Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 30 October 2023
Time: 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० ऑक्टोबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· युवाशक्तीची एकजूट घडवण्यासाठी 'माझा युवा भारत' संघटनेची उद्या स्थापना;युवकांनी सहभागी होण्याचं पंतप्रधानांकडून मन की बात च्या माध्यमातून आवाहन
· मराठा आरक्षणासाठीची आंदोलनं तीव्र;खासदार हेमंत पाटील यांची राजीनाम्याची घोषणा
· पैठण औद्योगिक वसाहतीतून १६० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त;दोघांना अटक
आणि
· एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा इंग्लंडवर १०० धावांनी दणदणीत विजय
सविस्तर बातम्या
युवाशक्तीची एकजूट घडवण्यासाठी 'माझा युवा भारत' ही संघटना स्थापन होत असून, युवकांनी या संघटनेचं संकेतस्थळ 'माय भारत डॉट जीओव्ही डॉट इन' यावर नोंदणी करण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या १०६ व्या भागात बोलत होते. उद्या ३१ ऑक्टोबर रोजी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनापासून या राष्ट्रव्यापी संघटनेचा पाया रचला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या नागरिकांनी पर्यटनाला किंवा तीर्थयात्रेला गेल्यावर त्या त्या ठिकाणच्या स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या वस्तूची खरेदी करावी, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. मेरी माटी मेरा देश, टाकाऊतून टिकाऊ, आत्मनिर्भर भारत, क्रीडापटूंची कामगिरी आदी मुद्यांवरही पंतप्रधानांनी भाष्य केलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची आज तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात सकाळी दहा वाजता ही बैठक होणार आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार योग्य तो निर्णय घेईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. आंदोनलकर्ते मनोज जरांगे यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, असं आवाहन त्यांनी केलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चेसाठी यावं, असं आवाहन, आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केलं आहे. ते काल पत्रकारांशी बोलत होते. जरांगे यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे.
दरम्यान, जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवण्यासाठी मराठा समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलनं करण्यात येत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सुलतानपूर, करमाड इथं मराठा बांधवांनी काल आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केलं. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या बाजार गेवराई इथं तरुणांनी सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. विभागातल्या बहुतांश गावांमध्ये साखळी उपोषणं सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर, बीड तसंच धाराशिव शहरातून काल कॅन्डल मार्च काढण्यात आला.
दरम्यान, नांदेड आणि बीड जिल्ह्यात एसटी बस पेटवून दिल्याच्या पाठोपाठ, धाराशिव, नांदेड, जालना तसंच परभणी जिल्ह्यात बसगाड्यांवर दगडफेक झाल्यानं, एसटी महामंडळानं मराठवाड्यात बहुतांश बस सेवा बंद केली आहे. जालन्याच्या पोलिस अधीक्षकांनी एस टी महामंडळाला पत्र लिहून, परिस्थितीचा अंदाज घेऊनच वाहतुकीचा निर्णय घ्यावा, असं सांगितलं आहे.
****
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी खासदार पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. काल यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात पोफाळी इथं मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला, त्यानंतर पाटील यांनी ही घोषणा केली...
Byte…
आम्ही लोकसभेचे खासदार आहोत. दिल्लीमध्ये यापूर्वी सर्व खासदारांची मी बैठक बोलवली होती. २३ खासदार याच्या मध्ये सहभागी झाले होते. आणि दिल्ली मध्ये मी स्वत: लोकसभा अध्यक्षांना भेटून राजीनामा देणार आहे. जेणेकरून देशाचं जे लक्ष आहे. ते या प्रश्नाकडे वेधलं गेलं पाहिजे. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे.
****
मराठा समाज त्यांचा हक्क मागत असून, त्यांना तो मिळायला हवा, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल जाहीर केलेल्या एका पत्रकात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ओबीसी, आदिवासी सह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचं टिकणारं आरक्षण मिळायला हवं असं म्हटलं आहे.
****
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट हे तिन्ही पक्ष, महाराष्ट्रात मिशन ४५ प्लस ही मोहीम राबवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी काल ठाण्यात ही भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, पक्षविरोधी कारवायांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी विधानसभाध्यक्षांकडे केलेल्या तक्रारीनंतर या पक्षाच्या दोन्ही गटांच्या आमदारांना विधीमंडळ सचिवालयानं नोटीस बजावली आहे. सर्व आमदारांना यावर आठवडाभरात उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण औद्योगिक वसाहतीतल्या ॲपेक्स मेडिकेम या कंपनीच्या दोन गोदामांमधून १६० कोटी रुपयांच्या १०७ लिटर अंमली पदार्थाचा साठा काल जप्त करण्यात आला. महसूल गुप्तचर संचालनालयानं ही कारवाई केली असून, सदर कंपनीचा संचालक सौरभ गोंधळेकर आणि गोदाम व्यवस्थापन शेखर पगार यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसातली छत्रपती संभाजीनगर इथली अंमली पदार्थांसंदर्भातली ही दुसरी मोठी कारवाई आहे.
****
राज्यभरातली सर्व कृषी केंद्र येत्या दोन ते चार नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र खतं वितरक संघटना- माफदाचे राष्ट्राध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी ही माहिती दिली. प्रस्तावित कृषी विधेयकामुळे होऊ शकणाऱ्या नुकसानीबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना वेळोवेळी निवेदनं दिल्यानंतरही त्यावर काही निर्णय न झाल्यामुळे,हे आंदोलन करण्यात येत आहे.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं इंग्लंडचा १०० धावांनी दणदणीत पराभव केला. लखनौ इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्माच्या ८७ आणि सूर्यकुमार यादवच्या ४९ धावांशिवाय कोणीही फलंदाज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. भारताने निर्धारित षटकात नऊ बाद २२९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला इंग्लंडचा संघ, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे, ३५व्या षटकात १२९ धावांवर सर्वबाद झाला. मोहम्मद शमीनं चार, तर जसप्रित बुमराहनं तीन गडी बाद केले. रोहित शर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आज या स्पर्धेत पुणे इथं अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघादरम्यान सामना होणार आहे.
****
लेखकानं कधीही काळ आणि परिस्थिती अवघड आहे, असं विधान करु नये, अशी अपेक्षा, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद बोकील यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर इथं काल ३१ वा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार बोकिल यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह आणि पन्नास हजार रूपये असं या पुरस्कराचं स्वरूप आहे.
****
बीड जिल्ह्यात वडवणी इथं स्वंयसहाय्यता बचतगटांतल्या महिलांना स्वंयरोजगार निर्मितीसाठी, ट्रॅक्टर सहित कृषी औजारांसह विविध यंत्रं, तसंच ई- रिक्षा वाटप करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर आर्दड तसंच बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धाराशिव जिल्ह्याचे पहिले जिल्हा प्रचारक, बाळासाहेब दीक्षित यांच्या जीवनावरील, 'अनुपमेय हा आत्मविलोपी', या पुस्तकाचं काल प्रकाशन झालं. जनजाती कल्याण आश्रमाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य सुरेश कुलकर्णी, धाराशिव जिल्हा संघचालक अनिल यादव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, जातनिहाय जनगणना करावी यासह अन्य मागण्यांसाठी, जालना जिल्ह्यातल्या मंठा इथं, काल ओबीसी समाजाच्यावतीनं मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मोर्चाचं रुपांतर सभेत झालं.
****
लातूर इथं उद्या ३१ ऑक्टोबर रोजी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता हे शिबीर होणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी या शिबिराच्या पूर्वतयारीचा आढावा घेतलं.
****
No comments:
Post a Comment