Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 26 October 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते आज १४ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचं उद्घाटन तसंच राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेला प्रारंभ होणार आहे. राज्यातल्या सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्येकी दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता त्यांच्या हस्ते यावेळी वितरित करण्यात येणार आहे.
****
चांगल्या प्रतीचं बियाणं उत्पादन आणि वितरणामुळं देशाच्या कृषी उत्पादनात वाढ होईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारतीय बियाणं सहकारी समिती-बी बी एस एस एलच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करतांना बोलत होते. त्यांच्या हस्ते यावेळी बी बी एस एस एलचं बोधचिन्ह तसंच संकेतस्थळ आणि पुस्तिकेचं अनावरण करण्यात आलं. चांगल्या बियाणं उत्पादनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना मिळेल तसंच आयात होणाऱ्या बियाणावरचं अवलंबीत्व कमी होईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला या माध्यमातून चालना मिळणार असल्याचं मंत्री शाह यांनी यावेळी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या आष्टी जवळ झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांत दहा जणांचा मृत्यू झाला. काल रात्री दौलावडगाव जवळ वळण मार्गावर ट्रकला पाठीमागून रुग्णवाहिकेनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात रुग्णवाहिकेतल्या डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. काल रात्री साडे अकरा वाजता हा अपघात झाला. पहाटे सहा वाजता आष्टी फाटा इथं खाजगी प्रवासी बस उलटल्यानं सहा जणांचा मृत्यू झाला. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.
****
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांचं आज पहाटे नेरूळ इथल्या राहत्या घरी वृध्दापकाळानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. उद्या दुपारी चार वाजता नेरुळ इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थीव देहावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तर आज दुपारी नेरुळ इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. बाबमहाराज सातारकर याचं पूर्ण नाव नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे सातरकर असं होतं. त्यांनी वकिलीचं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं होतं. समाजप्रबोधनासोबतच बाबामहाराजांनी सुमारे पंधरा लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दिक्षा देत व्यसनमुक्त केलं. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
****
कोजागिरी पोर्णिमेनिमित्त सोलापूर जिल्ह्यात तुळजापुर ते सोलापूर आणि तुळजापूर ते बार्शी या वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. सोलापूरहून तुळजापूरकडे जाण्यासाठी बोरामणी, इटकळ, मंगरूळपाटी आणि तुळजापूर ते बार्शीकडे येण्यासाठी तुळजापूर, धाराशिव, वैराग हा पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजेपासून ते २९ ऑक्टोबर रात्री बारा वाजेपर्यंत हा बदल लागू राहणार आहे. सोलापूर पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या सर्व महसुली मंडळांमध्ये पीक विमा कंपनांन्या २५ टक्के अग्रीम त्वरीत वितरीत करण्याचे आदेश कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा राज्यस्तरीय कृषी विमा सल्लागार समितीचे प्रमुख अनुप कुमार यांनी काल दिले. बीड जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व ८६ मंडळांमध्ये २५ टक्के अग्रीम पीकविमा वितरित करण्याची अधिसूचना भारतीय कृषी विमा कंपनीस जारी केला होत्या कंपनीने याला हरकत घेतली होती, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुरावा नंतर राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीनं हे अग्रीम त्वरीत वितरण करण्याचे निर्देश भारतीय कृषी विमा कंपनीला दिले आहेत.
****
आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजात राजकारण केलं जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल केंद्र सरकारवर टीका करताना केला. धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त काल अकोला इथं आयोजित सभेत ते बोलत होते. जाती धर्माच्या राजकारणावर विश्वास न ठेवता येणाऱ्या काळात जागृत राहण्याचं आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केलं.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं १६ सुवर्ण, २० रौप्य आणि ३१ कांस्य पदकांसह एकूण ६७ पदकं जिंकली आहेत. पुरुषांच्या गोळाफेकमध्ये सचिननं नवा विक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावलं. नारायण ठाकुरनं पुरुषांच्या शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्य पदक जिंकलं आहे.
****
No comments:
Post a Comment