Saturday, 28 October 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 28.10.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 28 October 2023

Time: 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २८ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      शासकीय सेवेत नव्यानं नियुक्त ५१ हजार उमेदवारांना आज पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप

·      राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्याचं  केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांचं आश्वासन

·      माझी माती माझा देश अभियानाचा राज्य शासन स्तरावर समारोप;अमृत कलश दिल्लीला रवाना

·      माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन;आज अंत्यसंस्कार

आणि

·      पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारत शंभरीच्या उंबरठ्यावर;महिला आशियायी हॉकी स्पर्धेतही विजयी सलामी

सविस्तर बातम्या

शासकीय सेवेत नव्याने नियुक्त झालेल्या ५१ हजाराहून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी एक वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्रांचं वाटप करणार आहेत. देशभरात ३७ ठिकाणी हा रोजगार मेळावा होणार आहे. हे नवे कर्मचारी रेल्वे मंत्रालय, टपाल विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासह सरकारची विविध मंत्रालयं, विभागांमध्ये रुजू होतील. दरम्यान, उद्या सकाळी पंतप्रधान मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.

****

राज्यातल्या तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल, असं आश्वासन, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिलं आहे. त्या काल मुंबईत प्रधानमंत्री मातृवंदना योजना जनजागृती कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी १२ हजार ८०० रुपये देण्यात येणार असून, अंगणवाडी ताईच्या सुरक्षेसाठी, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचा हप्ता केंद्र शासनाकडून भरण्यात येईल, असंही ईराणी यांनी यावेळी सांगितलं.

****

माझी माती माझा देश अभियान हे देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन करण्याची संधी देणारा कार्यक्रम असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर राज्य शासनाच्या स्तरावर या अभियानाच्या समारोप झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या अमृत कलशांचं, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पूजन झालं. ३६ जिल्ह्यातले अमृत कलश घेऊन ९०८ स्वयंसेवक विशेष वातानुकूलित रेल्वेनं मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकातून दिल्लीला रवाना झाले. मुख्यमंत्र्यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. सायंकाळच्या सुमारास मुंबई स्थानकावरून निघालेली ही रेल्वे आज दुपारी दिल्ली इथं हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोहोचणार आहे.

****

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाला कालपासून प्रारंभ झाला. येत्या नऊ डिसेंबर पर्यंत हा कार्यक्रम राज्यात राबवला जाणार आहे. समाजातल्या काही वंचित घटकातल्या नागरिकांची मतदार यादीत नोंद  करण्यासाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे. १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी महाविद्यालयीन  विद्यार्थी, महिला आणि दिव्यांग व्यक्तिंसाठी, तर तृतीयपंथी व्यक्ती, शरीरविक्रय करणाऱ्या महिला, भटक्या विमुक्त जमातींसाठी, दोन आणि तीन डिसेंबर या दिवशी शिबीरं आयोजित केली जाणार आहेत. ग्राम विकास विभाग तसंच पंचायतराज विभागाच्या सहकार्याने एक ते सात नोव्हेंबर या कालावधीत राज्यभरात विशेष ग्रामसभा घेऊन मतदार याद्यांचं वाचन केल जाणार आहे.

****

माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांच्या पार्थिव देहावर आज अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यात पागोरी पिंपळगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. न्यूमोनियाने आजारी असलेले ढाकणे यांच्यावर गेल्या तीन आठवड्यांपासून अहमदनगर इथल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ढाकणे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिले आहेत.

****

ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिव देहावर काल नवी मुंबईत नेरुळ इथं शासकीय इतमामात अंत्यंसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबामहाराज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.

****

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यात घेतलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या बहुतांश गावांमध्ये मराठा समाजाकडून साखळी उपोषण करण्यात येत आहे. घनसावंगी तालुक्यातल्या ४५ गावं या साखळी उपोषणात सहभागी झाली आहेत. तसंच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचे फलकही गावोगावी लावण्यात आली आहेत.

****

नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दोन वाहनांची गुरुवारी रात्री तोडफोड झाली. खासदार चिखलीकर हे गुरुवारी रात्री कंधार तालुक्यातल्या अंबुलगा इथं माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर तेलंग यांच्या भेटीसाठी गेले होते. राजकीय नेत्याने गावात प्रवेश केल्याने संतप्त झालेल्या मराठा तरुणांनी त्यांच्या दोन वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर खासदार चिखलीकर हे पोलीस वाहनातून नांदेडकडे रवाना झाले. आरक्षणावर राज्य सरकार निश्चितच तोडगा काढेल, मात्र मराठा समाजाने संयम राखावा, असं आवाहन चिखलीकर यांनी केलं.

****

मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत केलेल्या समितीला येत्या २४ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, या समितीनं काल धाराशिव जिल्ह्याचा आढावा घेतला. 

****

येत्या सणासुदीच्या दिवसात अन्न पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न आस्थापनांची तपासणी करण्याच विशेष मोहिम सुरु केली आहे. ही मोहिम डिसेंबरपर्यत राबवण्यात येणार आहे. उत्पादकांकडे कायद्यातल्या तरतुदींचं उल्लंघन होत असल्याचं आढळून आल्यास, कडक कारवाई करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिला आहे.

****

पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत ९९ पदकं जिंकून गेल्यावेळचा ७२ पदकांचा विक्रम मोडीत काढला आहे. काल सकाळी तीरंदाजीच्या कंपाउंड स्पर्धेत शीतल देवी हिने वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं. दोन्ही हात नसलेली शीतलदेवी ही जगातली एकमेव धनुर्धर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीतलदेवीसह विजेत्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.

Byte…

बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत नीतेश कुमार आणि तरुण यांच्या जोडीने तर वैयक्तिक गटाच्या तीन प्रकारात सुहास यतिराज प्रमोद भगत आणि थुलासिमथी यांनी सुवर्णपदकं पटकावली.

पंधराशे मीटर टी ३८ स्पर्धेत रमन शर्माने, थाळीफेक प्रकारात देवेंद्र कुमारने तर गोळाफेक प्रकारात मनू याने सुवर्णपदक पटकावलं आहे. आतापर्यंत २५ सुवर्ण, २९ रौप्य आणि ४५ कांस्यपदकांसह पदकतालिकेत भारताच्या पदकांची संख्या ९९ वर पोहोचली आहे.

महिला आशियाई हॉकी स्पर्धेत काल रांची इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने थायलंडचा सात - एक असा दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारताकडून संगीता कुमारीनं हॅटट्रिक केली, तर मोनिका, सलिमा टेटे, दीपिका आणि लालरेम्सियामी यांनी प्रत्येकी एक गोल केला.आज या स्पर्धेत भारताचा मलेशियाशी सामना होणार आहे.

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा एक गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानचा संघ ४७व्या षटकात २७० धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं १६ चेंडू शिल्लक असतानाच हे आव्हान पूर्ण केलं.

****

या स्पर्धेत आज धर्मशाला इथं ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, तर कोलकाता इथं बांग्लादेश विरुद्ध नेदरलँड्स सामना होणार आहे.

****

गोवा इथं सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघात छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा प्रबोधिनीच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. काजल आटपाडीकर, निर्जला शिंदे आणि शालिनी साकुरे अशी निवड झालेल्या खेळाडूंची नावं आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथं प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेची काल राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर यांच्या व्याख्यानाने सांगता झाली. भारतात होत असलेल्या विकासात्मक कामामुळे आज भारत हा अन्य देशासाठी रोल मॉडेल ठरत असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

****

जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यात येणोरा इथं कापसाच्या शेतात तुरीसह लावलेली गांजाची झाडं परतूर आणि आष्टी पोलिसांनी काल संयुक्त कारवाई करत जप्त केली. या झाडांचं वजन तीन क्विंटल ७० किलो भरलं असून, त्याची बाजारभावाप्रमाणे किमंत सुमारे ३५ लाख रुपये आहे.

****

No comments: