंत सिंहनं, महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत शशी कसाना, भालाफेक मध्ये पुष्पेंद्र सिंह यानं, गोळाफेक मध्ये सोमा होकाटो होटेजे हीनं, टेबल टेनिस पुरुष एकेरी स्पर्धेत संदीप डांगीनं कांस्यपदक जिंकलं.

या स्पर्धेत आतापर्यंत भारताने १५ सुवर्ण, २० रौप्य आणि २९ कांस्य पदकांसह एकूण ६४ पदकं जिंकली आहेत.

****


एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल दिल्ली इथं झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नेदरलँडचा ३०९ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत निर्धारीत ५० षटकांत आठ बाद ३९९ धावा केल्या. उत्तरादाखल नेदरलँडचा संघ २१ षटकांत अवघ्या ९० धावांवर सर्वबाद झाला. या स्पर्धेत आज इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे.

****

औरंगाबाद महानगरपालिकेनं काल मालमत्ता कर थकबाकीपोटी एका खासगी शैक्षणिक संस्थेच्या दोन कार्यालयांना सील ठोकलं. या संस्थेनं महापालिकेचा साडे चौदा लाख रुपयांहून अधिक कर थकवला आहे. मालमत्ताधारकांनी आपल्या कडील थकीत मालमत्ता कर त्वरित भरणा करावा आणि संभाव्य कारवाई टाळावी, असं आवाहन महापालिकेचे सहायक आयुक्त संजय सुरडकर यांनी केलं आहे.

****

बीड इथं नवरात्र उत्सवात जन्मलेल्या १५१ मुलींसह मातांचा काल रोटरी क्लबच्या वतीनं सत्कार करण्यात आला. या उपक्रमात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिलेले डॉक्टर आणि परिचारिकांनाही जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे दीड दशकापासून आरोग्य सेवा बजावत असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी, शासकीय सेवेत समायोजन करून घेण्याच्या मागणीसाठी कालपासून बेमुदत संप पुकारला आहे. काल सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात आंदोलक कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून शासनाचं लक्ष वेधून घेतलं.

****

No comments: