Saturday, 28 October 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.10.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 October 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      शासकीय सेवेत नव्यानं रुजू ५१ हजारांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रं प्रदान

·      मराठा आरक्षणासाठी ३१ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा तिसरा टप्पा-मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

·      छत्रपती संभाजीनगर इथं पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणारी अल्पवयीन मुलांची टोळी पोलिसांच्या ताब्यात

आणि

·      पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताची आतापर्यंत २९ सुवर्णांसह १११ पदकांची कमाई

****

देशभरात आयोजित होणारे रोजगार मेळावे हे सरकारच्या युवकांसाठीच्या वचनबद्धतेचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे शासकीय सेवेत नव्यानं भरती झालेल्या ५१ हजारांहून अधिक उमेदवारांना आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रं प्रदान केल्यानंतर ते बोलत होते. केंद्र तसंच राज्य सरकारच्या विविध विभागांसाठी ही भरती करण्यात आली. देशभरात ३७ ठिकाणी आज हे रोजगार मेळावे घेण्यात आले. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे आणि नागपूर इथं झालेल्या ४९२ नव्या नियुक्तींना आज नियुक्ती पत्रं देण्यात आली.

 

 

नांदेड इथं आज झालेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते ५५ युवकांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. यात 17 मुलींचा समावेश आहे. शासकीय नोकरी ही लोकसेवेची संधी असल्याचं समजून काम करण्याचं आवाहन डॉ. कराड यांनी यावेळी केलं.

****

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं २०२३-२४ साठी प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचा पहिला अंदाज, प्रसिद्धपत्रकाद्वारे जारी केला. त्यानुसार देशातलं अन्नधान्याचं उत्पादन एक हजार ४८५ लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. ऊस उत्पादन ४ हजार ३४७ लाख मेट्रिक टन होईल, असा अंदाजही या पत्रकात वर्तवला आहे.

****

"देशातील कृषी संशोधन संस्थांनी उच्च दर्जाची दोन कोटी लिंबूवर्गीय रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावीत" असं आवाहन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपूर इथं तीन दिवसीय आशियायी सायट्रस काँग्रेसचं उद्घाटन आज झालं, त्यावेळी गडकरी बोलत होते. देशातील शेतकऱ्यांना लिंबूवर्गीय फळांच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी अचूक धोरण, योग्य मार्गदर्शन आणि योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली. या परिषदेमधून नवीन तंत्रज्ञान, धोरणे आणि मतप्रवाह समोर येतील तसंच लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनात आणि विकासात महत्त्वाच्या अशा घडामोडी घडतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या परिषदेला १५ पेक्षा जास्त देशातून ३०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत.

****

आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी घ्यायच्या सुनावणीचं सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी आज राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्याशी चर्चा केली. या बाबत अध्यक्ष नार्वेकर देशाचे महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांचीही भेट घेणार आहेत. यामध्ये वेळापत्रकात नेमके काय बदल करायचे? यावर कायदेशीर सल्ला घेतला जाणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत हे वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना न्यायालयानं दिल्या आहेत.

****

मराठा समाजास मराठा -कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत गठित समितीने आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या माहितीचा आढावा घेतला. बीड इथं २२ लाखाहून अधिक अभिलेखे तपासण्यात आले यात कुणबी - मराठा अशा ३ हजार ९९३ नोंदी आढळल्याचं समितीला सांगण्यात आलं. समितीने घालून दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात १२ विभागांच्या ४७ प्रकारच्या अभिलेखांमधून मराठा-कुणबी नोंद तपासण्याचे काम होत आहे. सर्वात जुना अभिलेख ११३ वर्षे जुना १९१० सालचा शिक्षण विभागाचा अभिलेख असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इंथ मराठा आरक्षणासाठी दुसऱ्या टप्प्यात आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. दरम्यान, जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत गावागावांमध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणांचे उद्यापासून आमरण उपोषणात रुपांतर होणार असल्याचं सांगितलं. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन येत्या ३१ ऑक्टोबरपासून सुरू होईल असं ते म्हणाले. आंदोलन करताना तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. दरम्यान, अंबड तालुक्यातल्या रोहिलागड इथल्या काही तरुणांनी आज सकाळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं. कोल्हापूर इथं उद्यापासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

****

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात काल रात्री नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञातांनी एसटी महामंडळाची बस पेटवून दिली. गोजेगाव नजीकच्या पैनगंगा नदीच्या पुलावर एकानं दुचाकीवरून येत ही बस थांबवली, त्याच वेळी मागून आलेल्या पाच ते सहा युवकांनी बसच्या चालक वाहकासह प्रवाशांना खाली उतरवत बसवर पेट्रोल टाकून बस पेटवून दिली. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

****

माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्या पार्थिव देहावर अहमदनगर जिल्ह्यात पागोरी पिंपळगाव या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, यांच्यासह अनेकांनी ढाकणे यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह पाच अल्पवयीन मुलांची टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या टोळीकडून पाचशे रुपये दर्शनी मूल्याच्या १९ बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. एक अज्ञात इसम या मुलांकडून या बनावट नोटा सुटे आणण्याच्या बहाण्याने चलनात आणत असल्याचं, पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आलं आहे.

****

पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज चार सुवर्ण, दोन रौप्य आणि सहा कांस्यपदकांसह एकूण बारा पदकं जिंकली. भालाफेकमध्ये नीरज यादव, चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत दिलीप गावीत, तर बुद्धिबळ स्पर्धेत दर्पण इराणी याने सुवर्णपदक पटकावलं. बुद्धिबळ स्पर्धेत सौंदर्य प्रधान याने रौप्य तर अश्विन मकवाना याने कांस्य, नौकायन स्पर्धेत नारायण आणि अनिता जोडीने रौप्य, महिलांच्या पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत पूजा हिने कांस्य तर भालाफेक मध्ये टेकचंद याने कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत २९ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ५१ कांस्य पदकांसह आतापर्यंत एकूण १११ पदकं पटकावली आहेत. पदकतालिकेत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.

****

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोलकता इथं सुरू असलेल्या सामन्यात नेदरलँडनं बांगलादेशला विजयासाठी २३० धावांचं लक्ष्य दिलं आहे. नाणेफेक जिंकून नेदरलँडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत निर्धारीत पन्नास षटकांत सर्वबाद २२९ धावा केल्या.

धर्मशाला इथं सुरू असलेल्या अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडसमोर ३८९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या ४६ व्या षटकांत सात बाद ३३९ धावा झाल्या होत्या.

****

 

 

नमो तीर्थस्थळ सुधार अभियानांतर्गत महाराष्ट्रातल्या ७३ तीर्थस्थळांचा कायापालट करण्यात येणार आहे, यामध्ये बीड इथल्या प्रसिद्ध खंडेश्वरी मंदिर, अंबाजोगाई इथलं मुकुंदराज समाधी मंदिर, खोलेश्वर मंदिर तसंच मरळ सिद्धेश्वर बारव या चार तीर्थस्थळांचा समावेश आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानी पोटी विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम पुढील आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील ४० महसुल मंडळात पिकांच्या नुकसानीची टक्केवारी पाहता हेक्टरी ५ ते ६ हजार रुपये मिळणं अभिप्रेत असल्याचं, याबाबच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्य शासनाचा पशुवैद्यक विभाग, राज्य पशुवैद्यक परिषद आणि मराठवाडा ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान यांच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर इथं तांत्रिक परिसंवाद घेण्यात आला. परभणी इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे औषधशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुधीर राजूरकर यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. या परिसंवादात लंपी रोग निर्मूलन आणि दुग्ध उत्पादन या विषयावर तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. पशू संवर्धन शास्त्र विषयामध्ये विशेष श्रेणीत गुण मिळवणाऱ्या सात विद्यार्थ्यांना या परिषदेत सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आलं.

****

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा सोलापूर इथला केंद्रीय संचार ब्युरो आणि धाराशिव जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर तालुक्यात तामलवाडी इथं तीन दिवसीय डिजिटल मल्टिमिडीया प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्‌घाटन करण्यात आलं.

****

No comments: