Sunday, 29 October 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 29.10.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 29 October 2023

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २९ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

देशातील नागरिकांनी पर्यटन, तीर्थयात्रेला गेल्यावर त्या त्या ठिकाणच्या स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या वस्तूचीच खरेदी करावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते आकाशवाणीवरच्या मन की बात या आपल्या उपक्रमात बोलत होते. या उपक्रमाचा आज हा १०६ वा भाग होता.

"जब भी आप पर्यटन पर जाएं, तो वहां के स्थानीय कलाकारों के द्वारा बनाए गए उत्पादों को जरुर खरीदें हर बार की तरह, इस बार भी, हमारे त्योहारों में, हमारी प्राथमिकता हो वोकल फॉर लोकल’, ऐसे प्रोडक्ट को खरीदते समय युपीआय डिजिटल पेमेंट सिस्टम से पेमेंट करने के आग्रही बनें हमारा सपना है, ‘आत्मनिर्भर भारत"

३१ ऑक्टोबर रोजी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनापासून 'माझा युवा भारत' या राष्ट्रव्यापी संघटनेचा पाया रचला जाणार असल्याचं ते म्हणाले. युवाशक्तीची एकजूट घडविण्यासाठी 'माझा युवा भारत' या संघटनेचं संकेतस्थळ 'माय भारत डॉट जीओव्ही डॉट इन' या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहनही पंतप्रधांनी यावेळी केलं.

****

मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरू केलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अन्न-पाण्याविना खालावली आहे. आरक्षणाच्या मुद्यावर चर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी यावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे.

****

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा सामना आज दुपारी दोन वाजता गतविजेत्या इंग्लंडशी होणार आहे. पाचही सामने जिंकून भारत दहा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे तर इंग्लंड दोन गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.

****

महिला आशियाई हॉकी चँपियन्स ट्रॉफी या स्पर्धेत झारखंड मधल्या रांची इथं झालेल्या सामन्यात काल भारतानं मलेशियाचा पाच- शून्य अशा गुणफरकानं पराभव केला. स्पर्धेत अन्य सामन्यांमध्ये काल जपाननं दक्षिण कोरियाचा तर चीननं थायलंडचा पराभव केला. उद्या भारताचा सामना चीनशी होणार आहे.

****

कोजागिरी पोर्णिमेनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीत काल देवगिरी संस्कृती महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवात महागामी गुरुकुलच्या विद्यार्थीनींनी कथ्थक आणि ओडिसी नृत्य सादर केलं. जयंत नेरळकर, वैभव पांडे, वर्षा जोशी आणि पंकज देशपांडे यांनी चंद्र आणि चांदण्यांवरील गीतांचं सादरीकरण या महोत्सवात केलं.

****

दक्षिण मध्य रेल्वे विभाग नांदेड ते पानिपत दरम्यान विशेष गाडीची आणखी एक फेरी करणार आहे. नांदेड ते पानिपत ही विशेष रेल्वेगाडी उद्या सोमवारी सकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी नांदेड रेल्वेस्थानकातून निघेल आणि पूर्णा परभणी, जालना, औरंगाबाद, अंकाई, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, बिना, वीरांगना  लक्ष्मीबाई झांसी, आग्रा कांत, पालवल, नवी दिल्ली  या रेल्वे स्थानकावर थांबून पानिपत इथे मंगळवारी ३१ तारखेला  दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. ही विशेष रेल्वेगाडी पानिपत इथून मंगळवारी ३१ तारखेला दुपारी सव्वा तीन वाजता निघून बुधवारी १ तारखेला सायंकाळी साडे ७ वाजता नांदेडला पोहोचेल.

दौंड-मनमाड विभागातील  विसापूर ते बिल्वंदी विभागातील दुहेरीकरणाच्या कामांमुळे लाईन ब्लॉक  घेण्यात आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे विभागानं  काही रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.

दौंड निझामाबाद एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी  ३०, ३१ ऑक्टोबर आणि २ तसंच ३ नोव्हेंबर या तारखांना रद्द करण्यात आली आहे., निझामाबाद - दौंड एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी १, , ३ आणि ५ नोव्हेंबर या तारखांना, निझामाबाद ते पंढरपूर एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी ३१ ऑक्टोबर, , ३ आणि ४ नोव्हेंबर या तारखांना तर पंढरपूर ते निझामाबाद एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी दिनांक १, , ४ आणि ५ नोव्हेंबर या दिवशी रद्द करण्यात आली आहे.

****

 

 

 

 

 

 

 

No comments: