Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 27 October 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
देशात फाईव्ह - जी सेवांचा वेगाने प्रसार होत असून, 6 - जी तंत्रज्ञानात भारत जगाचं नेतृत्व करेल, असा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत आज सातव्या भारतीय मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. सरकारने प्रत्येक नागरिकापर्यंत फाईव्ह - जी कनेक्टिव्हिटी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, मोबाईल ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारत ११८ व्या क्रमांकावरून ४३ व्या स्थानावर पोहोचला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
****
नवी गुन्हे न्याय प्रणाली संसदीय समितीच्या विचाराधीन असून, लवकरच ती लागू करण्यात येईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. हैदराबाद इथल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकदमीमध्ये दीक्षांत संचलनाची पाहणी केल्यानंतर ते आज बोलत होते. लोकांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी सुधारित आयपीसी फौजदारी प्रक्रिया संहिता आणि संबंधित कायदे एका प्रणालीखाली आणले जात असल्याचं शहा यांनी सांगितलं.
****
मेरी माटी मेरा देश अभियानामध्ये महाराष्ट्राचा सहभाग उस्फुर्त असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या अमृत कलशांचं, आज मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पूजन झालं, त्यानंतर ते बोलत होते. राष्ट्र किंवा देश मोठे प्रकल्प, पायाभूत आणि भौतिक सुविधा एवढ्यापुरते मर्यादित नसून, आपला देश, आपलं राज्य, आपला परिसर म्हणजे मातृभूमीवर प्रेमही तेवढंच महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या उपक्रमातून नव्या पिढीला राष्ट्रीय एकात्मतेची नवी प्रेरणा, नव ऊर्जा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातून ३८१ कलश विशेष रेल्वेने दिल्लीसाठी रवाना होणार आहे. ही रेल्वे सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास मुंबई स्थानकावरून सुटेल आणि उद्या दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी दिल्ली इथं हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोहोचणार आहे.
****
राज्याच्या मुद्रांक शुल्क आणि नोंदणी महानिरिक्षक कार्यालयानं विकसित केलेल्या नव्या नोंदणी प्रणालीची अंमलबजावणी एक नोव्हेंबर पासून करण्यात येणार आहे. या नव्या प्रणालीनुसार घरमालक आणि भाडेकरु यांच्यात अधिकृत करार होऊन त्याची नोंदणी होताच या कराराची संपूर्ण माहिती नजिकच्या पोलिस ठाण्यातील यंत्रणेला थेट कळवली जाईल.
****
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा काल शिर्डी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी राज्यातल्या ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एक हजार ७१२ कोटी रुपये जमा करण्यात आले. हा आपल्या जीवनातील ऐतिहासिक आणि अविस्मरणीय दिवस असल्याची प्रतिक्रिया कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
****
येत्या सणासुदीच्या दिवसात अन्न पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न आस्थापनांची तपासणी करायची विशेष मोहिम सुरु केली आहे. ही मोहिम डिसेंबरपर्यत राबवण्यात येणार आहे. उत्पादकांकडे कायद्यातल्या तरतुदींचं उल्लंघन होत असल्याचं आढळून आल्यास, कडक कारवाई करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिला आहे.
****
आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेल्या फटाक्यांची साठवणूक आणि विक्रीस प्रतिबंध घालण्याचे आदेश नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जारी केले आहेत. हा नियम मोडल्यास, कायदेशीर कठोर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
****
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणा-या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबईतल्या माथाडी कामगारांनी आज एकदिवसीय बंद पुकारला आहे. यामध्ये मसाला, कांदा बटाटा, धान्य मार्केटमधले व्यवहार पूर्णपणे बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळाजापूर इथं आजपासून महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या शिबिरात सर्वरोगांचं निदान, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनानं केलं आहे.
****
चीनमध्ये सुरु असलेल्या पॅरा आशियाई क्रिडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडुंनी दमदार सुरुवात केली. तिरंदाजीमध्ये शीतल देवीनं, धावण्याच्या शर्यतीत रमण शर्मानं, बॅडमिंटनमध्ये तुलसिमती मुरुगेसन, सुहास यतिराज आणि प्रमोद भगतनं, सुवर्ण पदक पटकावलं.
बॅडमिंटनमध्ये नितेश कुमारनं, भालाफेकमध्ये प्रदीप कुमारनं रौप्य पदक जिंकलं. थाळीफेकमध्ये लक्ष्मीनं, तर भालाफेकमध्ये अभिषेक चमोलीनं कांस्य पदक मिळवलं.
या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत २४ सुवर्ण, २७ रौप्य आणि ४३ कांस्य पदकांसह एकूण ९४ पदकांची कमाई केली आहे.
****
No comments:
Post a Comment