Tuesday, 31 October 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.10.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 31 October 2023

Time: 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या प्राथमिक अहवालानुसार संबंधितांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन तर सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील कायम

·      मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण;बीड तसंच धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू

·      शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

आणि

·      एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचा श्रीलंकेवर सात गडी राखून विजय

सविस्तर बातम्या

न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या प्राथमिक अहवालानुसार संबंधितांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक काल मुंबईत झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीचा प्राथमिक अहवाल राज्य शासनाला प्राप्त झाला असून, तो आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकृत केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर यवतमाळ इथं बोलताना मुख्यमंत्र्यांनी, ११ हजार ५३० जणांना कुणबी दाखले दिले जातील, याबाबतच्या सूचना संबंधित तहसीलदारांना दिल्याचं सांगितलं.

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि क्युरेटिव्ह याचिकेवर सल्ला देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले, एम जी गायकवाड आणि संदीप शिंदे यांची सल्लागार समिती सरकारनं नियुक्त केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावं, आणि शासनावर विश्वास ठेवावा, राज्यात कायदा सुव्यवस्था कायम राखत शांतता राखण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

****

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात यावा, अशी मागणी, आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते. सरकारला मराठा कुणबीचे अनेक पुरावे मिळाले आहेत, त्यामुळे आरक्षणासाठी नियुक्त समितीचं कामकाज बंद करावं, असं सांगतानाच, आमचं कोणतंही शिष्टमंडळ मुंबईत चर्चेसाठी जाणार नाही, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं. आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिंसक वळण लागलं. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे यांनी जिल्ह्यात संचारबदी लागू केली आहे. पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू राहील, असं यासंदर्भातल्या आदेशात म्हटलं आहे.

आंदोलकांनी काल बीड जिल्ह्यात काही लोकप्रतिनिधींची घरं तसंच पक्षाच्या कार्यालयांवर आणि शासकीय कार्यालयांवरही दगडफेक करून जाळपोळ केली. दुकानांवर दगडफेक झाल्यानं,  बाजारपेठा बंद कराव्या लागल्या. या आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या ५० नळकांड्या फोडाव्या लागल्या. बीड शहरात राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तसंच दंगल नियंत्रण पथकाच्या १० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर टायर जाळून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयांचं कामकाज बंद पाडून टाळं ठोकण्यात आलं.

हिंगोली इथलं भाजपचं जिल्हा कार्यालय काही अज्ञात आंदोलकांनी जाळण्याचा प्रयत्न केला. होमगार्ड आणि इतर पोलिसांनी ही आग विझवली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर इथं आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयातही काल आंदोलकांनी तोडफोड केली.

नांदेड जिल्ह्यातही रस्त्यांवर टायर जाळून आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. दरम्यान आज नांदेडमध्ये रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

धाराशिव जिल्ह्यातही आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी कलम १४४ अनुसार संचारबंदी लागू केली आहे. शासकीय कार्यालयं तसंच अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आलं आहे.

****

गेवराई इथले भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत, आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवल्याचं, त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही आपल्या खासदारकीचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला आहे.

****

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनात राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचं सांगत, खासदार सय्यद इम्तियाज यांनी आंदोलकांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलं.

****

आरक्षण, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्था इत्यादी गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, विधिमंडळाचं विशेष अधिवेशन तातडीनं बोलवावं, अशी मागणी, महाविकास आघाडीनं राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे. याबाबत आघाडीच्या शिष्टमंडळानं काल राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिलं. 

****

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी ३१ डिसेंबरपूर्वी विधानसभा अध्यक्षांनी पूर्ण करावी, असे आदेश, सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात सुनावणी होऊ शकणार नाही, त्यामुळे अतिरीक्त वेळ देण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांच्या वतीनं महान्याय अभिकर्ता तुषार मेहता यांनी केली. मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ही मागणी फेटाळून लावली.

****

मेरी माटी-मेरा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रेचा सांगता समारंभ आज नवी दिल्लीत कर्तव्य पथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवाचाही आज समारोप होत आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारकाचं उद्घाटन होणार आहे.

****

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल पुण्यात झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत श्रीलंका संघ ४९व्या षटकात २४१ धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानच्या संघानं हे लक्ष्य ४५व्या षटकात तीन गडी गमावत पूर्ण केलं. आज या स्पर्धेत कोलकाता इथं पाकिस्तान आणि बांग्लादेश दरम्यान सामना होणार आहे.

****

गोव्यात सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस शिरसे यानं काल पुरुषांची ११० मीटर अडथळ्यांची शर्यत १३ पूर्णांक आठ दशांश सेकंदात पूर्ण करून नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. पुरुषांच्या आधुनिक पेंटाथलॉन स्पर्धेत मयंक चाफेकरनं सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत आतापर्यंत ४७ सुवर्ण, ३४ रौप्य, ३३ कांस्य अशा एकूण ११४ पदकांची कमाई करत पदक तालिकेत हाराष्ट्राचा संघ अव्वल स्थानी कायम आहे.

****

चंद्रपूर जिल्ह्यात विसापूर इथं राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धांना कालपासून प्रारंभ झाला. राज्याचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. तीन दिवसीय चालणाऱ्या या स्पर्धेसाठी राज्यभरातून दीड हजारावर खेळाडू दाखल झाले आहेत.

****

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त देशभरात एकता दौड आणि एकतेची शपथ घेण्याचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

नांदेड तसंच परभणी इथं राष्ट्रीय एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड इथं सकाळी साडे सात वाजता महात्मा गांधी पुतळा ते जुना मोंढा टॉवर इथल्या सरदार वल्लभभाई पटेल पुतळा या मार्गावर दौड होणार असून, परभणी इथं प्रियदर्शिनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल ते राजगोपालचारी उद्यानादरम्यान दौड होत आहे.

****

लातूर इथं आज आयोजित करण्यात आलेलं दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलं आहे. परभणी इथं उद्या बुधवारी हे अभियान आयोजित करण्यात आलं होतं, ते ही पुढे ढकलण्यात आलं आहे.

****

अहमदनगरहून छत्रपती संभाजीनगरकडे येणारी एक चारचाकी गाडी ओढ्यात कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. नेवासे इथं रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.

****

लातूर जिल्ह्यातल्या एकूण १७१ जल प्रकल्पांमध्ये सध्या सुमारे ३२ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. संभाव्य पाणी टंचाईची लक्षात घेता सर्व प्रकल्पातलं पाणी फक्त पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलं आहे..

****

No comments: