Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 29
October 2023
Time: 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ ऑक्टोबर २०२३
सकाळी
७.१० मि.
****
· कांद्याचे किमान निर्यात दर केंद्र सरकारकडून निश्चित
·
शासकीय सेवेत नव्यानं रुजू ५१ हजारांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधानांच्या हस्ते
नियुक्ती पत्रं प्रदान
· बीड इथं कुणबी-मराठासंदर्भात सुमारे चार हजार नोंदी;सर्वात जुना अभिलेख १९१० सालचा
·
छत्रपती
संभाजीनगर इथं पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणारी अल्पवयीन मुलांची टोळी पोलिसांच्या
ताब्यात
आणि
· एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा इंग्लंडसोबत
सामना
****
कांद्याचे किमान निर्यात दर केंद्र सरकारनं निश्चित केले
आहेत. प्रति टन किमान आठशे
अमेरिकी डॉलर दराने कांद्याची निर्यात करता येणार आहे. कांद्याचे
हे निर्यात दर डिसेंबरपर्यंत लागू राहतील. याशिवाय केंद्र सरकारने
बफर स्टॉक व्यतिरिक्त कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. कांद्याचे
वाढते दर पाहता सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा १०६ वा भाग आहे.
****
शासकीय सेवेत नव्यानं भरती झालेल्या ५१ हजारांहून
अधिक उमेदवारांना काल पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रं
प्रदान केली. त्यानंतर
बोलताना पंतप्रधानांनी हे रोजगार मेळावे म्हणजे युवकांसाठीच्या वचनबद्धतेचं प्रतीक
असल्याचं म्हटलं आहे. देशभरात ३७ ठिकाणी काल रोजगार मेळावे
घेण्यात आले. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे
आणि नागपूर इथल्या ४९२ उमेदवारांना काल नियुक्ती पत्रं देण्यात आली.
नांदेड इथं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
यांच्या हस्ते ५५ युवकांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. यात १७ मुलींचा समावेश आहे. शासकीय नोकरी
ही लोकसेवेची संधी असल्याचं समजून काम करण्याचं आवाहन डॉ. कराड यांनी यावेळी केलं.
पुण्यात झालेल्या रोजगार मेळाव्यात रेल्वे राज्यमंत्री
रावसाहेब दानवे यांच्या हस्ते ८० उमेदवारांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. सरकारी नोकरीच्या माध्यमातून देशाच्या
विकास प्रक्रियेत मोलाचं योगदान देण्याचं आवाहन मंत्री दानवे यांनी यावेळी केलं.
****
'मेरी माटी मेरा देश' या अभियानांतर्गत महाराष्ट्रातले ४१४ अमृत कलश आणि ८८१ स्वयंसेवकांची अमृत कलश
यात्रा काल दुपारी दिल्लीत दाखल झाली. महाराष्ट्र शासनातर्फे
सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेनं या यात्रेचं
स्वागत केलं.
****
मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत
गठित समितीने काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या माहितीचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी समितीसमोर कामकाजाचा आढावा सादर केला.
बीड जिल्ह्यात १२ विभागांच्या ४७ प्रकारचे २२ लाखाहून अधिक अभिलेखे
तपासण्यात आले, यात कुणबी - मराठा अशा ३ हजार ९९३ नोंदी आढळल्याची
माहिती देण्यात सांगण्यात आली. यापैकी शिक्षण विभागाचा १९१० सालचा अभिलेख हा
सर्वात जुना अभिलेख आहे. दरम्यान, यावेळी
१२२ जणांनी समितीकडे निवेदनं सादर केल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
मराठा आरक्षण
मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा
मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावागावांमध्ये
सुरू असलेल्या साखळी उपोषणांचं आजपासून आमरण उपोषणात रुपांतर होणार आहे. जालना
जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणासाठी दुसऱ्या टप्प्यात आमरण
उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन परवा ३१ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा इशारा
जरांगे पाटील यांनी दिला. आंदोलन करताना तरुणांनी टोकाचं
पाऊल उचलू नये, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं.
दरम्यान, अंबड तालुक्यात
रोहिलागड इथल्या काही तरुणांनी काल मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं. कोल्हापूर इथं
आजपासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. तर आज धुळ्यात होणारा काँग्रेस पक्षाचा 'शेतकरी मेळावा' मराठा आरक्षण
लढ्याला पाठींबा म्हणून रद्द करण्यात आला आहे.
****
दरम्यान, बीडहून कोल्हापूरला निघालेली एस टी बस काल रात्री एका जमावानं पेटवून दिली.
आहेर वडगाव परिसरात ही घटना घडली. सर्व प्रवासी
बसमधून उतरल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातही शुक्रवारी रात्री अज्ञातांनी
एसटी महामंडळाची बस पेटवून दिली होती. या दोन्ही प्रकरणात गुन्हा
नोंदवण्यात आला आहे.
****
श्री क्षेत्र तुळजापूर इथं तुळजाभवानी देवी, नवरात्रानंतरची पाच दिवसांची श्रमनिद्रा संपवून
आज पहाटे सिंहासनारूढ झाली. या सोहळ्यासाठी सुमारे दोन लाख
भक्त पायचालत तुळजापूरात दाखल झाले आहेत.
दरम्यान, तुळजापूर इथं आयोजित
महाआरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असं आवाहन
सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी
सावंत यांनी केलं आहे. ते काल या शिबीरस्थळी बोलत होते. एक लाख
१४ हजारापेक्षा अधिक भाविकांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह
पाच अल्पवयीन मुलांची टोळी पोलिसांनी काल ताब्यात घेतली. या टोळीकडून पाचशे रुपये दर्शनी मूल्याच्या
१९ बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. एक अज्ञात इसम या मुलांकडून
या बनावट नोटा सुटे आणण्याच्या बहाण्याने चलनात आणत असल्याचं, पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आलं आहे.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ इथं भारताचा
इंग्लंडसोबत सामना होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत
आतापर्यंतचे सर्व पाच सामने जिंकून भारत दहा गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर,
तर फक्त एकच सामना जिंकल्यानं, इंग्लंडचा संघ दोन
गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, या स्पर्धेत काल ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा पाच धावांनी तर नेदरलँडनं बांगलादेशचा
८७ धावांनी पराभव केला.
ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत ३८८ धावा केल्या, मात्र न्यूझीलंडचा संघ ३८५ धावांवर बाद झाला.
कोलकात्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडनं दिलेलं २३० धावांचं
आव्हान गाठताना, बांगलादेशचा
संघ ४३ व्या षटकात १४२ धावांवर सर्वबाद झाला.
****
पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल चार
सुवर्ण, दोन रौप्य आणि सहा
कांस्यपदकांसह एकूण बारा पदकं जिंकली. या स्पर्धेत २९ सुवर्ण,
३१ रौप्य आणि ५१ कांस्य पदकांसह आतापर्यंत एकूण १११ पदकं भारतनं पटकावली
आहेत. पदकतालिकेत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.
****
नमो तीर्थस्थळ सुधार अभियानांतर्गत
महाराष्ट्रातल्या ७३ तीर्थस्थळांचा कायापालट करण्यात येणार आहे, यामध्ये बीड
इथल्या प्रसिद्ध खंडेश्वरी मंदिर, अंबाजोगाई इथलं मुकुंदराज
समाधी मंदिर, खोलेश्वर मंदिर तसंच मरळ सिद्धेश्वर बारव या
चार तीर्थस्थळांचा समावेश आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानी
पोटी विम्याची २५% अग्रिम रक्कम पुढील
आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील
यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील ४० महसुल मंडळात पिकांच्या
नुकसानीची टक्केवारी पाहता हेक्टरी ५ ते ६ हजार रुपये मिळणं अभिप्रेत असल्याचं,
याबाबच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हैदराबाद मुक्तीसंग्रामातील अग्रणी स्वातंत्र्यसैनिक आणि
दिवंगत संपादक अनंत भालेराव यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार,
प्रसिद्ध लेखक आणि कार्यकर्ते मिलिंद बोकील यांना आज सायंकाळी प्रदान केला जाणार
आहे. छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण
नाट्यगृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
****
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा सोलापूर इथला केंद्रीय
संचार ब्युरो आणि धाराशिव जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर
तालुक्यात तामलवाडी इथं तीन दिवसीय डिजिटल मल्टिमीडीया प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते
काल या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment