Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 31 October 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
अनेक संकटं येऊनही आज देशाची अखंडता अबाधित आहे, जगाची तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे देश आगेकुच करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधल्या एकता नगर इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी या पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. तुष्टीकरणाचं राजकारण हा देशाच्या विकासातला सर्वात मोठा अडथळा असल्याचं त्यांनी नमूद केलं. तत्पूर्वी पंतप्रधानांनी राष्ट्रीय एकता दिवस संचलनाला सलामी दिली, तसंच उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद मैदानावर रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवला. नांदेड तसंच परभणी इथंही राष्ट्रीय एकता दौड काढण्यात आली.
****
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशात इंदिरा गांधी यांचं स्मरण केलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत शक्ति स्थळ या इंदिरा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.
****
मेरी माटी-मेरा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रेचा सांगता समारंभ आज नवी दिल्लीत कर्तव्य पथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवाचाही आज समारोप होत आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारकाचं उद्घाटन होणार आहे.
देशातल्या युवकांसाठी, युवाशक्तीची एकजूट घडवण्यासाठी 'माझा युवा भारत'या संघटनेची सुरुवात देखील आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते आज वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणासाठी राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली. आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावं, असं आवाहन जरांगे यांनी केलं.
दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात ठिठिकाणी आजही आंदोलनं सुरु आहेत.
बीड जिल्ह्यात माजलगावसह इतर ठिकाणच्या जाळपोळ प्रकरणी सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४० जणांना ताब्यात घेतले आहेत. सोशल मीडियावर आफवा नियंत्रणासाठी जिल्ह्यातली इंटरनेट सेवा उद्यापर्यंत बंद करण्यात आली असल्याची माहिती, जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी दिली. जिल्ह्यात २८ पोलिस स्थानक अंतर्गत विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त केले आहेत. संचारबंदी काळात किरकोळ गुन्ह्यांवर थेट कारवाई करुन ते जिल्हा दंडाधिकार्यांना अहवाल सादर करतील. त्याचप्रमाणे जिल्ह्यात पोलिस अधिकार्यांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर डोंगरकडा फाटा इथं, तर छत्रपती संभाजीनगर- जळगाव राष्ट्रीय महामार्गावर गणोरी फाटा इथं देखील रास्ता रोको आंदोलन सुरू आहे.
धाराशिव रेल्वे स्थानकावर देखील आंदोलकांनी काही काळ रेल रोको आंदोलन केलं. तुळजापूर तालुक्यातल्या मौजे इटकळ आणि बाभळगाव इथं राष्ट्रीय महामार्गांवर तीव्र आंदोलन सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा म्हणून राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं, त्यांनी सांगितलं…
Byte…
मराठा समाजाच्या ज्या तीव्र भावना आहेत, त्या भावना विचारात घेऊन मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी माझा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला ज्यांनी ज्यांनी निवडून आणलंय त्या सगळ्या समाजातल्या दोन- तीन प्रतिनिधींना मी बोलावून घेतलं, त्यांना समन्वय साधून राजीनामा देण्याचा मी निर्णय घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी प्रकल्पामध्ये ६५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असल्यानं या प्रकल्पात नाशिक आणि नगर जिल्ह्यातून आज पाणी सोडलं जाणार आहे. या संदर्भातला आदेश नाशिकचे अधीक्षक अभियंता आणि लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या प्रशासकांनी दिले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा, प्रवरा, नाशिक जिल्ह्यातल्या दारणा आणि गंगापूर समूहातून समन्यायी पाणी वाटप धोरणातून साडे आठ हजार दशलक्ष घनमीटर पाणी सोडलं जाणार आहे.
****
लातूर शहरातली अतिक्रमणं काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून, अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण केलं जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिली आहे. आगामी एक ते दीड महिन्यात सर्वेक्षण पूर्ण करुन, पोलीस संरक्षणात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
एक जानेवारी २०२४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असं आवाहन परभणीचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी केलं आहे..
****
No comments:
Post a Comment