आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२६ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते आज विविध विकास कामाचं उद्घाटन तसंच राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेला प्रारंभ होणार आहे.
****
शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर आज विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्यापुढं सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेपक्षाकडून या संदर्भात दाखल ३४ याचिकांचा विषय एकच असल्यानं सर्व याचिकांची सहा गटांत विभागणी करुन एकत्र सुनावणी घेण्यात येणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या आष्टी जवळ झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एकूण दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात काल रात्री रुग्णवाहिकेनं ट्रकला धडक दिल्यानं झालेल्या अपघातामध्ये चौघांचा आणि आज पहाटं खासगी बस उलटल्यानं सहा जणांचा मृत्यू झाला.
****
मेरी माटी मेरा देश अभियाना अंतर्गत नंदूरबार जिल्हाभरातून गोळा करण्यात आलेल्या मातीचे कलश घेवून जिल्ह्यातले पंधरा विद्यार्थी दिल्लीकडे रवाना झाले आहे. जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांकडे हे कलश सुपुर्द करण्यात आले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी गोव्यातल्या मडगांव इथं ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं उदघाटन करतील. या स्पर्धेमध्ये देशभरातले दहा हजाराहून अधिक खेळाडू सहभागी होत असून २८ मैदानांवर ४३ क्रीडा प्रकारांमध्ये ही स्पर्धा होत आहे.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताने १६ सुवर्ण, २० रौप्य आणि ३१ कांस्य पदकांसह एकूण ६७ पदकं जिंकली आहेत.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. बंगळुरू इथं दुपारी दोन वाजता हा सामना सुरू होईल.
****
वाहन चोरट्यांच्या एका टोळीला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. टोळीतल्या दोघांना शिर्डी इथून तर त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला जालना इथून अटक करण्यात आली असून ही टोळी छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत चोऱ्या करत असे.
****
No comments:
Post a Comment