Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 October
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
·
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या
शिर्डी दौऱ्यावर;विविध विकास कामांचं उद्घाटन तसंच पायाभरणीसह
नमो किसान महासन्मान योजनेलाही प्रारंभ
·
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून पुन्हा उपोषण सुरु
·
कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात
स्थापन समिती उद्या लातूर तर परवा धाराशिव दौऱ्यावर
आणि
·
पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत
भारताची आतापर्यंत १५ सुवर्णांसह एकूण ५८ पदकांची कमाई
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शिर्डी दौऱ्यावर येत असून, विविध विकास कामाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. मन की बात मध्ये उल्लेख
केलेल्या निळवंडे धरणाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. साईबाबा मंदिराचं नवीन
दर्शन रांग संकूल, अहमदनगर इथल्या महिला आणि बाल रुग्णालयाचं
भूमिपूजन, शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचं भूमिपूजन
तसंच शासनाच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप यावेळी पंतप्रधानांच्या
हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर साई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर काकडी इथं पंतप्रधान
नागरिकांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान गोव्याच्या दौऱ्यावर जाणार असून,
मडगाव इथं ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन त्यांच्या
हस्ते होणार आहे. नऊ नोव्हेंबर पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.
****
दरम्यान, शिर्डी इथं होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेला प्रारंभ होणार
आहे, राज्यातल्या सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्येकी
दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. कृषीमंत्री
धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. यासाठी कृषी विभागानं एक हजार ७२० कोटी रुपये निधी
उपलब्ध करून दिला आहे.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी इथं आजपासून
पुन्हा उपोषण सुरु केलं आहे. उपोषण सुरु करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
याआधी दिलेली ४० दिवसांची मुदत संपली असून, मराठा आरक्षण
आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे देखील अद्याप मागे घेतले नसल्याकडे त्यांनी लक्ष
वेधलं. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसेल असं ५० टक्क्यांच्या आत आरक्षण देण्याच्या
मागणीचा जरांगे यांनी पुनरुच्चार केला.
मराठा बांधवांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावं, कुठलाही
अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी, गावांमध्ये आलेल्या
नेत्यांना शांततेने परत पाठवावं, अशा सूचनाही त्यांनी समाज बांधवांना
केल्या.
दरम्यान, या पत्रकार परिषदेदरम्यान ग्रामविकास मंत्री
गिरीश महाजन यांनी जरांगे यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत उपोषण न करण्याची विनंती
केली. सरकार आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र जरांगे यांनी उपोषणावर
ठाम असल्याचं म्हटलं आहे.
जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विविध दीडशे ठिकाणी
साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.
****
मराठा आरक्षणा संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तसंच राज्य सरकारची देखील
भूमिका स्पष्ट असून मराठा समाजाने धीर धरावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. ते आज गोंदिया इथं माध्यमांशी बोलत होते. आरक्षणासाठी
तांत्रिक आणि न्याय बाबींवर मंथन सुरू असल्याचं पटेल यांनी सांगितलं.
****
पंढरपुरात आजपासून सर्वपक्षीय आमदार, खासदार,
मंत्री आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. मराठा
आरक्षण मिळाल्यावरच सर्व आमदार खासदारांना विठ्ठल दर्शनासाठी प्रवेश मिळेल,
अशा आशयाचे फलक गावागावांमधून दिसून येत आहेत. मराठवाड्यातही सर्वच जिल्ह्यातल्या
अनेक गावांमध्ये देखील असे फलक लावले असल्याचं, वृत्तसंस्थेच्या
बातमीत म्हटलं आहे.
****
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती
निश्चित करण्यासाठी नेमलेली समिती उद्या लातूर दौऱ्यावर येत आहे. नागरिकांनी आपल्याकडील
निजामकालीन करार, सनदी, वंशावळी,
शैक्षणिक तसंच महसूली पुरावे, राष्ट्रीय दस्तावेज
आदी पुरावे उद्या सकाळी ११ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सादर करावेत, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालय
इथं होणाऱ्या समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध इ. समितीस
उपलब्ध करुन द्यावीत, असं आवाहनही ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.
दरम्यान, ही समिती परवा शुक्रवारी धाराशिव जिल्ह्याच्या
दौऱ्यावर येणार आहे.
****
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद-एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये आता
आपल्या देशाचं 'इंडिया'ऐवजी भारत असं करण्यात
येणार आहे. परिषदेच्या समितीनं हा नाम बदलाचा प्रस्ताव एकमतानं स्वीकारला आहे. काही
महिन्यांपूर्वी ठेवण्यात आलेला हा प्रस्ताव आता मान्य करण्यात आला असल्याचं परिषदेच्या
एका समिती सदस्यानं सांगितल्याचं वृत्त आहे.
****
मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत गोंदिया जिल्ह्याच्या आठ तालुक्यातून संकलित
केलेली माती आज रेल्वेने मुंबईकडे रवाना झाली. जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी या
कलश यात्रेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.
****
'मेरी माटी मेरा देश', 'मिट्टी को नमन और विरोंको वंदन'
अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पवित्र माती आज ११ कलशांमध्ये
भरुन मुंबईकडे रवाना झाली. त्यानंतर ३१ तारखेला दिल्ली येथे हे
पथक जाणार आहे. पवित्र कलश घेऊन जाणाऱ्या स्वयंसेवकांच्या पथकास आज डॉ. कराड यांच्या
उपस्थितीत मुंबईकडे रवाना करण्यात आले.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत आज तिसऱ्या दिवशी भारतीय
खेळाडूंनी आतापर्यंत चार सुवर्ण, पाच रौप्य, तर दहा कांस्य पदकांची कमाई केली आहे.
महिलांच्या लांब उडी टी फोर्टी सेव्हेन स्पर्धेत सुरेश निमिषा चक्कुंगल पारंबिलनं
सुवर्णपदक जिंकलं. तर पुरुषांच्या गोळाफेक एफ फिफ्टी सेव्हेन स्पर्धेत सोमण राणानं
रौप्यपदक पटकावलं.
भाला फेक स्पर्धेच्या दोन प्रकारात सुमित अंतिल आणि हानी या दोघांनी प्रत्येकी
एक सुवर्णपदक पटकावलं, तर पुष्पेंद्र सिंह याने कांस्यपदक जिंकलं.
तिरंदाजीमध्ये पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात हरविंदर सिंह आणि साहिल यांनी रौप्य
पदक जिंकलं. तर महिला दुहेरी कंपाऊंड तिरंदाजी सांघिक स्पर्धेत, शीतल आणि शरीता यांनी रौप्यपदक पटकावलं. महिलांच्या एफ फिफ्टी फोर फिफ्टी फाईव्ह
थाळी फेक स्पर्धेत पूजानं रौप्यपदक जिंकलं.
महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत भाविना पटेलनं, तर मिश्र
दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत प्रमोद भगत आणि मनिषा रामदास यांनी, पुरुषांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत नारायण ठाकूर आणि श्रेयांश त्रिवेदीनं,
तर महिलांच्या थाळीफेक मध्ये शशी कसाना यांनी कांस्य पदक जिंकलं. महिला
एकेरी एस एल थ्री बॅडमिंटन स्पर्धेत मानसी जोशी आणि वैष्णवी यांनी, तर टेबल टेनिस पुरुष एकेरी स्पर्धेत संदीप डांगीनं कांस्यपदक पटकावलं. तर महिलांच्या
भारोत्तोलन स्पर्धेत झैनाब खातूननं रौप्यपदक जिंकलं.
या स्पर्धेत भारताने आतापर्यंत १५ सुवर्ण, २० रौप्य आणि
२३ कांस्य पदकांसह एकूण ५८ पदकांची कमाई केली आहे.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली इथं ऑस्ट्रेलियानं नेदरलँडला विजयासाठी
४०० धावांचं लक्ष्य दिलं आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
घेत निर्धारित ५० षटकांत आठ बाद ३९९ धावा केल्या आहेत.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं यंदा शतक महोत्सवी नाट्य संमेलन होणार आहे.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात विविध उपक्रम साजरे होणार आहेत. या नाट्य संमेलनाची
मुहूर्तमेढ येत्या रंगभूमी दिनी म्हणजेच पाच नोव्हेंबरला सांगली इथे समारंभपूर्वक रोवण्यात
येणार आहे. 'मुहूर्तमेढ शंभराव्या नाट्य संमेलनाची',
या उपक्रमाचे स्वागत समिती अध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली.
****
औरंगाबाद महानगर पालिकेनं आज मालमत्ता कर थकबाकीपोटी एका खासगी शैक्षणिक संस्थेच्या
दोन कार्यालयांना सील ठोकलं. या संस्थेनं महापालिकेचा साडे चौदा लाख रुपयांहून अधिक
कर थकवला आहे.
****
No comments:
Post a Comment