Saturday, 28 October 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 28.10.2023 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी एक वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे ५१ हजाराहून अधिक नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करणार आहेत. देशभरात ३७ ठिकाणी हा रोजगार मेळावा होणार आहे. हे नवीन कर्मचारी सरकारची विविध मंत्रालयं, विभागांमध्ये रुजू होतील.

****

गेल्या काही वर्षात जगात भारताचं महत्व वाढलं असल्याचं, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी म्हटलं आहे. पुण्यात काल सिंबायोसिस संस्थेच्या वतीनं आयोजित फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. जगात मुत्सुद्देगिरी आणि परराष्ट्र धोरण महत्त्वाचं असून, यात संरक्षण विभाग म्हणून आम्हीही नेहमी भूमिका बजावण्यासाठी कायम सज्ज असतो, असं ते म्हणाले.

****

देशातला पहिला मोठा डायमंड हब हा नवी मुंबईमध्ये तयार होत आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल यवतमाळ इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात परदेशातून होणाऱ्या गुंतवणुकीत महाराष्ट्र हा प्रथम क्रमांकावर आहे, हे स्थान कायम राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्राचा उत्कृष्ट ग्रामीण पर्यटन पुरस्कार मिळालेल्या मधाचं गाव पाटगावचा लोकार्पण सोहळा काल पार पडला. पाटगाव हनी ब्रँड जगभरात पोहोचवणार असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं. या व्यवसायात तरुण पिढीनं सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गणेश कुबरे या तरुणाच्या कुटुंबियांना जिल्हा प्रशासनानं दहा लाख रुपयांचा मदत निधी दिला. मराठा बांधवानी काल घाटी रुग्णालयाबाहेर नऊ तास ठिय्या आंदोलन केलं, त्यानंतर अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी कुबरे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आणि धनादेश सुपुर्द केला.

****

पॅरा आशियाई क्रिडा स्पर्धेत भारतीय खेळाडुंनी शंभर पदकांचा टप्पा पार केला असून, आतापर्यंत २८ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ४९ कांस्य पदकांसह एकूण १०८ पदकं जिंकली आहेत. आज पुरुषांच्या चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत दिलीप गावीत यांनी, तर भालाफेकमध्ये नीरज यादवनं सुवर्णपदक जिंकलं.

****

No comments: