Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 27 October 2023
Time: 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ ऑक्टोबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· गरीबांना पुढे जाण्याची संधी मिळवून देणं हाच खरा सामाजिक न्याय-शिर्डी इथल्या कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन;राज्यशासनाच्या नमो शेतकरी योजनेला प्रारंभ
· राज्यशासनाच्या मेरी माटी मेरा देश अभियानाचा आज मुंबईत अमृत कलश पूजनाने समारोप
· ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर कालवश;आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आणि
· पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताची आतापर्यंत १८ सुवर्णांसह ८२ पदकांची कमाई
सविस्तर बातम्या
केंद्र आणि राज्य सरकार गरीबांना आणि शेतकऱ्यांना समर्पित असून, देश गरीबीपासून मुक्त करणं आणि गरीबांना पुढे जाण्याची संधी मिळवून देणं हाच खरा सामाजिक न्याय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं काल सुमारे साडे सात हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते.
नीळवंडे धरणाचं लोकार्पण,अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आयुष हॉस्पिटल, महिला आणि बाल रुग्णालयाचं भूमिपूजन, कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वेमार्गाचं विद्युतीकरण, जळगाव ते भुसावळ तिसरा आणि चौथा रेल्वेमार्ग, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या मनमाड टर्मिनलमधली अतिरिक्त सुविधा, साई बाबा मंदिरातला दर्शन रांग प्रकल्प, मराठवाडा तसंच विदर्भाला कोपरगांवशी जोडणारा महामार्ग प्रकल्प अशा विविध विकास प्रकल्पांचा यात समावेश आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रारंभही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधीच्या सहा हजार वार्षिक मदतीशिवाय राज्यातल्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम याद्वारे मिळणार आहे.
राज्यातले रखडलेले २६ सिंचन प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, पाणी हा ईश्वराचा प्रसाद आहे, थेंबभर पाणीही वाया घालू नका, असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं.
Byte…
मेरे सभी किसान भाई बहनों को मेरी एक प्रार्थना है, ये पाणी परमात्मा का प्रसाद है। एक बुंद भी पाणी बरबाद नही होना चाहिये। पर ड्रॉप मोअर क्रॉप। जितनी भी आधुनिक टेक्नॉलॉजी है, उसका हमे उपयोग करना चाहिये।
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत अहमदनगरमधल्या मातीचा प्रतिकात्मक कलश यावेळी पंतप्रधानांना देण्यात आला.
****
मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या अमृत कलशांचं आज मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर पूजन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सकाळी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानंतर संध्याकाळी विशेष रेल्वेने हे कलश दिल्लीसाठी रवाना होतील. परभणी जिल्ह्यातल्या सर्व गावांमधून मातीचं संकलन करण्यात आलेले कलश काल मुंबईला पाठवण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा काल दुसरा दिवस होता. जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होत विविध ठिकाणी सकल मराठा समाजानं साखळी उपोषण सुरु केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलकांनी आंदोलन केलं.
****
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात अनेक कार्यकर्त्यांनी कालपासून साखळी उपोषण सुरू केलं. गेवराई तालुक्यात मादळमोही इथंही ग्रामपंचायत कार्यालयाच्या टॉवरवर चढत आंदोलन करण्यात आलं. हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यात दोन युवकांनीही आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. .
****
वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर आज नेरुळ इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सातारकर यांचं काल नेरुळ इथं वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते.
नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर असं मूळ नाव असलेल्या बाबामहाराजांनी वकिलीचं शिक्षण घेतलं होतं. प्रारंभी फर्निचरचा व्यवसाय केल्यानंतर त्यांनी कीर्तनाची कौटुंबिक परंपरा स्वीकारली. समाजप्रबोधनासोबतच त्यांनी सुमारे पंधरा लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दिक्षा देत व्यसनमुक्त केलं. संतांच्या अभंगांचं अत्यंत साध्या परंतु ओघवत्या शब्दांत निरुपण आणि त्याला दैनंदिन जीवनातल्या उदाहरणांचे दाखले हे बाबामहाराजांच्या कीर्तनाचं खास वैशिष्ट्य होतं. आपल्या एका कीर्तनात ते म्हणतात...
Byte…
सांगे श्रवणी ऐकावे ठेले |
की नेत्रीचे तेज गेले |
हे नासारंध्र बुझाले |
परिमळु न गे ||
… काय म्हटलं.. की तुम्ही ठरवलं, काही करायचं नाही . सोडून दिलं पण कानांनी ऐकणंय, डोळ्यांनी बघणंय, नाकानं श्वास घेणंय. हे सुटतं का कुणाचं..? तुम्ही शिवी देऊ नका, पण ऐकणं हा जर कानाचं धर्मय, तर काय सुटतं? म्हणून एक सांगतो, सोडायचा प्रयत्न करण्यापेक्षा, आहे त्याच्यात योग्य तऱ्हेने त्याचा वापर कसा करता येईल, याचा प्रयत्न करणं हाच वारकरी संताचं परमार्थ आहे…
विठ्ठल विठ्ठल……..
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल सातारकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन, त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
****
मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत केलेल्या समितीनं काल लातूर जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी १९ नागरीकांनी मराठा - कुणबी असलेले पुरावे सादर केले. ही समिती आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी काल तीन सुवर्णांसह १८ पदकांची कमाई केली.
गोळाफेकमध्ये सचिन खिलारीनं, नेमबाजीत सिद्धार्थ बाबूने, तर तिरंदाजी मिश्रगटात शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी सुवर्णपदक पटकावलं.
थाळीफेकमध्ये मोनु घंगासनं, गोळाफेकमध्ये भाग्यश्री जाधवनं, तर २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सीमरन वत्सनं, रौप्य पदक जिंकलं.
या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत १८ सुवर्ण, २३ रौप्य आणि ४१ कांस्य अशी एकूण ८२ पदकं मिळवली आहेत.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल चेन्नई इथं झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं इंग्लंडचा आठ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडचा संघ ३४व्या षटकात अवघ्या १५६ धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेच्या संघानं हे आव्हान २६व्या षटकात दोन गडी गमावत पूर्ण केलं. आज या स्पर्धेत पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान सामना होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं सुरु असलेल्या प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेत काल लेखिका, विद्यापीठ अधिसभा सदस्या विनिता तेलंग यांचं व्याख्यान झालं. राष्ट्र उभारणीत महिलांचं योगदान, या विषयावर बोलताना त्यांनी, ग्रामीण भागातल्या महिलांच्या सक्षमीकरणाचा टप्पा गाठणं अद्याप शिल्लक असल्याचं मत व्यक्त केलं.
****
लातूर शहरातल्या मित्रनगर परिसरात असलेल्या चार मजली इमारतीच्या तळघरात शॉर्टसर्किटनं आग लागली. या आगीत पसरलेल्या धुरामुळे गुदमरुन तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान याच इमारतीत राहणाऱ्या अजरा सय्यद या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीने गॅलरीच्या लोखंडी पाईपला साडी बांधून त्याच्या आधारे स्वत:सह कुटुंबियांचे प्राण वाचवले.
****
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथं ओबीसीसह वेगवेगळ्या जाती संघटनांनी, काल उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी प्रवर्गात इतर कुठल्याही जातीचा समावेश करू नये, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कला विभागातर्फे छाऊ नृत्यनाट्य कला प्रकाराची कार्यशाळा काल सुरू झाली. पश्चिम बंगाल, बिहार, ओडीसा या राज्यात हा कलाप्रकार प्रसिद्ध आहे. चार नोव्हेंबर पर्यंत ही कार्यशाळा कला विभागात सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान चालेल, असं विभागप्रमुखांनी सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment