Thursday, 26 October 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.10.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 October 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      गोर गरिबांच्या सामाजिक न्याय तसंच आरोग्य, घर निर्माणावर सरकारचा भर - पंतप्रधान नरेंद्र मोदी

·      पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण

·      मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलनं

आणि

·      ज्येष्ठ किर्तनकार बाबामहाराज साताराकर यांचं निधन

****

सरकार गोर गरिबांच्या सामाजिक न्याय तसंच आरोग्य, घर निर्माणावर अधिक भर देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं एका जाहीर सभेत मार्गदर्शन केलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या छोट्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले -

महाराष्ट्र के छोटे किसानों के बँक खातों में भी छब्बीस हजार करोड रूपये ट्रान्सफर हुये है। मुझे इस बात की खुशी है, की महाराष्ट्र सरकार ने नमो शेतकरी महासम्मान योजना शुरू की है। इसके तहत महाराष्ट्र के शेतकरी परिवारों को छह हजार रूपये और अतिरिक्त दिये जायेंगे।

वाहून जाणारं पाणी मराठवाडा, विदर्भाकडे वळवावं, यासाठीचा मोठा खर्च राज्याच्या आवाक्या बाहेरचा आहे. याकरता केंद्र सरकारनं मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. मराठवाडा, विदर्भ तसंच उत्तर महाराष्ट्रात पडणारा दुष्काळ दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून अतिरिक्त निधी मिळावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणांमध्ये राज्यातल्या विकास प्रकल्पांची माहिती दिली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डी इथं साडे सात हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांच्या कार्याचं उद्‌घाटन, लोकार्पण केलं. अहमदनगरमधल्या अत्याधुनिक माता आणि शिशू रुग्णालयाचं तसंच आयुष रुग्णालयाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यावेळी झालं. कुर्डूवाडी- लातूर रोड रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचं लोकार्पण तसंच जळगाव ते भुसावळच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचं विद्युतीकरणासह लोकार्पण यावेळी करण्यात आलं. इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लिमीटेडच्या मनमाड टर्मीऩलवर अतिरिक्त सुविधा या प्रकल्पाचं उद्‌घाटनही यावेळी मोदींच्या हस्ते करण्यात आलं. साई बाबा मंदिरातला दर्शन रांग प्रकल्प, मराठवाडा, विदर्भाला कोपरगांवशी जोडणारा महामार्ग प्रकल्प याचं लोकार्पणही पंतप्रधानांनी आज केलं केलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलकांनी आंदोलन केलं. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात पेंडगाव आणि पंचक्रोशीतल्या कार्यकर्त्यांनी आजपासून साखळी उपोषण सुरू केलं. गेवराई तालुक्यात मादळमोही इथंही ग्रामपंचायत कार्यालयाच्या टॉवरवर चढत आंदोलन करण्यात आलं. सकल मराठा समाजाच्या धुळे शाखेतर्फे आज या मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील मौजे देवजना इथल्या एका तरुणानं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज आत्महत्या केली. धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या निपाणी इथल्या एका युवकानंही काल आत्महत्या केली.

****

हिरे उद्योगांसह अन्य मोठे उद्योग राज्यातून पळवून गुजरातला नेण्याचे उद्योग मागील दीड वर्षांपासून सातत्यानं सुरु असून इतर उद्योगही सुरतला घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. भारतीय जनता पक्षानं मुंबई आणि महाराष्ट्रातील उद्योग, महत्वाची कार्यालयं, संस्था, महाराष्ट्राबाहेर घेऊन जाण्याचा सपाटा लावलेला आहे, असं ते म्हणाले. जातनिहाय जनगणनेची भूमिका राज्यातल्या जनतेसमोर मांडण्यासाठी काँग्रेसतर्फे येत्या तीन जानेवारीपासून ओबीसी जनजागरण यात्रा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार डॉ. प्रकाश महानवर यांच्याकडे आज सोपवण्यात आला. कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांचा कार्यकाळ पाच नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. त्यामुळं कुलपती रमेश बैस यांनी सोलापूर इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्याकडे हा पदभार सोपवला. सहा नोव्हेंबरपासून पुढील सहा महिने अथवा नवीन कुलगुरूंची निवड होईपर्यंत डॉ. महानवर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पदभार पाहतील.

****

औरंगाबाद महापालिकेनं मालमत्ता कर थकबाकीपोटी मिटमिटा इथल्या एका व्यावसायिक मालमत्तेला आज टाळं ठोकलं. या मालमत्ताधारकांनं महापालिकेचा साडे वीस लाख रुपयांहून अधिक कर थकवला आहे. महापालिकेतर्फे सर्व विभाग कार्यालयांत थकीत मालमत्ता कर आणि पाणी पट्टी वसुली मोहीम तीव्र स्वरूपात राबवण्यात येत असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.

****

वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं आज पहाटे नेरूळ इथल्या राहत्या घरी वृध्दापकाळानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. उद्या दुपारी चार वाजता नेरुळ इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थीव देहावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. ओघवती, रसाळ वाणी आणि मार्मिक शैलीनं घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे, भागवत धर्माचे वैश्विक राजदूत बाबा महाराज सातारकर यांचं निधन महाराष्ट्राच्या भागवत आणि भक्ती संप्रदायासाठी मोठी हानी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रबोधनाच्या चळवळीतून अज्ञान, अनीती, अंधश्रद्धेसारख्या कुप्रथांविरुद्ध त्यांनी लढा दिला अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबामहाराजांना श्रध्दांजली वाहिली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथं ओबीसी, एन टी, व्हीजेएनटी, भटक्या जाती, अलुतेदार, बलुतेदार समाजातील वेगवेगळ्या जाती संघटनानी आज उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी प्रवर्गात ईतर कुठल्याही जातीचा समावेश करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या जाचक अटी तसचं नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करावी, या मागण्यांसाठीही हे आंदोलन करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजी नगर इथं प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेमध्ये आज साहित्यिक विनीता तेलंग यांचं `राष्ट्रीय उभारणीत महिलांचं योगदान` या विषयावर व्याख्यान होणार आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या व्याख्यानानं तापडिया नाट्यमंदिरात सुरू या व्याख्यानमालेचं काल उद्‌घाटन झालं. या व्याख्यानमालेचा समारोप उद्या राज्याचे उच्च शिक्षण संचालक डा शैलेश देवळाणकर यांच्या व्याख्यानानं होणार असल्याचं संयोजकांनी कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कला विभागातर्फे छाऊ नृत्यनाट्य कला प्रकाराची कार्यशाळा आज सुरू झाली. पश्चिम बंगाल, बिहार, ओडीसा या राज्यात हा कलाप्रकार प्रसिद्ध आहे. चार नोव्हेंबर पर्यंत ही कार्यशाळा कला विभागात सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान चालेल, असं विभागप्रमुखांनी म्हटलं आहे.

****

तंबूद्वारे चित्रपट दाखवणाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असं भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष समीर दीक्षित यांनी म्हटलं आहे. या संदर्भातली बैठक काल छत्रपती संभाजी नगर इथं झाली, त्यावेळी ते बोलत होते. बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातले व्यावसायिक या बैठकीत सहभागी झाले. त्यांनी आपापल्या भागातून आणलेली माती यावेळी अमृत कलशामध्ये एकत्र करण्यात आली. हा कलश दिल्लीला मुख्य कार्यक्रमासाठी पाठवणार असल्याचं संयोजकांनी सांगितलं.

****

चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं १८ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३९ कांस्य पदकांसह एकूण ८१ पदकं जिंकली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या पॅरा-अॅथलीट्सच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं.

****

No comments: