आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२७ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
सातव्या भारतीय मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. देशभरातल्या शिक्षण संस्थांना हंड्रेड फाईव्ह - जी युज केस लॅब्सचं वाटप यावेळी करण्यात येणार आहे. फाईव्ह - जी तंत्रज्ञानाशी संबंधित संधी समजून घेणं आणि भारताच्या तसंच जागतिक मागण्यांच्या अनुषंगानं फाईव्ह - जी ॲप्लिकेशन्स विकसित करणं हा याचा उद्देश आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गोव्यात ३७व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन केलं. सरकारनं खेळाडूंच्या गुणवत्तेचा शोध घेण्यापासून ते त्यांना ऑलिंपिकसारख्या स्पर्धांमधे पाठवण्यापर्यंतचा रोडमॅप तयार केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, या स्पर्धेत काल महाराष्ट्राने पाच सुवर्णांसह एकूण १५ पदकं जिंकली.
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव यांना राष्ट्रीय निवडणूक आयकॉन घोषित केलं आहे. मतदारांकडे मतदानाची सर्वात मोठी ताकद आहे, मतदान हे आपलं कर्तव्य तर आहेच, मात्र जगातला सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव साजरा होणाऱ्या देशात मतदान हे प्रासंगिक आहे, असं राजकुमार राव या प्रसंगि म्हणाले.
****
मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या अमृत कलशांचं, आज मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पूजन होणार आहे. या कार्यक्रमानंतर संध्याकाळी विशेष रेल्वेने हे कलश दिल्लीसाठी रवाना होतील.
****
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर काल सुनावणीला सुरूवात झाली. या सुनावणीचं सुधारित वेळापत्रक सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या शिरड शहापूर इथं एक लाख पाच हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकाला अटक करण्यात आली. सूर्यकांत खाडे असं त्याचं नाव असून, जलजीवन मिशनचं काम हस्तांतरित करून घेऊन कामाचा पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी आणि नळ जोडणी कामाचे कार्यारंभ आदेश देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
No comments:
Post a Comment