Saturday, 28 October 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 28.10.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 28 October 2023

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २८ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे ५१ हजाराहून अधिक नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करणार आहेत. देशभरात ३७ ठिकाणी हा रोजगार मेळावा होत आहे. देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी  सरकारची विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा एकशे सहावा भाग असेल.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्यापासून गावागावांमध्ये सरसकट आमरण उपोषण सुरु करण्यात येणार असल्याचं, आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. ते आज जालना जिल्ह्यातल्या आंतरवाटी सराटी इथं उपोषणस्थळी वार्ताहरांशी बोलत होते. मराठा बांधवांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं, आपल्या गावात कोणत्याही नेत्याला येऊ देऊ नका, आत्महत्या करु नका, आंदोलन उग्र होऊ देऊ नका, असं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्यावं, असं सांगून जरांगे यांनी, विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. राज्य सरकारला आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्यावं लागेल, असं ते म्हणाले. 

****

धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनीही मराठा आरक्षणासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिलं आहे. सरकारने अद्याप यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केली नसून, मराठा समाजामध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालं असल्याचं आमदार पाटील यांनी म्हटलं आहे.

****

राज्य शासनाचा पशुवैद्यक विभाग, राज्य पशुवैद्यक परिषद आणि ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान मराठवाडा यांच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर इथं तांत्रिक परिसंवाद पार पडला. परभणी इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे औषधशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुधीर राजुरकर यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. आयुर्वेदामुळे मानव, प्राणी आणि वनस्पती वर देखील उपचार करता येतात, असं मत त्यांनी व्यक्त केलं. या परिसंवादात लंपी रोग निर्मूलन आणि दुग्ध उत्पादन या विषयावर तज्ञांनी आपले विचार मांडले. यावेळी पशू संवर्धन शास्त्र विषयामध्ये विशेष श्रेणीत गुण मिळवणाऱ्या सात विद्यार्थ्यांना सुर्वण पदक देऊन गौरवण्यात आलं.

****

राज्यात डिजिटल पायाभूत सुविधांचं जाळं अधिक बळकट करण्याच्या हेतूनं प्रत्येक जिल्ह्यात किमान एक बहुउद्देशिय संगणकीय तंत्रज्ञात केंद्र स्थापन करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं  घेतला आहे. या संगणकीय केंद्रात प्रत्येकी किमान ५० ते कमाल दिडशे संगणकांची सुविधा उपलब्ध असणार आहे. या केंद्रांसाठी सुमारे ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

****

धाराशिव इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित जागेचा प्रश्न सुटल्याचं तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल सांगितलं. यासाठी शासकीय आयटीआय आणि जलसंपदा विभागाची जागा देण्याबबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला होता त्यानंतर काल दोन्ही विभागाच्या संमतीनंतर शासन आदेश निर्गमित झाल्याचं ते म्हणाले.

****

सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातल्या चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीत बंद पडलेल्या कारखान्यामध्ये नाशिक पोलिसांनी कारवाई करत कोट्यावधी रुपयाचे एमडी ड्रग्स जप्त केले. यापूर्वी सोलापूर मधल्या बाळे परिसरात १६ कोटी रुपयांचे आठ किलो, तर देवडी पाटीजवळ सहा कोटी रुपयांचे तीन किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत.

****

चीन मध्ये सुरु असलेल्या पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंतची ऐतिहासिक कामगिरी करत शंभर पदकांचा टप्पा पार केला आहे. आज पुरुषांच्या चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत दिलीप गावीत यांनी, भालाफेकमध्ये नीरज यादवनं सुवर्ण पदक पटकावलं. बुद्धिबळ वैयक्तिक प्रकारात दर्पण इराणीनं सुवर्ण, सौंदर्य प्रधाननं रौप्य, तर अश्विन मकवानानं कांस्य पदक जिंकलं. तर या तिघांच्या संघानं बुद्धिबळ सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. जलतरणाच्या बटरफ्लाय प्रकारात सुयश जाधवने कांस्य पदक जिकलं. जलतरण स्पर्धेतलं हे भारताचं पहिलंच पदक आहे. रोईंग मध्ये नारायणा आणि अनिता यांनी रौप्य पदक, तर भालाफेकमध्ये तेट चंदने, पंधराशे मीटर धावण्याच्या शर्यतीत पूजाने कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत २९ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ५१ कांस्य पदकांसह एकूण १११ पदकांची कमाई केली आहे.

****

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज धर्मशाला इथं ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामना सुरु आहे. न्युझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या स्पर्धेत आज दुसरा सामना कोलकाता इथं बांग्लादेश आणि नेदरलँड्स दरम्यान होणार आहे. दुपारी दोन वाजता हा सामना सुरु होईल.

****

No comments: