आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या एकता नगर इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रीय एकता दिवस संचलनाला सलामी दिली, तसंच उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद मैदानावर रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवला. देशाची एकता, अखंडता कायम ठेवण्यात सरदार पटेलांचं योगदान कायम स्मरणात राहील, असं ते म्हणाले. तत्पूर्वी त्यांनी उपस्थितांना एकतेची शपथ दिली. नांदेड तसंच परभणी इथंही आज राष्ट्रीय एकता दौड काढण्यात आली.
****
मेरी माटी-मेरा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रेचा सांगता समारंभ आज नवी दिल्लीत कर्तव्य पथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवाचाही आज समारोप होत आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारकाचं उद्घाटन होणार आहे.
देशातल्या युवकांसाठी, युवाशक्तीची एकजूट घडवण्यासाठी 'माझा युवा भारत' या संघटनेची सुरुवात देखील आज होणार आहे.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात माजलगावसह इतर ठिकाणच्या जाळपोळ प्रकरणी सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४० जणांना ताब्यात घेतलं आहे. सोशल मीडियावर अफवा नियंत्रणासाठी जिल्ह्यातली इंटरनेट सेवा उद्या पर्यंत बंद करण्यात आली असल्याची माहिती, जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी दिली. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरातल्या सर्व शाळा आज सोडून देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर डोंगरकडा फाटा इथं रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर- जळगाव राष्ट्रीय महामार्गावर गणोरी फाटा इथं देखील सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन सुरू झालं आहे.
****
No comments:
Post a Comment