आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० ऑक्टोबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी स्थापन समितीच्या कामकाजाची माहिती या बैठकीत दिली जाणार आहे.
****
मेरी माटी मेरा देश या अभियानाच्या सांगता समारंभात सहभागी होण्यासाठी ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले प्रतिनिधी दिल्लीत दाखल होत आहे. कर्तव्य पथ इथं दोन दिवसांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रेल्वे, बस आणि स्थानिक वाहनांद्वारे हे अमृत कलश प्रतिनिधी प्रवास करत असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं दिली आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.
****
केरळमध्ये झालेल्या साखळी बॉंम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. कोचीमध्ये कालामासेरी इथल्या संमेलन केंद्रात झालेल्या प्रार्थना सभेदरम्यान काल सकाळी हे स्फोट झाले. यात दोन महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला असून, ४५ जण जखमी झाले आहेत.
****
आंध्र प्रदेशात विजयनगर जिल्ह्यात कंटकपल्ली इथं काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला, तर ५० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. विशाखापट्टणम-पालसा ही पॅसेंजर रेल्वे विशाखापट्टणम-रायगड पॅसेंजर रेल्वेला मागून धडकल्यानं तीन डबे घसरुन हा अपघात झाला.
****
विशेष गरजा असलेल्या मुलांना सन्मानानं जगता यावं यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचं, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीतल्या हिगाशी ऑटीझम या शाळेच्या उद्घाटनानंतर बोलत होते. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी अर्थपूर्ण आणि सुरक्षित जग निर्माण करण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी केलं.
****
गोव्यात सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने आतापर्यंत ४६ सुवर्ण, २९ रौप्य, ३१ कांस्य अशा एकूण १०६ पदकांची कमाई करत पदक तालिकेत पहिला क्रमांक मिळवला आहे. सिल्याट क्रीडा प्रकारात भक्ती किल्लेदारने सुवर्ण, तर अनुज सरनाईक आणि ओमकार अभंग यांनी रौप्य पदकं पटकावली. भारोत्तोलनात ८७ किलो वजनी गटात योगिता खेडकरने कांस्य पदक पटकावलं.
****
No comments:
Post a Comment