Monday, 30 October 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.10.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 October 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या प्राथमिक अहवालानुसार संबंधितांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन तर सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील कायम

·      मराठा आरक्षण आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिंसक वळण;आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराची जाळपोळ

·      गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा देत, आमदारकीचा राजीनामा

आणि

·      एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचं अफगाणिस्तानसमोर २४ धावांचं लक्ष्य

****

न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या प्राथमिक अहवालानुसार संबंधितांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मुंबईत झाली. त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते. शिंदे समितीनं मराठवाड्यात आतापर्यंत एक कोटी ७३ लाखांहून अधिक कागदपत्रांची तपासणी केली. काही कागदपत्रं हैद्राबादच्या अभिलेखागारातून मिळवायची आहेत; त्या करता समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ दिली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मात्र समितीचा प्राथमिक अहवाल राज्य शासनाला प्राप्त झाला असून, हा अहवाल उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकृत केला जाईल, त्यानंतर लगेच संबंधितांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश तहसीलदारांना दिले जातील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि क्युरेटिव्ह याचिकेवर सल्ला देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले, एम जी गायकवाड आणि संदीप शिंदे यांची सल्लागार समिती सरकारनं नियुक्त केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठा आरक्षण फेटाळताना सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणांचा राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे अभ्यास करतील. त्याचप्रमाणे मराठा समाजाचं मागासलेपण निश्चित करण्यासाठी टाटा समाज विज्ञान संस्था आणि गोखले अर्थशास्त्र संस्था यासारख्या संस्थांच्या माध्यमातून नव्यानं सर्वेक्षण करुन इम्पेरिकल डेटा तयार करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावं, आणि शासनावर विश्वास ठेवावा, राज्यात कायदा सुव्यवस्था कायम राखत शांतता राखण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं -

आज या आंदोलनाला कुठेही गालबोट लागता कामा नये, याची काळजी देखील मराठा समाजानं घेतली पाहिजे की या मराठा समाजाच्या आडून कोणी अशा प्रकारच्या ज्या घटना होतायत, त्या घडवू इच्छितंय का याचं देखील मराठा समाजाने विचार केला पाहिजे. आणि राज्यातील जनतेला देखील मी शांततेचं आवाहन करतो.

****

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात यावा, अशी मागणी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारला मराठा कुणबीचे अनेक पुरावे मिळाले आहेत, त्यामुळे आरक्षणासाठी नियुक्त समितीचे कामकाज बंद करावं, असं सांगतानाच, आमचं कोणतंही शिष्टमंडळ मुंबईत चर्चेसाठी जाणार नाही, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होणार असल्याचा इशाराही जरांगे यांनी दिला.

****

 

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज बीड जिल्ह्यात हिंसक वळण लागलं. कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आंदोलकांनी माजलगाव इथं आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करत, घर पेटवून देण्यात आलं. या घटनेत घराचं तसंच घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकी तसंच चारचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालं. सोळंके कुटुंबीय सुरक्षित असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सोळंके यांच्या शाळा तसंच महाविद्यालयांमध्येही तोडफोड करण्यात आली.

माजलगाव नगर पालिकेवर दगडफेक करून तिथेही आग लावण्यात आली. माजलगाव, बीड, आष्टी, वडवणी, परळीतील पंचायत समितीच्या कार्यालयांना कुलूप ठोकण्यात आलं आहे.

बीड शहरांतही विविध भागात दगडफेक करत रस्त्यांवर टायर जाळण्यात आले. बीड नगर पालिका कार्यालयासह दुकानांवर दगडफेक केल्यानं बाजारपेठ तातडीने बंद करण्यात आली आहे.

बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस भवनावर दगडफेक करून तिथेही आंदोलकांनी जाळपोळ केली. पोलिस दलानं घटनास्थळी दाखल होत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.

 

जालना जिल्ह्यात भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर, मंठा तालुक्यात ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर टायर जाळून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयांचं कामकाज बंद पाडून कार्यालयांना टाळं ठोकण्यात आलं. जिल्ह्यातील बससेवा आज पहाटेपासून बंद ठेवण्यात आली असून, जिल्ह्यात आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

****

गेवराई इथले भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत, आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवल्याचं, पवार यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनात राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचं सांगत, खासदार सय्यद इम्तियाज यांनी आंदोलकांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलं.

****

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनावर भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन तातडीनं बोलवण्याची मागणी केली. अशा मागणीचं निवेदन राज्यपालांना सादर करण्यात आलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

यवतमाळ इथं आज 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील ८८१ कोटी रुपये खर्चाच्या पाच विकास कामांचं लोकार्पण तसंच ३२ विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी विविध योजनांच्या लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरुपात लाभांचं वितरण करण्यात आलं.

****

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेनं अफगाणिस्तानसमोर २४१ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. आज पुण्यात सुरू असलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघानं नाणेफेक जिंकून श्रीलंकेला फलंदाजीसाठी पाचारण केलं. श्रीलंकेनं पन्नासाव्या षटकांत सर्वबाद २४ धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानकडून फजल हक फारुखीने सर्वाधिक चार बळी घेतले.

****

लातूर इथं उद्या ३१ तारखेला आयोजित करण्यात आलेलं 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी' हे अभियान काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलं आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी ही माहिती दिली.

****

 

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त उद्या ३१ ऑक्टोबर रोजी देशभरात "राष्ट्रीय एकता दिवस" साजरा करण्यात येणार आहे. या निमित्तानं उद्या सर्वत्र राष्ट्रीय एकता दौड चं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड इथे सकाळी साडे सात वाजता महात्मा गांधी पुतळा ते जुना मोंढा टॉवर इथल्या सरदार वल्लभभाई पटेल पुतळा या मार्गावर राष्ट्रीय एकता दौड आयोजित करण्यात आली आहे, या दौडमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या एकूण १७१ जलप्रकल्पांमध्ये सध्या सुमारे ३२ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. संभाव्य पाणी टंचाईची लक्षात घेता सर्व प्रकल्पातील पाणी फक्त पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलं आहे. नागरिकांनी अतिशय काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असं आवाहन लातूर पाटबंधारे विभागानं केलं आहे.

****

पूर्व मध्य रेल्वेच्या कांताकापल्ले - अलमंदा विभागात झालेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये आज नांदेड इथून सुटणारी नांदेड संबलपूर एक्सप्रेस तसंच सिकंदराबाद इथून सुटणारी सिकंदराबाद - मनमाड अजंता एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या मनमाड इथून सुटणारी मनमाड सिकंदराबाद अजंता एक्सप्रेसही धावणार नाही.

****

धुळे तालुक्यातील बोरकुंड मोघण शेत शिवारामध्ये धुडघूस घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वन विभागानं ४ दिवसांच्या प्रयत्नांनंतर आज पहाटे बंदिस्त केलं. या बिबट्याने आतापर्यंत तीन बालकांचा बळी घेतला आहे. बिबट्यानं उचलून नेल्यानं गंभीर जखमी झालेल्या १० वर्षीय रमेश नानसिंग डुढवे याचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

****

No comments: