Monday, 30 October 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 30.10.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 30 October 2023

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३० ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक, आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी स्थापन न्यायमूर्ती शिंदे समितीनं, प्रथम अहवाल सादर केला असून, तो उद्या मंत्रिमंडळासमोर स्वीकारला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिंदे समितीला जवळपास एक कोटी ७३ लाख कागदपत्रांपैकी, ११ हजार ५३० कुणबी नोंदी आढळून आल्याची माहिती त्यांनी दिली. कुणबी असल्याचा पुरावा असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यातल्या त्रुटी दूर करुन अभ्यास करण्यासाठी, तीन निवृत्त न्यायमूर्तींची मार्गदर्शक समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ही समिती क्यूरेटिव्ह याचिका आणि टिकणारं आरक्षण यासंदर्भात मार्गदर्शन करेल. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिनिधींसोबत आरक्षण उपसमिती उद्या चर्चा करेल, असं ते म्हणाले. 

आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत आंदोलन करावं, आंदोलनाला कुठलंही गालबोट लागू नये याची काळजी घ्यावी, आत्महत्यासारखं टोकाचं पाऊस उचलू नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मनोज जरांगे यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा, डॉक्टरांचे उपचार घ्यावेत, अशी विनंती त्यांनी केली. सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत गंभीर असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आजही ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली आणि गाड्याही पेटवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रेचा उद्या नवी दिल्लीत समारोप होणार आहे. आझादी का अमृत महोत्सवाच्या समारोपानिमित्त आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारकाचं उद्घाटन करणार आहे.

देशातल्या युवकांसाठी, युवाशक्तीची एकजूट घडवण्यासाठी 'माझा युवा भारत' या संघटनेची सुरुवात देखील उद्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. 

****

देशभरात ग्रामीण भागाची कनेक्टिव्हीटी बळकट करण्यासाठी आता दहा हजार ई-बसेस सुरू करण्यात येणार आहेत. या बसेस खेड्यांना त्यांच्या जिल्ह्यातल्या शहरांशी जोडणार आहेत. या बसेसमुळे ५० हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता असल्याचं रस्ते परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पीएम ई-बससेवा योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात २९ शहरांना जोडलं जाईल. या योजनेसाठी ५७ हजार ६१३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

****

जनजाती सुरक्षा मंचच्या वतीनं काल नाशिक इथं डिलिस्टिंग महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आदिवासी समाजाची संस्कृती सोडून धर्मांतरीत होणाऱ्यांना, आदिवासी समाज म्हणून आरक्षण मिळणं ही भोळ्या आदिवासी बांधवांची फसवणूक असल्याचं मत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यावेळी म्हणाल्या.

****

लातूर इथं उद्या ३१ ऑक्टोबर रोजी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारीहे अभियान राबवण्यात येणार आहे. मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता हे शिबीर होणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी या शिबिराच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. 

****

आंध्र प्रदेशात झालेल्या रेल्वे अपघातामुळे आजची सिकंदराबाद - मनमाड अजिंठा एक्सप्रेस रद्द करणयात आली आहे. परिणामी उद्या मनमाडहून निघणारी अजिंठा एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. तर नांदेड ते संत्रागच्छी एक्स्प्रेस आज नांदेड इथून दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी सुटण्याऐवजी संध्याकाळी सहा वाजता सुटणार आहे.

****

गोव्यात सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने आतापर्यंत ४६ सुवर्ण, २९ रौप्य, ३१ कांस्य अशा एकूण १०६ पदकांची कमाई करत पदक तालिकेत पहिला क्रमांक मिळवला आहे. सिल्याट क्रीडा प्रकारात भक्ती किल्लेदारने सुवर्ण पदकं पटकावलं. जलतरणाच्या पहिल्या दिवशी राज्याच्या खेळाडूंनी दोन रौप्य आणि एक कास्य पदक जिंकलं.

****

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघादरम्यान सामना होणार आहे. पुणे इथं दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल.

दरम्यान, स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत प्रथम क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका दुसर्या, न्यूझीलंड तिसर्या, तर ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावर आहे.

****

No comments: