Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 25 October 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २५ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी इथं आजपासून पुन्हा उपोषण सुरु केलं आहे. उपोषण सुरु करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याआधी दिलेली ४० दिवसांची मुदत संपली असून, सरकारनं आपल्या मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नसल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे देखील अद्याप मागे घेतले नसल्याचं त्यांनी सांगितलं. कायद्याच्या चौकटीत बसेल असं ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मराठा समाजाला देण्याची जरांगे यांनी मागणी केली. यावेळी औषध किंवा सलाईन सुद्धा घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मराठा बांधवांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावं, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी, आलेल्या नेत्यांना शांततेने परत परत पाठवावं, असंही त्यांनी समाज बांधवांना सांगितलं.
दरम्यान, या पत्रकार परिषदेदरम्यान ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी जरांगे यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत उपोषण न करण्याची विनंती केली होती. सरकार आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र जरांगे यांनी उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शिर्डी दौऱ्यावर येत असून, विविध विकास कामाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. मन की बात मध्ये उल्लेख केलेल्या निळवंडे धरणाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. साईबाबा मंदिराचं नवीन दर्शन रांग संकूल, अहमदनगर इथल्या महिला आणि बाल रुग्णालयाचं भूमिपूजन, शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचं भूमिपूजन तसंच शासनाच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर काकडी इथं ते नागरिकांना संबोधित करतील. तत्पूर्वी ते साईबाबा मंदीरात दर्शन घेणार आहेत.
त्यानंतर पंतप्रधान गोव्याच्या दौर्यावर जाणार असून, मडगाव इथं ३७व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. नऊ नोव्हेंबर पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २९ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. या मालिकेचा हा एकशे सहावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
बीड जिल्ह्याच्या बीड आणि शिरूर तालुक्यातल्या १२३ गावांमध्ये मातोश्री पाणंद रस्ता योजनेअंतर्गत विविध विकासकामांना राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता.
****
कोल्हापूरचा पहिला करवीर तारा पुरस्कार प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आणि लखनौच्या भातखंडे संगीत विद्यापीठाच्या माजी कुलगुरू, श्रुती सडोलीकर यांना काल प्रदान करण्यात आला. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सडोलीकर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कोल्हापूर इथं जन्मलेल्या आणि देश विदेशात कर्तृत्व गाजवलेल्या महिलांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात इसापूर धरण लाभधारकांनी विहित नमुन्यातले पाणी अर्ज ३१ ऑक्टोबरपर्यंत पाटबंधारे विभागाच्या संबंधित शाखा कार्यालयात जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सिंचनासाठी पाण्याची गरज तसंच प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेऊन पहिली पाणी पाळी पाच नोव्हेंबर रोजी सुरु करण्याचे अपेक्षित नियोजन केलं आहे. २५ नोव्हेंबरपर्यत हे आवर्तन सुरू राहणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत आज तिसर्या दिवशी भारतीय खेळाडुंनी आतापर्यंत दोन सुवर्ण, एक रौप्य, तर सहा कांस्य पदकांची कमाई केली.
सुमित अंतिल आणि हानी यांनी भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं, तर पुष्पेंद्र सिंह याने कांस्यपदक जिंकलं.
तिरंदाजीमध्ये पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात हरविंदर सिंह आणि साहिल यांनी रौप्य पदक जिंकलं.
महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत भाविना पटेलनं, तर मिश्र दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत प्रमोद भगत आणि मनिषा रामदास यांनी, पुरुषांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत नारायण ठाकुरनं, तर महिलांच्या थाळीफेक मध्ये शशी कसाना यांनी कांस्य पदक जिंकलं.
या स्पर्धेत भारताने आतापर्यंत ११ सुवर्ण, १३ रौप्य आणि १९ कांस्य पदकांसह एकूण ४३ पदकांची कमाई केली आहे.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स संघादरम्यान सामना होणार आहे. नवी दिल्लीतल्या अरुण जेटली क्रिकेट मैदानावर दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment